Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

बावीस-तेवीस वर्ष झाली असावीत ‘भारतीय चित्रकला’ नावाचं छोटसं आडव्या आकाराचं पुस्तक नांदेडला शिकत असताना वाचलं होतं. लेखक दाभाडे आहेत एव्हढं पक्कं लक्षात ठेवलं तेव्हापासून. मराठीतील चित्रकलेवरची फारशी पुस्तकं माहीत नव्हती. त्यांच्या विषयीच ‘प्रा. बा.मा. दाभाडे: व्यक्ती आणि वाङ्मय’ नावाचं पुस्तक नुकतंच वाचलं. निमित्तानं प्रतही मिळाली म्हणून. औंध संस्थानाचं सांस्कृतिक वैशिष्टय़ म्हणजे कीर्तन परंपरा. मध्ययुगीन इतिहासाचा समृद्ध वारसा संस्थानाला. पंतप्रतिनिधीच्या आश्रयानं पुराणिक, पालखीवाले, वादक, गोंधळी, डवरी, घडशी, नगराजी, नर्तक, गायक, वाघ्यामुरळी औंधाचे रहिवासी. यमाई माता गावाचं श्रद्धास्थान. मातेचे उपासक मरतडबुवा दाभाडे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध. गोंधळ, पोवाडे, जोगवे, अंगाई, पदे, अभंग, आरत्या उपासक आजोबा स्वत:च रचत.

नि सगळा दोराच
केशरी होऊन गेला
तू झेंडूची फुले ओवीत होतीस
नि सगळा दोराच केशरी होऊन गेला
तुझ्या नि माझ्या संबंधांबद्दल
मला येवढंच म्हणायचंय-
शंकर वैद्यंच्या या ओळी वाचल्या, आठवल्या, ऐकल्या की रंगात रंगलेली, शुभ्र दोऱ्यानं फुलं ओवताना रंगीत व्हावं इतकी समरस झालेली, प्रसन्न सौभाग्यवती मनात उभी ठाकते. ही रंगून जाण्याची आत्मिक किमया लग्नानंतरच्या पाच-सात वर्षांंत पूर्ण होऊन स्थिरावते. मेंदीचा हिरवा रंग हातात रंगतो तेव्हा लाल असतो आणि मुरतो तेव्हा अधिकाधिक गर्द होत जातो त्याला ‘मेंदी चढते’ असं म्हणतात. तसाच प्रेमाचा गुलाबी रंग तन मन चिंब करतो, मुरतो असाच गडद होत जातो आणि पती-पत्नीच्या नात्याचा एक आगळाच एकमेकांत मिसळलेला ‘श्यामरंग’ निर्माण होतो. प्रेमरसानं आणि या श्यामरंगानं काठोकाठ भरलेली, भारलेली, भारावलेली नवविवाहित जोडपी परिवारातल्या आबालवृद्धांचं लक्ष वेधून घेतात. त्यांच्या उमलत्या, बहरत्या, मोहरत्या नात्याचं गुपित माहीत असूनही एका वेगळ्याच उत्कंठेनं मोठी माणसं त्यांना बघून प्रफुल्लित होतात.

गंमत प्रयोगांची
असे कसे? असे कसे आकाश हे निळे दिसे?
असे कसे? असे कसे सूर्यास्त हा लाल असे?
मुलांनो हे प्रश्न कधीतरी तुमच्या मनात नक्कीच आले असतील. निरभ्र आकाश हे निळ्या रंगाचे तर सूर्यास्तांच्या वेळी आकाशात लाल, भगवा, गुलाबी अशा विविध रंगांच्या छटा दिसतात. या मागचे कारण आजच्या प्रयोगातून आपण जाणून घेऊ या. साहित्य : काचेचा मोठा जार, पाणी, दूध, टॉर्च, अंधार खोली.

समुद्री सफर
बंडूकाकांच्या मित्राचा मुलगा एका भारतीय कंपनीच्या मालवाहू जहाजावर सेकंड ऑफिसर होता. आनंद हिर्डे असे त्याचे नाव. बंडूकाका त्याला आनंद प्यारे म्हणत. शिक्षणाची पारंपरिक वाट न चोखाळता वेगळ्या वाटेने गेलेल्या आनंदचे त्यांना खूपच कौतुक होते. आज त्यांनी मुलांना आनंदचीच गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला. आनंदने नेव्हीगेशन जॉईन करून एक तप झालं असावं. एकावर्षी आनंदच्या कंपनीच्या जहाजाने मुंबई बंदरात नांगर टाकला. हेच निमित्त साधून बंडूकाकांनी जहाज हा प्रकार काय आहे आणि तेथील प्रत्यक्ष काम जाणून घेण्यासाठी जहाजावर आठवडाभर मुक्काम ठोकला. त्यासाठी खास कॅप्टन (जहाजावरील मालकाचा प्रतिनिधी अर्थात मास्टर) अतुलकुमार अवस्थींची परवानगी काढली.

कलाकार
बेशक मांग तेरे जो दिल में है
बंदे तुझे क्या डर है
अक्सर बदल जाती है तकदिरे
यही वो दर है।
हजरत मकदूम शाहबुद्दीन शाह बाबाच्या दग्र्याच्या बाजूला लिहिलेल्या या ओळींनी कारागृहातील बंद्याच्याच नाही तर दर वर्षी चंद्रपूरच्या कारागृहात मोहर्रमला या दग्र्यावर जो उरूस भरतो, तेथे आलेल्या दर्शनार्थींच्यादेखील दग्र्याबद्दलच्या श्रद्धा गहिऱ्या होतात. हे शब्द आहेत याच जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मंगल वरखेडेचे. त्यानेच ते तेथे पेंट केलेले आहेत.

झाले मोकळे आकाश
महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास तपासताना इंग्रजी कालखंडातील प्रबोधनात्मक चळवळींना महत्त्वाचे स्थान आहे. मराठवाडय़ात तशा प्रबोधनाच्या चळवळी रुजल्या नाहीत. पण उर्वरित महाराष्ट्राला मराठवाडय़ाची ओळख करून दिली ती स्वामी रामानंदतीर्थ, नरहर कुरुंदकर, गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव यांच्या साहित्यातून- व्यक्तिमत्त्वांनी. अशा दूर राहिलेल्या विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाने शिक्षण देऊन माणसे घडवली. या साऱ्यांमध्ये कुटुंब संस्था शेतीनिष्ठ समाजाच्या रचने बिलगून राहिली.

बदल
धावतपळत मंगल कार्यालय गाठलं. जवळजवळ साडेअकरा झाले होते. चांगलाच उशीर झाला, आता सर्वाचा ओरडा ऐकावा लागणार, अशा विचारात तेथे पोहोचली. पाहते तर.. प्रवेशद्वारावर सामसूम! कार्य आहे की नाही इतकी शांतता. तशी तयारी, सजावट सर्व काही होते पण समोर कोणी दिसेना. ‘आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना?’ अशी शंका मनात उमटली. छे.. असं होणार नाही. जरी नेहमीप्रमाणे पत्रिका माझ्या हातून गहाळ झालेली तरी लग्न दिनांक आणि स्थळ आठवत होतं, मुहूर्ताची वेळ आदल्याच दिवशी लहान भावाला फोन करून विचारली होती. त्यामुळे अशी काही चूक झाली नसावी. पाहू या.. आतमध्ये जाऊ तर खरं.. आत कार्यालयात गेले. भव्य सजवलेल्या देखण्या सभामंडपासमोर झब्बा, कुर्ता, फेटा घालून सजलेले वधूपिता इतरांसह गप्पागोष्टी करण्यात मग्न होते. हायसं वाटलं. चला.. म्हणजे आपण योग्य ठिकाणी आलो आहोत. संपूर्ण सभागृहात तशी तुरळकच माणसं होती.

हिंस्त्र उन्हाळा - मानवी जीवनातला!
रविवार ३ मे च्या दै. लोकसत्तात प्रवीण बर्दापूरकरांचा ‘िहस्त्र उन्हाळा’ हा लेख वाचण्यात आला. या लेखात बर्दापूरकरांनी १९८२-८३ च्या दरम्यानची लक्ष्मीनगर चौकातील एका आत्मदहनाची आठवण लिहिली आहे. ही आठवण वाचून मीही लगेच भूतकाळात गेलो. या आत्मदहनाचा मीही एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतो. मला आठवते, मे महिन्यातील रणरणत्या उन्हाची दुपार होती ती. दूरदर्शनसाठी वृत्त संकलन करणारा छायाचित्रकार म्हणून तेव्हा मी कार्यरत होतो. त्याशिवाय लक्ष्मीभवन चौकात माझा फोटो स्टुडिओही होता. दुपारी १ च्या सुमारास काम आटोपून लक्ष्मीनगरला घरी निघालो होतो.

प्रतिक्रिया शब्दांकन :
न.मा. जोशी देवेंद्र गावंडे प्रशांत देशमुख मोहन अटाळकर
क्रांतीकुमार ओढे प्रांजळ जैन सुरेश सरोदे सोमनाथ सावळे राखी चव्हाण
३ मे रोजीच्या रविवार वृत्तान्तमध्ये ‘हिंस्त्र उन्हाळा’, ‘होरपळ! सगळ्यांचीच!’ आणि ‘झळा ज्या लागल्या जीवा’ हे उन्हाळ्यावरील तीन लेख प्रसिद्ध झाले. या लेखांवरील या निवडक प्रतिक्रिया. उर्वरित प्रतिक्रिया पुढील रविवारी-

पुढच्या पिढींच्या बचावासाठी
संघटित होऊ या?

लोकसत्ताच्या रविवार वृत्तांतातील ‘होरपळ’ आणि ‘हिंस्त्र उन्हाळा’ या विषयावरील चिंतनपर कळा खरोखर जीवाला लागल्या. प्रवीण बर्दापूरकर, सोनाली कोलारकर-सोनार आणि राम भाकरे यांनी प्रकट केलेल्या लेखनाशी आम्ही नागपूरकर उन्हाळ्याचे होरपळग्रस्त नागरिक शतश: सहमत आहोत. या दाहक आणि चटका लावणाऱ्या उन्हाचे सर्वस्तरावरील आणि सर्व बाजूंचा विचार करून केलेल्या लेखनासाठी या तिघांचेही अभिनंदन. सोनाली कोलारकर-सोनार यांचा शिक्षण आणि परीक्षांच्या वेळापत्रकाचा मुद्या विशेष लक्षवेधी वाटला.

निमित्त, आठव, योगक्षेम आणि हॉटस्पॉट्स ही नियमित सदरे जागेअभावी प्रसिद्ध होऊ शकली नाहीत.
-निवासी संपादक