Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
सरकारने १ मे २००९ पासून नवीन पेन्शन योजना सुरु केली आहे. या पेन्शन योजनेबाबत विविध पातळ्यांवर भिन्न प्रतिक्रिया येत आहेत. याची माहिती देणारा लेख आम्ही सोबत प्रसिध्द केला आहे. या योजनेबाबत नेमके तुम्हाला काय वाटते? अमेरिका, युरोपच्या सामाजिक सुरक्षितता योजनेचा विचार करता आपल्याकडील योजनेत किती साम्य आहे? सध्याच्या योजनेत कोणत्या त्रुटी आहेत? यात कोणत्या सुधारणा कराव्यात? यासंबंधी आपल्या काही सूचना असल्यास ‘लोकसत्ता’च्या मुंबई कार्यालयाकडे पाठवाव्यात. चांगल्या सूचनांना प्रसिध्दी दिली जाईल.
‘पेन्शन नव्हे, हा तर प्राण आहे प्रत्येकाचा!’ हे घोषवाक्य घेऊन पी.एफ.आर.डी.ए.ने प्रत्येक भारतीयासाठी नवीन पेन्शन योजना (न्यू पेन्शन सिस्टीम) म्हणजेच एन.पी.एस. सादर केली आहे. भारतात गेल्या साठ वर्षांत प्रथमच प्रत्येक नागरिकाला उपलब्ध असणारी ही परिपूर्ण पेन्शन योजना सर्वाच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात एक क्रांती करणार आहे. पेन्शन हा शब्दच सर्वाच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे. सरकारी नोकरीत निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन हे एक अनिवार आकर्षण असते. निवृत्तीनंतरचे जगणे सुसह्य़ बनवणारी पेन्शन ही आजपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचीच मिरासदारी होती. अर्थात या पेन्शनसाठी

 

सरकार त्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम दरमहा कापून घेत असे. मात्र जिवंत असेपर्यंत सरकारी पेन्शन ही एक निवृत्तीनंतरची आशादायक सोय होती. याच वेळी इतर सर्व नागरिक मात्र त्यापासून वंचित राहिलेले होते. शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, कलाकार, मजूर, कारागीर, हातावर पोट भरणारे, असंघटित आणि घरेलू कामगार, नियमित उत्पन्न असणारे असे अनंत प्रकारचे नागरिक पेन्शन योजनेपासून वंचित होते. पैसा असूनही आणि पेन्शनसाठी नियमितपणे बचत करायची क्षमता असूनही तशी एखादी योजना उपलब्ध नव्हती. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, एल.आय.सी.ची जीवन अक्षय योजना आणि पोष्टाची मासिक प्राप्ती योजना असे दोन-तीन पर्याय सोडल्यास पैसा असूनही पेन्शन मिळवून देणारी अशी स्वतंत्र योजना उपलब्ध नव्हती. शिवाय पी.पी.एफ. आणि पोष्टाच्या मासिक योजनेतही कमाल गुंतवणुकीवर मर्यादा होती.
केंद्र सरकारने पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अॅथोरिटीच्या (PFRDA) माध्यमातून आता प्रत्येक भारतीय नागरिकासाठी नवीन पेन्शन योजना जाहीर केली आहे. संपूर्ण देशात १ मे २००९ पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेत सामील होण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
१) सभासदाचे वय १८ वर्षांहून अधिक आणि ५५ वर्षांहून कमी असावे.
२) तो भारताचा नागरिक असावा. भारतीय नागरिक असलेले अनिवासी भारतीयदेखील या योजनेत सामील होऊ शकतील.
३) ही योजना सर्व भारतीय नागरिकांना संपूर्ण भारतात सर्वत्र खुली आहे.
