Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

‘देवनाथ मठात पारायणाची संधी मिळणे वेगळीच अनुभूती’
अमरावती, ९ मे / प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात संत तुकारामांच्या वैकुंठगमनाच्या चतु:शताब्दीनिमित्त आयोजित ‘तुकाराम गाथा पारायणा’च्या निमित्ताने देवनाथ पीठाच्या

 

परंपरेत संत तुकारामांशी थेट जोडलेला धागा आणि भक्ती परंपरेची घट्ट वीण राज्यभरातून आलेल्या भाविकांना प्रत्ययास येत आहे. तुकाराम गाथा पारायण नेहमीच आनंद मिळवून देते पण, देवनाथ मठात पारायण करण्याची संधी मिळणे ही वेगळीच अनुभूती देणारी बाब आहे, अशा भावना अनेक भक्तांनी व्यक्त केल्या.
देवनाथ मठाचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाथा पारायणाची शुक्रवारी सायंकाळपासून सुरुवात झाली. या सोहोळयात राज्यभरातून आलेले अडीच हजारावर भाविक सहभागी झाले आहेत. १६ व्या शतकात जनार्दनस्वामींपासून आणि नंतर संत एकनाथ महाराजांनी रुजवलेल्या नाथ परंपरेतील एक देवनाथ मठाची परंपरा १८ व्या शतकात अंजनगाव सुर्जी येथे आकाराला आली. देवनाथ महाराजांनी १८२१ पर्यंत मठाची गादी सांभाळली, नंतर सहा पीठाधीशांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. २००० मध्ये मनोहरनाथ महाराज निवर्तल्यानंतर जितेंद्रनाथ महाराज हे या देवनाथ मठाचे पीठाधीश झाले.
तुकारामांच्या गाथेला चारशे वर्षे होऊन गेली, तरी आजही ही गाथा लोकांना चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. देवनाथ मठातील आराधना ही संत तुकारामांच्या अभंगापासूनच सुरू होते. देवनाथ महाराजांनी अभंगात तुकारामांचा गुणगौरव केलाच आहे. त्यांच्या या अभंगातील प्रत्येक कडव्यातील आद्याक्षरांमधूनही ‘तुकाराम’ हेच शब्द तोंडी येतात. भक्तीपरंपरेतील या सर्व गोष्टी स्थळ, काळ यांच्या पलीकडच्या आहेत. देवनाथ पीठाचा हा अमूल्य असा वारसा आहे, असे जितेंद्रनाथ महाराज यांनी ‘लोकसत्ता’शी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगीतले.
संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज पंढरपूरचे नामदास महाराज, आळंदीचे पेनोरे महाराज यांच्यासह अनेक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार या गाथा पारायण सोहोळ्यासाठी खास आले आहेत. भाविकांसाठी ही पर्वनीच ठरली आहे.
तुकाराम महाराजांनी दाखवलेल्या भक्तीमार्गाशी देवनाथ मठाच्या परंपरेची जुळलेली नाळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हा पंढरपूर, आळंदी व राज्यातील अनेक भागातून आलेल्या वारकऱ्यांसह देवनाथ मठाशी जुळलेल्या भाविकांसाठी दुग्धशर्करा योगच असल्याचे मत अनेक भक्तांनी व्यक्त केले.
गाथा पारायणादरम्यान स्वत: जितेंद्रनाथ महाराज हे अभंग गातात, त्याचे निरुपण करतात आणि देवनाथ महाराजांनी रचलेल्या अभंगाद्वारे भक्तीपरंपरेची महती स्पष्ट करतात. आजच्या सत्रात संत तुकारामांच्या ‘आपुला तो देव करोनी घ्यावा’ या अभंगासह काही अभंग आणि त्यांचे निरुपण केले, तेव्हा भक्तीपरंपरेतील दुवे त्यांनी जोडले. ईश्वर शोधणे हे सर्वात सोपे आहे. देवाच्या अंगणात कुणीही येवो, त्याचे देवासोबत एकच नाते असते, ते भक्तीचे असते. परमेश्वराला कुठलीही जात नसते, मनुष्याची नीतीमत्ता टिकवण्यासाठी केली गेलेली ती तात्कालिक व्यवस्था होती. संतांनी आपल्याला व्यापक दृष्टी ठेवून जगायला शिकवले. जाती-पातीच्या या संकुचित रेषा ईश्वरालाही मान्य नाहीत. संतांच्या शिकवणुकीतूनच जगण्याचा खरा मार्ग सापडेल, असे जितेंद्रनाथ महाराज यांनी सांगितले.
काल पारायणाच्या प्रारंभप्रसंगी प्रस्तावनेत जितेंद्रनाथ महाराजांनी संत तुकारामांच्या गाथेची महती थोडक्यात विशद केली. त्याआधी संत तुकाराम आणि देवनाथ महाराजांच्या छायाचित्रांचे पूजन त्यांनी केले. नंतर हरिपाठाचे अभंग झाले आणि पारायणाला सुरुवात झाली. हा गाथा पारायण सोहळा येत्या ११ मेपर्यंत चालणार आहे.