Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

विविध

भारताचे सैन्य पाठविणार नाही
चेन्नई : श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठविले जाणार असल्याच्या वृत्ताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी येथे जोरदार खंडन केले. श्रीलंकेतील समस्या राजकीय तोडग्यानेच सुटेल, असेही त्यांनी नमूद केले. श्रीलंकेच्या विभाजनास विरोध दर्शवित, हा प्रश्न श्रीलंकेच्या घटनेच्या चौकटीतच सुटावा, असे ते म्हणाले. आमच्या पाठिंब्यावर केंद्रात सरकार आले तर श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठवून तामिळींसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू, असे अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी म्हटले होते. त्याबाबत छेडता पंतप्रधान म्हणाले, श्रीलंका हा सार्वभौम देश आहे आणि त्याचा हा दर्जा कायम राहिला पाहिजे. कोणतीही वक्तव्ये करताना आंतरराष्ट्रीय संकेत आणि कायद्याचे भान नेत्यांनी बाळगावे, असा टोलाही त्यांनी लगावला. कधीकधी संकुचित विचारापायी आपण व्यापक राष्ट्रीय हितालाच धोका निर्माण करतो, याचेही भान राखले पाहिजे, असेही त्यांनी सुनावले.

दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी झुमा
जोहान्सबर्ग, ९ मे/वृत्तसंस्था

हजारो लोकांच्या साक्षीने आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते जॅकब झुमा यांनी आज दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे समारंभपूर्वक स्वीकारली. वर्णद्वेषविरोधी लढय़ाने देशात लोकशाही नांदू लागल्यापासूनचे झुमा हे चौथे राष्ट्राध्यक्ष आहेत. आजच्या समारंभास माजी अध्यक्ष व वर्णद्वेषविरोधी लढय़ाचे प्रणेते नेल्सन मंडेला यांची उपस्थिती नजरेत भरणारी होती. झुमा हे रविवारी आपले मंत्रिमंडळ जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेतील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाले. या निवडणुकीत झुमा यांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने ६० टक्के मते मिळविली आहेत. बुधवारी राष्ट्राध्यक्षपदी झुमा यांची निवड करण्याचा ठराव पार्लमेंटमध्ये संमत झाला.

पूर्वाचल महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सव
सुरेंद्र कुलकर्णी

दिल्ली महानगराच्या पूर्व भागातील, तसेच जोडून असलेल्या उत्तर प्रदेशांतील काही विभागात राहणाऱ्या मराठी भाषक मंडळींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘पूर्वाचल महाराष्ट्र मंडळा’चा रौप्य महोत्सव येथील महाराष्ट्र रंगायतन प्रेक्षागृहात अलीकडेच पार पडला. सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची ‘मुलुखावेगळी माणसं’ ही प्रेक्षकांबरोबरची अनौपचारिक गप्पांची मैफल हे या समारंभाचे प्रमुख वैशिष्टय़ होते. अध्यक्षस्थानी कृषीशास्त्रज्ञ आणि पूसा मराठी मंडळाचे अध्यक्ष सी. डी. माई होते. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकात श्रीकांत करंजगावकर यांनी संस्थेच्या २५ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. मंडळ स्थापना करणाऱ्या उपस्थित सभासदांना, हयात नसलेल्या सभासदांच्या नातेवाईकांना तसेच दिल्लीतील अन्य मराठी संस्थांच्या प्रतिनिधींना, रौप्य महोत्सवाची आठवण म्हणून स्मृतिचिन्हे देण्यात आली. डॉ. सी. डी. माई यांना मधुकर परांजपे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

श्रीलंकेत ८० तामिळी अतिरेकी ठार
कोलंबो, ९ मे/वृत्तसंस्था

श्रीलंकेत ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ (एलटीटीई) या तामिळी अतिरेक्यांच्या संघटनेविरोधातील लष्करी कारवाई धडीडीने सुरूच असून आज धुमश्चक्रींत ८० अतिरेकी ठार झाले. श्रीलंकेच्या नौदलाने अतिरेक्यांच्या दोन नौकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात या बोटी बुडाल्या असून १४ अतिरेकी मृत्युमुखी पडले. अतिरेक्यांच्या कब्जाखालील उत्तर भागातही सैन्याची आगेकूच सुरू असून तेथील धुमश्चक्रीत ६६ अतिरेकी मृत्युमुखी पडले आहेत.

नेपाळमधला तिढा अद्याप कायम
काठमांडू, ९ मे / वृत्तसंस्था

नेपाळमधील सरकारस्थापनेसाठी अध्यक्षांनी दिलेली शनिवारची मुदत संपत येत असली तरी सरकारस्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काळजीवाहू पंतप्रधान प्रचंड यांनी मात्र सर्व पक्षांमध्ये सहमतीने निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.