Leading International Marathi News Daily
सोमवार, ११ मे २००९

उद्धव-पवार चर्चा
मुंबई, १० मे/प्रतिनिधी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. उद्धव ठाकरे सध्या लंडनमध्ये असून शरद पवार दक्षिण आफ्रिकेत असल्याचे समजते. १६ मेनंतर करायच्या राजकीय आखणीबाबत हे दोन्ही नेते दूरध्वनीवरून बोलल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे सध्या सहकुटुंब लंडनमध्ये असले तरी देशातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लुधियाना येथील रालोआच्या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी यांना पाठवून आपण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत असल्याचे त्यांनी दाखविले असताना दुसरीकडे ठाकरे-पवार संभाषणाचे वृत्त आल्याने शिवसेना वेळप्रसंगी काही वेगळी भूमिका घेऊ शकते, असे संकेत प्राप्त होत आहेत.

पुण्याची कृष्णा निघाली एव्हरेस्ट सर करायला!
सागर वैद्य, नगर, १० मे

पुण्यातील कृष्णा माधव पाटील ही १९ वर्षांची युवती जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायला निघाली आहे. एशियन ट्रेकिंग संस्थेच्या वतीने आयोजित ‘इको एव्हरेस्ट एक्सपीडिशन २००९’ या मोहिमेत सहभागी झालेल्या १८ गिर्यारोहकांमध्ये ती एकमेव भारतीय आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास कृष्णा देशातील सर्वात तरुण ‘एव्हरेस्टवीर’ ठरेल. नृत्य, गिर्यारोहण व अन्य साहसी क्रीडा प्रकारांची आवड असलेल्या कृष्णाचे १२वीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये झाले. नंतर बंगलोर येथील अट्टाकलरी इन्स्टिटय़ूट फॉर डान्स अँड आर्टमधून तिने नृत्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. र्मचट नेव्हीत अधिकारी असलेले वडील माधव व डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका असलेली आई रंजना यांच्या पाठिंब्यामुळे कृष्णाने आपली आवड जोपासली. सप्टेंबर ०८मध्ये कृष्णाने नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेरिंग संस्थेच्या वतीने आयोजित ‘गंगोत्री ग्लॅशर’ या प्री-एक्सपीडिशनमध्ये भाग घेतला. बेसिक अ‍ॅडव्हेंचर आणि अ‍ॅडव्हान्स कोर्समध्ये तिला ‘ए’ ग्रेड मिळाला. समुद्रसपाटीपासून ७ हजार ७५ मीटर उंचीपर्यंत गिर्यारोहण करण्याचा अनुभवही कृष्णाने मिळविला.

हबल दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी
आज अ‍ॅटलांटिस झेपावणार
वॉशिंग्टन, १० मे/ पीटीआय
सध्या अवकाश निरीक्षणाचे काम अत्यंत सक्षमपणे करीत असलेल्या हबल दुर्बिणीची दुरुस्ती करण्याच्या जोखमीच्या मोहिमेसाठी नासाचे अ‍ॅटलांटिस हे स्पेस शटल उद्या उड्डाण करणार आहे. या मोहिमेत सात अंतराळवीरांना पाठवण्यात येत आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे, की यात जोखीम असली तरी कुठलीही चूक होऊ दिली जाणार नाही. हबल अंतराळ दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी ही पाचवी व शेवटची मोहीम आहे. सर्व काही सुरळीत पार पडले व दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे झाले तर या दुर्बिणीला आणखी पाच वर्षांचे वाढीव आयुष्य मिळणार आहे. विशेषत: ग्रह-तारे व दीर्घिकांच्या निरीक्षणात या दुर्बिणीने आतापर्यंत मोलाची भूमिका पार पाडली आहे व अतिशय विलोभनीय अशी छायाचित्रेही पाठवली आहेत. नासाच्या विज्ञान मोहिमांचे सहायक प्रशासक एड वेलर यांनी सांगितले, की दुर्बिणीची दुरुस्ती यशस्वी झाली तर १०-१५ वर्षांचे आयुष्य गृहीत धरलेल्या हबल प्रकल्पासाठी ते वरदानच ठरणार आहे. त्याचबरोबर दुरुस्तीनंतर ही दुर्बीण आणखी कार्यक्षमपणे काम करायला लागेल व तिचे आयुष्य पाच वर्षांनी वाढेल. हबल दुर्बीण १९९० मध्ये अंतराळात सोडण्यात आली होती व खगोलशास्त्राच्या इतिहासात तिचे अवकाश निरीक्षणाचे साधन म्हणून असलेले महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. या दुर्बिणीनंतर आता पुढील वर्षी जेम्स वेब ही दुर्बीण हबल दुर्बिणीची जागा घेण्यासाठी जाणार आहे.

