Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सची गुणवत्ता
केबल टीव्हीला पर्याय म्हणून डीटीएच अर्थात डायरेक्ट टू होम सेवा निवडल्यास आपल्याला त्या सेवक कंपनीची सेट टॉप बॉक्स घ्यावा लागते. प्रत्येक डीटीएच सेवक कंपनीचा सेट टॉप बॉक्स वेगळ्या डिझाईनचा. त्यामुळे एका कंपनीचा सेट टॉप बॉक्स दुसऱ्या कंपनीच्या सेवेसाठी चालत नाही. तसेच केबल टीव्हीची ‘कॅस’ सेवा (कंडिशनल अॅक्सेस सिस्टिम) ज्या भागात आहे, तेथे त्यांचाही सेट टॉप

 

बॉक्स असतो आणि ती वेगळ्याच पद्धतीने काम करते. याशिवाय केबल टीव्हीचे डिजिटलायझेशन होईल तेव्हा त्यांचाही सेट टॉप बॉक्स येईल. अशा रीतीने टीव्ही वितरणाच्या क्षेत्रात सेट टॉप बॉक्सची भूमिका सर्वव्यापी होत असलेली दिसते. यात ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडताना आढळले म्हणून टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात् ट्रायने याविषयी काही नवीन मापदंड बनवण्याची प्रक्रिया डिसेंबर २००८ मध्ये सुरू केली. ती आता अंतिम टप्प्यावर आली आहे. अशावेळी मुळात सेट टॉप लागतोच कशाला? इत्यादी प्रश्नांचा उलगडा ग्राहकांना समजेल अशा भाषेत करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. त्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक बाबींमधल्या काटेकोरपणाबद्दल तडजोड केली आहे.
स्कॅनिंग
टीव्हीमध्ये (तसेच सिनेमातही) दृश्यातील गती दाखवण्यासाठी एका सेकंदात २५ स्थिरचित्रांच्या फ्रेम्स किंवा चौकटी पाठवल्या जातात. (सिनेमात २४) सिनेमामध्ये कुठल्याही फ्रेमचे संपूर्ण चित्र पडद्यावर एकदम साकारले. ते थोडावेळ दाखवून झाल्यावर पुढच्या फ्रेमचे चित्र येते. टीव्हीमध्ये मात्र फ्रेमचे संपूर्ण चित्र टीव्हीचा कॅमेरा एकदम पकडत नाही, तर त्याचे स्कॅनिंग डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली करून त्याचा इलेक्ट्रिकल संदेश तयार करतो. टीव्हीच्या सेटमध्ये हा इलेक्ट्रिकल संदेश आला की त्याचे पडद्यावर दृश्य तयार करण्यासाठी त्याच पद्धतीने स्कॅनिंग करावे लागते. दृश्यातील बारीक बारीक भाग सुस्पष्ट दिसण्यासाठी एका फ्रेममधील दृश्याचे खूप छोटे छोटे भाग पाडले जातात, याला पिक्सेल (पिक्चर एलिमेंटस्) म्हणतात. आपण त्याला चित्रांश म्हणूया. प्रत्येक चित्रांशाचा संदेश एका सेकंदामध्ये फक्त २५ वेळाच पकडला जात असला तरी टीव्हीच्या एका फ्रेममध्ये सुमारे पाच लाख चित्रांश असल्यामुळे एका सेकंदात सुमारे एक कोटी २५ लाख इतक्या चित्रांशाचे संदेश पाठवलेले असतात. या संदेशात त्या चित्रांशाच्या तांबडा, हिरवा आणि निळा या तीन रंगाच्या प्रकाशाचे प्रमाण किती आहे ही माहिती असते. ही माहिती डिजीटल पद्धतीने पाठवायची तर प्रत्येक चित्रांशाची कमीत कमी २४ बीट्स पाठवावी लागतील आणि त्यासाठी सुमारे १५० मेगाहर्ट्झ इतकी प्रचंड बॅण्डविडथ लागेल.
हे जरी गणित बरोबर असले तरी एवढी बीट्स पाठवण्याची गरज खरोखर नसते. त्यामुळे बीट्सची संख्या खूपच कमी करता येते आणि बीट्स जितकी कमी होईल, तितकी बॅण्डविड्थही कमी लागेल. या विषयावर संशोधन केल्यावर असे लक्षात आले की, बीट्सची संख्या १०० पटींनी किंवा त्याहूनही अधिक कमी करणे शक्य आहे. ही कल्पना समजून सांगण्यासाठी सोबतची आकृती माझ्या संगणकावरील एक्सेल पॅकेज वापरून मी या लेखासाठी खास तयार केली आहे. त्यात ग्रीडच्या साह्याने चित्रांश दाखवले आहेत आणि एका चित्राच्या दोन फ्रेम्स दाखवल्या आहेत.
