Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

सनदी अधिकारी घडवणारी संस्था
शशिकांत कोठेकर

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मराठी टक्का कमीच आहे. प्रशासकीय सेवेत मराठी मुले जावी, मराठी टक्का तेथेही वाढावा यासाठी दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली सी.डी.देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब बनली आहे. या वर्षी संस्थेची सहा मुले यूपीएससीच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाली. दरवर्षी एकतरी विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकतो. ही सारी किमया एका वर्षांत घडलेली नाही.

 

१९८७ पासून ठाणे महापालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या वास्तूत सी.डी.देशमुख प्रशासकीय संस्था सुरू झाली. दिवंगत खासदार प्रकाश परांजपे अशी संस्था सुरू व्हावी यासाठी आग्रही होते. डॉ. गोखले हे पहिले संचालक, त्यानंतर सुभाष सोमण आणि आता मधुसूदन पेंडसे सर संस्थेचा कार्यभार सांभाळतात. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, देवस्थळी यांच्यासारखे अनेक नामवंत तज्ज्ञ संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवायला येतात. पालिकेच्या या जुन्या मुख्यालयात परिचारिका प्रशिक्षण वर्गदेखील भरतात. त्यामुळे सी. डी. देशमुख संस्थेचा कारभार दिवसभर तसा शांत असतो. दिवसा मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध असते. लेक्चर मात्र संध्याकाळी पाच ते सात यावेळेतच घेता येतात. मागील १० वर्षांपासून दरवर्षी संस्थेचा एकतरी विद्यार्थी अंतिम यादीत झळकतो आहे. अजित जोशी, श्रावण हर्डीकर भारतात १३वी आलेली अश्विनी जोशी व इतर अनेक विद्यार्थी या संस्थेचे विद्यार्थी आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातील रविवारी सी.डी.देशमुख संस्थेसाठी प्रवेश परीक्षा होते. देशभरातून किमान ५०० विद्यार्थी येथे प्रवेशासाठी इच्छुक असतात. त्यांची प्रवेश परीक्षा झाली की, मुलाखत घेतली जाते. त्यातून ५० विद्यार्थ्यांची तुकडी अभ्यासक्रमासाठी निवडली जाते. यूपीएससी धर्तीवर ही प्रवेश परीक्षा होते. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोक प्रशासन, अर्थशास्त्र अशा विषयांचे वर्ग येथे होतात. मुलांना अभ्यासासाठी सुसज्ज वाचनालय केंद्रात आहे. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांची मार्गदर्शनपर व्याखाने येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जातात.
मागील वर्षीपासून मुलांमधील वाचन, आकलन व दुसऱ्याला ती समजावून सांगणे या गुणांचा विकास व्हावा, यासाठी एक उपक्रम पेंडसे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मुलांचे गट करून त्यांना विषय दिले जातात. १५ दिवस मुले त्या विषयावर वाचन करतात, अभ्यास करतात आणि मग त्यांच्यातील एक जण त्या विषयावर विवेचन करतो. त्यावर चर्चा रंगते. तसेच फिल्ड व्हिजिटसाठी मुलांना बाहेर घेऊन जाणे, असेही प्रयोग पेंडसे सर संचालकपदी आल्यापासून सुरू झाले आहेत.
प्रशासकीय सेवेबद्दल आता मराठी भाषिकांमध्ये देखील आकर्षण वाढले आहे. पूर्वी या परीक्षांबद्दल अनेकांना माहितीच नसायची. सी.डी.देशमुख संस्थेने नागरी सेवा परीक्षेबद्दल अनेकांच्या मनात असलेला न्यूनगंड हटवण्यास हातभार लावला आहे. मुलांची प्रवेशसंख्या वाढवावी, मुलांच्या हॉस्टेलची देखील सोय येथे व्हावी, दिवसादेखील लेक्चर घेता यावेत, अशा सर्व सोयींनी सुसज्ज अशी सी.डी. देशमुख संस्था असावी, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची इच्छा आहे.
जिल्हा परिषद कार्यालयाजवळ असलेल्या पालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीमधून सी.डी.देशमुख संस्थेचा कारभार सध्या सुरू आहे. संस्थेचे यश लक्षात घेता व मुलांची वाढती मागणी लक्षात घेता संस्थेसाठी स्टेशनपासून जवळच्या परिसरात प्रशस्त वास्तू असणे गरजेचे आहे. सध्या असलेली इमारत, पाठीमागील अग्निशमन केंद्र पाडून त्याजागी प्रशस्त इमारत बांधून परिचारिका प्रशिक्षण केंद्र, अग्निशमन दल व सी. डी. देशमुख संस्थेसाठी वेगळी जागा देण्याच्या प्रस्तावावर पालिका गांभीर्याने विचार करीत आहे. संपर्क- सी.डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, दूरध्वनी-२५३८ ६९४५.