अनेक ऐतिहासिक घटनांचे तसेच कित्येक क्रांतिकारक, देशभक्तांनी केलेल्या बलिदानाचे साक्षीदार असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहाचे बांधकाम सुरू असतानाचे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र उपलब्ध झाले असून ते १८६६ ते १८८० या कालावधीतील असावे. अत्याचारी ब्रिटिश अधिकारी रँडला कंठस्नान घालणाऱ्या क्रांतिकारक चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा दिल्याच्या घटनेस शंभर वर्षे पूर्ण झाली. ते निमित्त साधून पुण्याच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे मंदार लवाटे आणि समीर निकम सदर दुर्मिळ छायाचित्र सोमवारी येरवडा कारागृहास भेट देणार आहेत.

लोणावळा येथील रिसॉर्टमध्ये
अल्पवयीन गाथाचा मृत्यू

मुंबई, १० मे / प्रतिनिधी

गाथा, वय वर्षे पाच..लोणावळा येथील एका रिसॉर्टमध्ये पोहण्याच्या तलावात खेळत होती. अचानक गाथा गायब झाली..कोणाला काहीच कळले नाही..बऱ्याच कालावधीनंतर जीवरक्षकांनी गाथाचा मृतदेह या तलावातून बाहेर काढला..लोणावळा येथील ‘व्हिझलिंग वूडस्’ रिसोर्टमध्ये ही घटना परवा शुक्रवारी घडली. या घटनेमुळे गाथाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एस. टी. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकूंद धस यांची गाथा ही एकुलती एक मुलगी. गाथा आपल्या आईसोबत शुक्रवारी लोणावळा येथील सदर रिसॉर्टमध्ये गेली होती.

मनसे फॅक्टरची चर्चा करण्याकरिता
भाजपची उद्या बैठक
मुंबई, १० मे/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राज्यभर मिळालेले सहकार्य, मतपेटीत बंद झालेली मनसेची संभाव्य ताकद आणि केंद्रात सरकार येणार असल्यास महाराष्ट्रातून कोणती रसद पुरवली जाऊ शकते या बाबींची या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे समजते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला लोकसभेचे उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रमुख यांनाही बोलावले आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदानोत्तर परिस्थितीचा अहवाल या बैठकीत सादर केला जाणार आहे. भाजपच्या वाटय़ाच्या काही मतदारसंघात शिवसेनेकडून पुरेशी साथ मिळाली नाही, अशा भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत.

‘मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर भारतामध्ये आणखी हल्ले चढविले जाण्याचा गंभीर धोका’
वॉशिंग्टन, १० मे/पीटीआय

मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर भारतामध्ये भविष्यात आणखी हल्ले चढविले जाण्याचा गंभीर धोका आहे असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे विश्वासू सहकारी व सीआयएचे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी दिला. पाकिस्तानी लष्कराने आपल्या देशाच्या पश्चिम सीमेवरच गुंतून पडावे तसेच आदिवासी भागामध्ये हे लष्कर पुन्हा तैनात करण्यात येऊ नये असे जिहादी प्रवृत्तींचे प्रयत्न असल्याचेही रिडेल पुढे म्हणाले.
अफगाणिस्तान व पाकिस्तानसंदर्भात ओबामा सरकारने ठरविलेल्या धोरणाच्या आखणीत रिडेल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