आकृतीमधील वरच्या फ्रेममधील यंत्रमानवाचा उजवा हात खाली आहे, तर खालच्या फ्रेममध्ये तो वर गेलेला दाखवला आहे. (क्रिकेटमध्ये पंचाचा हात जसा वर जातो) संपूर्ण चित्रामध्ये एकूण चित्रांश ७६८ आहेत. (प्रत्येक आडव्या रेषेत ३२ चित्रांश आहेत आणि अशा २४ आडव्या रेषा आहेत.) या दोन्ही फ्रेममध्ये हात उचलण्यामुळे फक्त १६ चित्रांशामध्ये फरक पडलेला आहे. बाकीचे ७५२ चित्रांशामध्ये काहीही फरक नाही.
यावरून असे लक्षात येईल की, दोन लागोपाठच्या फ्रेममध्ये कोणत्या चित्रांशामध्ये काय फरक पडला आहे, एवढा संदेश पाठवला तरी काम भागणार आहे. त्यासाठी प्रत्येक चित्रांशाचे दृश्यामधील स्थान त्याच्या अक्षांश-रेखांश अशा नकाशावरील स्थानाप्रमाणे सांगता आले पाहिजे. सोबतच्या आकृतीत एखादा विशिष्ट चित्रांश कुठल्या आडव्या रेषेत आहे, हे प्रथम सांगितल्यावर त्या रेषेत तो कितव्या क्रमांकावर आहे हे सांगितले की त्याचे बरोबर स्थान समजते. त्यासाठी २४ आडव्या रेषांना ई१ ते ई८, एफ१ ते एफ८ आणि जी१ ते जी८ असे क्रमांक दिले आहेत. प्रत्येक आडव्या रेषेतील ३२ चित्रांशांना ए१ ते ए८, बी१ ते बी८, सी१ ते सी४ आणि डी१ ते डी८ असे क्रमांक दिलेले आहेत. वरच्या फ्रेममध्ये यंत्रमानवाचा उजवा डोळा ई५ या आडव्या रेषेत बी८ या क्रमांकावर आहे, तर डावा डोळा त्याच ई५ या आडव्या रेषेत सी३ या क्रमांकावर आहे, हे आपल्याला दिसून येईल. अशा रीतीने बघितल्यास यंत्रमानवाच्या उजव्या हाताचा पुढचा भाग वरच्या फ्रेममध्ये एफ५ ते एफ८ या चार रेषांमध्ये क्रमांक बी१ आणि बी२ असा एकूण आठ चित्रांशांमध्ये आहे. तो वरती उचलल्यावर खालच्या फ्रेममध्ये ई८, एफ१, एफ२ आणि एफ३ या आडव्या रेषांमध्ये बी१ आणि बी२ याच क्रमांकावरील चित्रांशांमध्ये गेलेला दिसतो. त्यामुळे हाताच्या या हालचालीमुळे एकूण १६ चित्रांशांचे संदेश बदलले जातील. बाकी (७६८-१६=) ७५२ चित्रांशांचे संदेश दोन्ही फ्रेम्समध्ये सारखेच असल्यामुळे त्यांच्या पुनरुक्तीची आवश्यकता नाही.
टीव्हीच्या प्रसारणांमध्ये आडव्या रेषा सुमारे ६०० असतात, तर प्रत्येक रेषेमध्ये सुमारे ८०० चित्रांश असतात. म्हणजेच ६००x८००=४८०,००० इतक्या चित्रांशांचे (सुमारे पाच लाख) संदेश दर सेकंदाला २५ वेळा पाठवले जातात. प्रत्यक्षात जर दृश्यामध्ये गती खूपच कमी असली तर इतके म्हणजे सुमारे पाच लाख संदेश पाठवण्याची गरज नाही. उदाहरणार्थ सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांपूर्वी घडय़ाळावरून वेळ दाखवली जाते. अशा दृश्यामध्ये एका सेकंदाच्या २५ फ्रेमपैकी २४ फ्रेममध्ये काहीच फरक नसतो तर २५ व्या फ्रेममध्ये वेळ दाखवणाऱ्या घडय़ाळ्याच्या रेषेतील काही चित्रांश बदलतात, तर बाकीचे सर्व चित्रांश तसेच असतात. हे घडय़ाळ साधारणपणे १० सेकंद अगोदर दाखवण्यास सुरुवात होते. क्वचितप्रसंगी २० ते ३० सेकंद अगोदरही दाखवले जाते. म्हणजे किती संदेश उगीचच पाठवले जातात याचे गणित आपण करू शकतो. त्यानंतर बातम्या वाचणाऱ्या व्यक्तीचे दृश्य आपल्याला दिसते. बातम्या वाचताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव थोडेफार बदलतात. पण बाकी दृश्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजेच यामध्येही बॅण्डविड्थचा प्रचंड अपव्यय होत असतो. बातम्यांमध्ये जी काही दृश्ये दाखवली जातात, त्यामध्ये मुलाखती वगैरे कार्यक्रमांमध्येही गतिमानता फारच थोडी असल्यामुळे बॅण्डविड्थचा अपव्यय चालू राहतो. त्यातल्या त्यात खेळांची दृश्ये दाखवताना काही ठिकाणी गती असते. फुटबॉलसारख्या खेळात क्रिकेटपेक्षा गती खूपच अधिक असते. त्यामुळे प्रत्येक दृश्यांमधील चित्रांशाचे संगणकाद्वारे पृथक्करण करून आवश्यक तेवढेच चित्रांश आणि त्यांच्यामध्ये होत असलेले बदल दाखवले तर बॅण्डविड्थ खूप म्हणजे खूपच कमी लागते.
बॅण्डविड्थ कॉम्प्रेशन
टीव्हीच्या दृश्यातील एका फ्रेमपासून दुसऱ्या फ्रेममध्ये होणाऱ्या फरकाचा विचार केल्यानंतर अधिक सूक्ष्म विचार करू. प्रत्येक दृश्यामध्ये देखील जे सुमारे पाच लाख चित्रांश असतात, त्या प्रत्येक चित्रांशामध्ये वेगळी माहिती कितपत असते आणि त्यातील कोणती खरोखरच दाखवणे अपेक्षित आणि आवश्यक असते याचे पृथक्करण एका फ्रेमच्या ४० मिली सेकंद इतक्या कमी कालावधीत करून त्याप्रमाणे किमान चित्रांशांचे संदेश पाठवण्याचे काम मानवी सामर्थ्यांच्या बाहेरचे आहे. त्यासाठी संगणकाची मदत घ्यावी लागते. अशावेळी त्या संगणकाला दिलेल्या आज्ञावलीप्रमाणे तो त्या संदेशाची रचना करतो. त्यामुळे काही वेळा मूळ दृश्याचे विकृतीकरण होताना आपण बघतो. काही महिन्यांपूर्वी बातमी वाचणाऱ्या निवेदकाचे किंवा मुलाखतीतील व्यक्तीचे चेहरे ओढल्या-ताणल्यासारखे दिसत. हल्ली ते चक्क कुस्करलेले दिसतात. हे प्रकार घडण्याचे कारण एकाच सात मेगाहर्ट्झच्या बॅण्डविड्थमध्ये अनेक कार्यक्रमांची दृश्ये कोंबली जातात हे आहे. टीव्ही सेटमध्ये ४७ मेगाहर्ट्झपासून ७८० मेगाहर्ट्झपर्यंतची बॅण्डविड्थ उपलब्ध असते, म्हणजे सात मेगाहर्ट्झचे सुमारे ९० ते १०० चॅनल्स उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक चॅनलमध्ये एकच कार्यक्रम दाखवला तर ते सुसह्य होईल. परंतु त्यात १० कार्यक्रम दाखवता आले पाहिजेत आणि येतील अशा आक्रमक वृत्तीने काही अतिउत्साही मंडळी बेलगाम वागताना दिसतात. जेथे जेथे संधी मिळेल, तेथे तेथे मी याविरुद्ध आवाज उठवत असतो.
याबाबतीत एक गोष्ट मला प्रकर्षांने जाणवते ती अशी : एखाद्या नाटकाच्या दृश्यामध्ये एखाद्या पात्राची एखादी छोटीशीच हालचाल किंवा चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जातात. उदाहरणार्थ, भुवया वर करणे किंवा वाकुल्या दाखवणे इत्यादी. ते जर टीव्हीच्या पडद्यावर दिसलेच नाहीत, तर त्या कार्यक्रमाची सगळी गंमतच निघून जाते आणि विचका होतो. टीव्हीच्या प्रभावी माध्यमाचा असा विचका होत असलेला बघण्यात आला तर प्रेक्षकांनी त्याविरुद्ध जोरदार आवाज उठवला पाहिजे.
pjjoglekar@hotmail.com