Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

ऋतुचक्र उद्धरूदे
प्रतिनिधी

निसर्ग आणि संस्कृतीची सांगड घालतानाच पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने सुमारे सहा कोटी रुपये खर्चून पालिकेने निर्माण केलेले आणि अर्धवट सोडून दिलेले ऋतुचक्र उद्यान अखेरचा श्वास घेत आहे. केवळ ठाण्यातच नव्हे, तर राज्यात पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या नसत्या उठाठेवीमुळे कायद्याच्या कचाटय़ात सापडला असून, पालिकाही मूग गिळून गप्प बसली आहे. परिणामी, सुंदर ऋतुचक्र उद्यानाचे आता डंपिंग ग्राऊंडमध्ये रूपांतर झाले आहे.

टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सची गुणवत्ता
केबल टीव्हीला पर्याय म्हणून डीटीएच अर्थात डायरेक्ट टू होम सेवा निवडल्यास आपल्याला त्या सेवक कंपनीची सेट टॉप बॉक्स घ्यावा लागते. प्रत्येक डीटीएच सेवक कंपनीचा सेट टॉप बॉक्स वेगळ्या डिझाईनचा. त्यामुळे एका कंपनीचा सेट टॉप बॉक्स दुसऱ्या कंपनीच्या सेवेसाठी चालत नाही. तसेच केबल टीव्हीची ‘कॅस’ सेवा (कंडिशनल अॅक्सेस सिस्टिम) ज्या भागात आहे, तेथे त्यांचाही सेट टॉप बॉक्स असतो आणि ती वेगळ्याच पद्धतीने काम करते. याशिवाय केबल टीव्हीचे डिजिटलायझेशन होईल तेव्हा त्यांचाही सेट टॉप बॉक्स येईल. अशा रीतीने टीव्ही वितरणाच्या क्षेत्रात सेट टॉप बॉक्सची भूमिका सर्वव्यापी होत असलेली दिसते.

सनदी अधिकारी घडवणारी संस्था
शशिकांत कोठेकर

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मराठी टक्का कमीच आहे. प्रशासकीय सेवेत मराठी मुले जावी, मराठी टक्का तेथेही वाढावा यासाठी दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली सी.डी.देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब बनली आहे. या वर्षी संस्थेची सहा मुले यूपीएससीच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाली. दरवर्षी एकतरी विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकतो. ही सारी किमया एका वर्षांत घडलेली नाही.

