Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात सुरू असलेल्या संत तुकारामांच्या गाथा पारायणात सहभागी झालेले मठाधीश जितेंद्रनाथ महाराज आणि राज्यभरातून आलेले भाविक.

‘देवनाथ मठात पारायणाची संधी मिळणे वेगळीच अनुभूती’
अमरावती, ९ मे / प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात संत तुकारामांच्या वैकुंठगमनाच्या चतु:शताब्दीनिमित्त आयोजित ‘तुकाराम गाथा पारायणा’च्या निमित्ताने देवनाथ पीठाच्या परंपरेत संत तुकारामांशी थेट जोडलेला धागा आणि भक्ती परंपरेची घट्ट वीण राज्यभरातून आलेल्या भाविकांना प्रत्ययास येत आहे. तुकाराम गाथा पारायण नेहमीच आनंद मिळवून देते पण, देवनाथ मठात पारायण करण्याची संधी मिळणे ही वेगळीच अनुभूती देणारी बाब आहे, अशा भावना अनेक भक्तांनी व्यक्त केल्या. देवनाथ मठाचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाथा पारायणाची शुक्रवारी सायंकाळपासून सुरुवात झाली. या सोहोळयात राज्यभरातून आलेले अडीच हजारावर भाविक सहभागी झाले आहेत. १६ व्या शतकात जनार्दनस्वामींपासून आणि नंतर संत एकनाथ महाराजांनी रुजवलेल्या नाथ परंपरेतील एक देवनाथ मठाची परंपरा १८ व्या शतकात अंजनगाव सुर्जी येथे आकाराला आली. देवनाथ महाराजांनी १८२१ पर्यंत मठाची गादी सांभाळली, नंतर सहा पीठाधीशांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. २००० मध्ये मनोहरनाथ महाराज निवर्तल्यानंतर जितेंद्रनाथ महाराज हे या देवनाथ मठाचे पीठाधीश झाले.

पालखी मिरवणूक उद्या
अंजनगावसुर्जी, ९ मे / वार्ताहर

येथील देवनाथ पीठात सुरू असलेल्या ‘जगद्गुरू तुकाराम गाथा पारायणाला’ बसणाऱ्या नाथ भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. भक्तिमय वातावरणात शिस्तबद्ध रितीने ‘तुकाराम गाथा पारायण’ सुरू असून तुकाराम महाराजांचे प्रासादिक महावस्त्र, गाथा, चरणचिन्हा सोबतच सद्गुरू श्रीनाथ महाराजांचे श्रीचरण घेऊन ११ मे रोजी गोपाळ मुहूर्तावर अंजनगावसुर्जी शहरास परिक्रमा करणाऱ्या भव्य पालखी मिरवणूक सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
तुकाराम महाराजांचे १०वे वंशज वारकरी महामंडळाचे अध्यक्ष संभाजी महाराज मोरे जगद्गुरूचे प्रासादिक महावस्त्रे घेऊन देहू वरून येथे १० मे रोजी पोहोचत आहेत. संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज शनिवारी येथे येत आहेत. या पालखी सोहोळ्यास नागपूरचे मुधोजीराजे भोसले, आळंदीचे पनोरे महाराज, अखिल भारतीय धनाचार्य प्रमुख दादा वेदक, गुरुकुंज मोझरीचे जनार्दनपंत बोथे आदी संत व वारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. पाचपावली, पाणअटाई, लालमारोती, बारगणपुरा, भालदारपुरा, राममंदिर, ओम्चौक, शनिवारपेठ, बाराहारी महादेव मंदिर, बुधवारपेठ, मेनपुरा सुर्जीमधून देवनाथ मंदिर अशा सुमारे तीन किलोमीटर परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येत आहेत. पालखी मिरवणुकीत गावोगावच्या दिंडय़ा, लेझिम व कवायत पथके सहभागी होणार आहेत. परिक्रमा मार्गावर व परिक्रमीकांच्यासाठी हजारो भगव्या पताका तयार करण्यात येत आहेत. ११ मे रोजी दुपारी पालखीचा व पारायण महायज्ञाचा समारोप श्री देवनाथ पीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज पीठ परंपरेचे सन्मानपत्र संभाजी महाराज मोरे, नामदास महाराज व मुधोजीराजे भोसले यांना प्रदान करून करतील.