छोटा शकील टोळीतील अनिल म्हात्रे एन्काउंटरमध्ये ठार
मुंबई, १० मे / प्रतिनिधी

खून आणि खंडणी यासारख्या २२ गुन्ह्याचे आरोप असलेला छोटा शकील टोळीतील कुख्यात गुंड अनिल म्हात्रे काळाचौकी येथे झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार झाला. याबाबत अधिक माहिती देताना मुंबईचे पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, आज पहाटे साडेसहा वाजता पेनिन्सुला टॉवरनजीक मुंबई पोलिसांनी म्हात्रे याला घेरले आणि शरण येण्यास सांगितले. परंतु अनिल म्हात्रेने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अनिल म्हात्रे जखमी झाला. ताबडतोब त्याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. म्हात्रेने पोलिसांवर चार गोळ्या झाडल्या तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल तीन गोळ्या झाडल्या.

‘डॉल्फिन’च्या नेटवर्कने केले मुंबईकरांना हैराण
मुंबई, १० मे / प्रतिनिधी

महानगर टेलिफोन निगमच्या ‘डॉल्फिन’ मोबाईल सेवेने आज रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांना चांगलेच हैराण केले. ‘डॉल्फिन’च्या सेवेच्या अधुनमधून कुरबुरी सुरू असताचच. परंतु आज मात्र ‘डॉल्फिन’ची शहरातील सेवा ऑप्टिकल फायबर लाईन तुटल्याने ठप्प झाली. ‘डॉल्फिन’चे नेटवर्क आज दुपारपासून अचानक बंद पडले. मात्र काहींचे सुरू होते. परंतु कुणाचेही फोन लागत नव्हते. दुपारनंतर तर या सेवेच्या मोबाईलधारकांचा संपर्कच तुटला. शहरातील लाईन्स नियंत्रित करणारी ‘डॉल्फिन’ची ऑप्टिकल फाबर लाईन तुटल्यामुळे नेटवर्क बंद पडल्याचे सांगण्यात आले.

२६/११सारखा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता
वॉशिंग्टन, १० मे/पीटीआय

मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर भारतामध्ये भविष्यात आणखी हल्ले चढविले जाण्याचा गंभीर धोका आहे असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे विश्वासू सहकारी व सीआयएचे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी दिला. पाकिस्तानी लष्कराने आपल्या देशाच्या पश्चिम सीमेवरच गुंतून पडावे तसेच आदिवासी भागामध्ये हे लष्कर पुन्हा तैनात करण्यात येऊ नये असे जिहादी प्रवृत्तींचे प्रयत्न असल्याचेही रिडेल पुढे म्हणाले.
अफगाणिस्तान व पाकिस्तानसंदर्भात ओबामा सरकारने ठरविलेल्या धोरणाच्या आखणीत रिडेल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावात वाढ व्हावी या उद्देशाने भारतामध्ये मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर आणखी हल्ले चढविण्याचा व त्यायोगे पाकिस्तानच्या लष्कराला आपले ८० टक्के सैनिक भारताला लागून असलेल्या सीमेवर तैनात करणे भाग पडावे असा डाव जिहादी प्रवृत्तींनी आखला आहे.
पाकिस्तानातील जिहादींचा ‘फ्रॅकेनन्स्टिन मॉन्स्टर’ असा उल्लेख करून रिडेल यांनी ‘कौन्सिल फॉर फॉरिन रिलेशन’ या संघटनेच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हटले आहे की, भारत व पाकिस्तान सीमेवर सतत तणाव राहावा व त्यायोगे पाकिस्तानी लष्कराचे आपल्याकडे असलेले लक्ष अन्यत्र वळवावे असा पाकिस्तानातील जिहादी प्रवृत्तींचा डाव आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी