Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

ऋतुचक्र उद्धरूदे
प्रतिनिधी

निसर्ग आणि संस्कृतीची सांगड घालतानाच पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने सुमारे सहा कोटी रुपये खर्चून पालिकेने निर्माण केलेले आणि अर्धवट सोडून दिलेले ऋतुचक्र उद्यान अखेरचा श्वास घेत आहे. केवळ ठाण्यातच नव्हे, तर राज्यात पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या नसत्या उठाठेवीमुळे कायद्याच्या कचाटय़ात सापडला असून, पालिकाही मूग गिळून गप्प बसली आहे. परिणामी, सुंदर ऋतुचक्र उद्यानाचे आता डंपिंग

 

ग्राऊंडमध्ये रूपांतर झाले आहे.
मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस कळवा खाडीलगत असलेल्या दक्षिणोत्तर पट्टय़ात सुमारे १४ एकर जागेत ऋतुचक्र उद्यान उभारण्याची मूळ कल्पना ठाण्यातील काही पर्यावरणप्रेमींनी मांडली. मुळातच खाडीच्या दुसऱ्या बाजूस मनीषानगरला लागून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत झोपडय़ा उभारल्या जात असून, त्याचा पश्चिम भागातही शिरकाव होऊ शकतो. तसे झाले तर झोपडय़ांच्या जंगलात तिवरांचा आणि खाडीचाही बळी जायला वेळ लागणार नाही, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्यासमोर मांडली. चंद्रशेखर यांनी ही संकल्पना उचलून धरली. सेंटर फॉर अर्थसायन्स स्टडिज या संस्थेने पर्यावरण, संस्कृती, मनोरंजन यांचा मेळ घालून ऋतुचक्र उद्यानाचा आराखडा तयार केला. वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्या ऋतुकाळात येणारे सण यांची सांगड घालीत प्रत्येक ऋतुसाठी एक अशा सहा विभागांत या उद्यानाची रचना करण्यात आली होती. याशिवाय फुलपाखरे, पक्षी, प्राणी यांची रेलचेल, तसेच विविध जातीच्या वृक्षांची, फुलझाडांची लागवड हेही या उद्यानाचे वैशिष्टय़ होते.
चंद्रशेखरांच्या काळात या ऋतुचक्र उद्यानाचे कामही युद्धपातळीवर चालू होते. सहापैकी वसंत व वर्षां ऋतुचे कामही पूर्ण झाले. या दोन ऋतुंच्या विभागातील कामावरून संपूर्ण उद्यान किती आकर्षक असेल याची साक्ष पटेल. वसंत ऋतुची रचना फुलपाखरांच्या आकाराची असून या ऋतुत येणाऱ्या गुढीपाडव्याचे महत्त्व लक्षात घेऊन कडुनिंब, आंबा, काजू या झाडांची लागवड या विभागात करण्यात आली. तसेच वसंत पंचमीचे महत्त्व लक्षात घेऊन पिवळ्या रंगाची फुलझाडे, वेली, कदंब, शंकासूर, करदळी अशी झाडे या विभागात लावण्यात आली होती. बाजूच्याच वर्षां ऋतु विभागात नागपंचमी गुरू पौर्णिमा, नारळी पौर्णिमा यांचे महत्त्व विशद करणारे फुलांचे ताटवे, नारळबाग, बांबू, कृष्णकमळ ही झाडे लावण्यात आली होती, तर ग्रीष्म ऋतुसाठी वड, फणस, लिली ही झाडे लावण्यात येणार होती. अशाचप्रकारे शरद ऋतुत गणपती येत असल्याने या विभागात जास्वंद, दुर्वा, केवडा, तर दसऱ्याशी निगडित आपटा, झेंडू, कांचन असे ऋतु व सणनिहाय वृक्ष लावण्यात येणार होते.
याशिवाय दुर्मिळ २०० जातींच्या सुमारे पाच हजार झाडांची लागवड या उद्यानात केली जाणार होती. शिवाय जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी मनोरंजनाची दालने, मध्यभागी अॅम्पी थिएटर, ऋतुमानानुसार सूर्योदय व सूर्यास्ताच्या बदलाला वेळा ओळखणारे ‘सनडायल’ हे वेगळे दालनही या उद्यानात उभारले जाणार होते. सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला जात असतानाच चंद्रशेखर यांची बदली झाली अन् या ऋतुचक्राची चक्रे फिरली.
पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाने उभारले जाणारे हे उद्यान सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, तसेच खाडीकिनारी बेकायदेशीर काम केले जात असल्याचा आरोप करीत काही तथाकथित पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध करायला सुरुवात केली. त्यातच राजकीय चक्रे फिरली आणि चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याने पालिका प्रशासनाने हात आखडते घ्यायला सुरुवात केली. याचदरम्यान कृष्णकांत भोगे आयुक्त म्हणून आले आणि पर्यावरणप्रेमींचा जोर वाढला. तरीही अगोदरच खाडीचा पूर्वेकडील भाग झोपडय़ांनी गिळंकृत केला आहे. शिवाय उद्यानात आम्ही कसलेही बांधकाम करणार नसून खाडीच्या संरक्षणासाठी तिवरांची लागवड, तर मोकळ्या जागेतही उद्यानाची उभारणी करणार आहोत. पूर्वी या जागेवर डंपिंग ग्राऊंड होते. तेथे आता आम्ही नंदनवन उभारत आहोत, असे अनेक प्रकारचे आर्जव प्रशासनाने शासनदरबारी केले. मात्र राजकीय व आयुक्तांच्या सपोर्टअभावी या उद्यानाच्या कामावर पर्यावरण विभागाने खो घातला. त्यानंतरच्या आयुक्तांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, एका चांगल्या प्रकल्पाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.
सध्या या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच डेब्रिज टाकले जात असून, कंपाऊंड वॉलचे गेट व लोखंडी कुंपण भंगारवाल्यांनी केव्हाच चोरून नेले आहे. जे दोन विभाग तयार करण्यात आले होते, त्याचीही दुरवस्था झाली असून तेथे आता झोपडय़ा उभ्या राहात आहेत. उद्यानाला लागून ज्या जागेत तिवरांची लागवड केली जाणार होती, तेथेही आता नवीन ‘वसाहत’ उभी राहात आहे. त्यासाठी राजरोसपणे तिवरांची कत्तल केली जात आहे, तर ज्या जागेवर ऋतुचक्रातील अन्य विभाग उभारले जाणार होते, तेथे आता चक्क कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड निर्माण झाले आहे. एकूणच पालिकेचे सहा कोटी खाडीच्या पाण्यातून वाहून तर गेलेच, पण ही मोकळी जागाही आता झोपडय़ांच्या माध्यमातून हडप केली जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे उद्यानामुळे खाडीचे अस्तित्व धोक्यात आल्याची कोल्हेकुई करणारे तथाकथित पर्यावरणवादीही आता या खाडीकडे फिरकायला तयार नाहीत, मग आवाज उठवायची बाब तर दूरच! त्यामुळे झोपडय़ांसाठीच तर त्यावेळी सारा अट्टहास झाला नसावा का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
या उद्यानाला लागलेले सरकारी ग्रहण सुटावे, यासाठी स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पर्यावरणमंत्रीही त्यांच्याच पक्षाचे आहेत, तर आता पालिका प्रशासनही या उद्यानाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. खुद्द पर्यावरणमंत्र्यांनी आदेश देऊनही त्यांचाच विभाग या उद्यानावरील स्थगितीचे मळभ दूर करायला तयार नाही. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथोरिटीने आणि पर्यावरण विभागाने उशिरा का होईना, आता आपली मानसिकता बदलत पालिकेने उद्यानाऐवजी खारफुटीच्या माध्यमातून खाडीचे संरक्षण असा प्रस्ताव पाठविण्याचे सुचविले असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे उशिरा का होईना, तथाकथित पर्यावरणवाद्यांनी खाडीत रुतविलेले हे ऋतुचक्र उद्धरू दे, हीच सर्वसामान्य ठाणेकरांची अपेक्षा!