गावाकडली भुतं!
आत्माराम नाटेकर

कोकणात भुतं असतात, अशी एक समजूत आहे. ती धादांत खोटी आहे. माझा या भुताखेतांवर मुळीच विश्वास नाही. उभ्या आयुष्यात मला कधी भूत दिसलं नाही. लहानपणी धाक दाखविण्यासाठी वडिलधाऱ्यांनी अनेकदा बागुलबोवा उभा केला. पण त्याचं भूत कधी मानगुटीवर बसलं नाही. दिवसाउजेडी रानोमाळ फिरताना मी कधी घाबरलो नाहीच, पण मध्यरात्री नदीओढय़ावरून येताना वाऱ्याने हलणाऱ्या फांद्यानीही चरकलो नाही. गावाकडची अशी कितीतरी स्थळं होती की ती भयाण भासत. सुशेची ढबेकोनी, भेरीकाकूची म्हारकोनी, चाणक्याचे परडे, गवळदेवाची बाणघाटी, इधळे खडक, पायलेकोंड, मधूची कोनी, चांभारकोंड, उगवतची मसणवट, लिकलिक्या ही नावे घेतली तरी आजही कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मला मात्र ही स्थळं नेहमीच भरभरून पावली. पायलेकोंडातले काजू आणि म्हारकोनीतले रातांबे चोरून आणीतच आमच्या कित्येक पिढय़ा मोठय़ा झाल्या. जंगलातले काजू, रातांबे लागल्याचे आम्हाला कळायचे, ते शिकारीला रानात गेल्यावर. ससे, डुक्कर, रानभेकरे ही आमची शिकारीची जनावरे. ससे जाळ्यात तर डुकरे बंदुकीने मारली जायची. भर दुपार असो, वा मध्यरात्र, आम्हाला कशाचीच भीती नव्हती. उगवतच्या मसणवटीच्या डोंगरावर आम्ही गुरांना चरण्यासाठी घेऊन जायचो आणि मसणवटीतल्या वडाखाली पत्ते कुटत बसत असू. बाजूला अर्धवट जळालेली लाकडे, इतस्तत: विखुरलेली राख असायची. शेजारच्या करवंदाच्या जाळीत तिरडीचे दांडे पडलेले असत. पण आम्हाला त्याचे कधी भय वाटले नाही. खेळता खेळता कांबळ्यांचा अण्णा जुन्या गोष्टी सांगे. त्या ऐकताना अंगावर रोमांच उभे राहायचे. ‘आमी जेच्याखाली बसलव तो वड सादू जावकारान लावल्यान. बबन्या तोडणकराच्या झिलाक हयच गाडलव. त्येच्यार माती ओढून वर बोराटनीची शिरडा ठेवलव. सकाळी येवन बघतव तर कोल्ह्णाांनी सगळी माती उकरल्यानी हुती. मिलग्या न्हावयान नवटांग मारल्यान आणि खड्डो काढून त्येका पुरल्यान. रामग्या घाडयाची पोटुशी बायको मेली तेवा तिका हयच गिलग्यान पुरल्यान. मग कितीतरी दिवस मध्यान रात झाली की म्हसवटेतसून रडण्याचो आवाज येत हुतो. रामग्याच्या बायकोचाच भूत असताला, अशी अख्ख्या गावात वदंता पसरली हुती. अशा एक ना अनेक कहाण्या अण्णाच्या तोंडून आम्ही कित्येकदा ऐकल्यात. त्या ऐकताना मनात धस्स व्हायचं, पण चेहऱ्यावर उसने अवसान आणून आवंढा गिळायचो.
एके दिवशी दिवेलागण झाली तरी हौशा घरी आला नव्हता. त्याला शोधण्यासाठी मसणवटीत गेलो. बेलडय़ा माडाजवळून वर जाताना काही तरी सरपटत गेल्याचा भास झाला. पण न दचकता तसाच भराभरा पावलं उचलून चालू लागलो. तोच हौशाची ठेक ऐकू आली. काही अंतर पुढे गेलो तसा पक्ष्यांचा विचित्र आवाज कानी पडला. मनात धस्स झालं. भीती जावी म्हणून मी ‘हौशा, ये रे, चल खाली ये’ अशी हाळी दिली. झाडावरील माकडं हुंकारत कर्कश आवाज काढत होती. हातातलं कंदील वर पकडत काळोखातनं खरीत आलो तेव्हा हौशा दिसला. मी पुढे झालो तसा तो गायब झाला. त्याच्या जागी मला एक कोल्हा दिसला. मी घाबरलो. चिमटा काढून मी झोपेत तर नाही ना, याची खात्री करून घेतली. मधूची व्हाळी ओलांडून उगवतच्या रस्त्यावर आलो. घामाने थबथबलो होतो. तोच हौशा माझ्या पुढे चालत असल्याचे दिसले. काही तरी भुताटकी असल्याचे नंतर माझ्या ध्यानात आले.
अख्ख्या गावातली देवदेवस्की उगवतच्याच माळावर व्हायची. एखाद्याच्या अंगावरून उतरवलेल्या भुताची लिंबे नजरेस पडत, आणि पाटावर समंधांचे सोपस्कार. कोणाच्या नजरेस ही देवस्की पडली की तो हमखास मला याची खबर द्यायचा. मग मी अंगावरून उतरवून पाटावर ठेवलेले नारळ फोडायचो. पाणी देवाला आणि खोबरे मला. सीमेवरच्या आंब्याच्या पारावर देवस्कीचे नाना प्रयोग केले जात. सुरुवातीला लिंबे, टाचण्या, हळद, पिंजर, अबीर, तांब्याची तार नजरेस पडायची. मग हळूहळू त्यात आणखी बदल होत गेले. कवठबावले, शिजलेल्या भाताचे मूद, त्यावर पेटलेला काकडा आणि बरेच काही. ही कामं पण ठराविकच माणसं करायची. सुरेश बिडये, मनग्या, पकल्या पोळ, बबन्या यांचा भुताटकी उतरविण्यात हातखंडा. तिन्हीसांजेच्या वेळेला त्यांना घरी बोलावून भूत उतरविलं जाई. पीडित (?) माणसाच्या अंगावरून तीन वेळा ओवाळून मनातल्या मनात काही तरी पुटपुटायचे, आणि मग जोराने ‘चऽऽऽ ल सोडून’ असं म्हणत तरातरा घराला वळसा घालून काळोखातून पसार व्हायचे. पेटत्या काकडय़ासहित उतरविलेली भुताटकी तीन तिठय़ावर ठेवून निघून जायचे. आमच्या गावच्या भुताटकीची ही अजब तऱ्हा आजही सुखेनैव चालू आहे. खरं भूत मला कधी दिसलं नाही. आजी-आजोबांकडून भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या. त्यांनीही कधी ते भूत पाहिलं नसेल. त्यांच्या आजी-आजोबांनीच त्यांना या भुताखेताच्या गोष्टी सांगितलेल्या असतील. पूर्वापार चालत आलेला हा रिवाज आम्हाला नव्या पिढीला शिकवायचा आहे. त्यासाठी या गोष्टी अधिक तिखटमीठ लावून सांगाव्या लागतील. पण यावर त्यांचा विश्वास बसेल? भुतं तीच पण कहाणी रंगतदार. रात्रीच्या वेळी काळोखातून जात असताना आपल्याला वेगवेगळे भास होतात. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या फांद्यासुद्धा आपल्याला घाबरवून टाकतात. त्यांचे आकार विचित्र वाटतात. काही फांद्या तर इतक्या भयाण वाटतात की मनात कल्पिलेली आकृती समोर उभी ठाकते. कोकणात भुतं नसतातच. असते, ती भुताटकी.