नवीन पेन्शन योजनेची कार्यपद्धती
प्रत्येक सभासद नवीन पेन्शन योजनेसाठी सबस्क्रायबर रजिस्ट्रेशन फॉर्मद्वारे विशिष्ट नमुन्यामध्ये (UOS-S1) अर्ज करेल. हा अर्ज पीएफ. आर. डीएने निर्धारित केलेल्या २२ सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये दाखल करेल. हा अर्ज दाखल करताना त्याला अर्जासोबत किमान रु. ५०० एवढी रक्कम भरावी लागेल. हा अर्ज मिळाल्यावर त्याची छाननी करून त्या सभासदाला प्राण क्रमांक म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर दिला जाईल. पॅन नंबरप्रमाणे हा प्राण नंबर सभासदाबरोबर आयुष्यभर राहील आणि संपूर्ण भारतात कोठूनही त्याला आपले रिटायरमेंट अकाऊंट चालवता येईल. दरवर्षी सभासदाला आपल्या खात्यात किमान रु. ६०००/- (सहा हजार फक्त) इतकी रक्कम भरावी लागेल. तसेच त्याला वर्षांतून किमान चार वेळा त्याच्या रिटायरमेंट अकाऊंटवर रक्कम भरावी लागेल. वर्षांतून चार पेक्षा जास्त वेळा कितीही रक्कम भरता येईल. तसेच रु. ६०००/-हून जास्त कितीही रक्कम भरता येईल. त्यावर कमाल मर्यादा नाही. मात्र एका वेळी रक्कम भरताना ती किमान रु. ५०० एवढी असली पाहिजे. नवीन पेन्शन योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कलम ८० सी नुसार रु. १,००,००० पर्यंत करमुक्त असणार आहे. या करमुक्त मर्यादेत इतर गुंतवणूक उदा. विमा हप्ता, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट इ. समाविष्ट आहेत. योजनेचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे यात पी.पी.एफ. प्रमाणे कमाल रक्कम गुंतवणुकीवर कोणतेही बंधन नाही. पीएफआरडीएने संपूर्ण देशात २२ संस्थांना ग्राहकांना सेवा देण्यासाठी पी.ओ.पी. (पॉइंट ऑफ प्रेझेन्स) म्हणून नेमलेले असून ते त्यांच्या सव्र्हिस प्रोव्हायडर्स मार्फत म्हणजे पी.ओ.पी. एस.पी. मार्फत ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा देतील.
त्यापैकी प्रमुख संस्था पुढीलप्रमाणे : १) अलाहाबाद बँक २) अॅक्सिस बँक ३) सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४) सिटी बँक ५) आयसीआयसीआय बँक ६) आयडीबीआय बँक ७) कोटक महिंद्रा बँक ८० ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ९) स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या समूह बँका १०) साऊथ इंडियन बँक ११) युनियन बँक १२) एल.आय.सी. ऑफ इंडिया १३) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया १४) रिलायन्स कॅपिटल लि. १५) आय.एल.एफ.एस. सिक्युरिटीज लि. १६) कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्र्हिसेस प्रा.लि. या सर्वाची यादी व पत्ते पीएफआरडीएच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
नवीन पेन्शन योजनेसाठी मुख्य ट्रस्टी बँक म्हणून बँक ऑफ इंडियाची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एनपीएस ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून ते या योजनेचे प्रायोजक आहेत. या सर्व योजनेची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याकरिता सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग आणि रजिस्ट्रार म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही सरकारी संस्था काम करणार आहे. या योजनेत जमा केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारी पेन्शन ही सभासदाच्या नावावर त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी शिल्लक असणाऱ्या फंड रकमेवर अवलंबून असणार आहे. यासाठी या योजनेत सामील होतानाचे वय, गुंतवणुकीसाठी निवडलेला ऑप्शन आणि साठाव्या वर्षी शिल्लक असणाऱ्या किती रकमेवर अॅन्युएटी घ्यायची या बाबी महत्त्वाच्या आहेत. ही योजना दोन स्तरांवर म्हणजे टायर-एक आणि टायर-दोन अशी राबविली जाणार असून टायर-एक ही योजना आता सुरू झाली आहे. यानुसार निवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे साठीपर्यंत या योजनेतून पैसे पूर्णपणे परत काढता येणार नाहीत. टायर-२ वरील योजना मात्र बचत खात्यासारखी असून त्यातील पैसे कधीही परत काढता येतील. या स्तराचे तपशील सहा महिन्यांनंतर जाहीर करण्यात येतील.
नवीन पेन्शन योजनेतून पेन्शन रक्कम कशी मिळेल?
१) पर्याय अ: वय वर्षे साठ पूर्वी रक्कम काढायची असल्यास: प्राण रिटायरमेंट अकाऊंटमधील शिल्लक रकमेपैकी ८० टक्के रक्कम इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अॅथोरिटीने लायसन्स दिलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त आयुर्विमा कंपनीच्या अॅन्युएटी पेन्शन देणाऱ्या योजनेत गुंतवावी लागेल. ती कंपनी सभासदाला दरमहा आयुष्यभर पेन्शन देईल. उरलेली २० टक्के रक्कम रोख परत मिळेल.
२) पर्याय ब: वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर: प्राण रिटायरमेंट अकाऊंटमधील शिल्लक रकमेपैकी किमान ४० टक्के रक्कम इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथोरिटीने लायसन्स दिलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त आयुर्विमा कंपनीच्या अॅन्युएटी पेन्शन देणाऱ्या योजनेत गुंतवावी लागेल. ती कंपनी सभासदाला दरमहा आयुष्यभर पेन्शन देईल. उरलेली ६० टक्के रक्कम रोख परत घेता येईल. ही रक्कम एकरकमी नको असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत दरवर्षी हप्त्याने किंवा टप्प्याटप्प्यानेही मिळवता येईल. त्यावर उत्पन्नही मिळत राहते. वयाच्या सत्तर वर्षांनंतर मात्र हे प्राण रिटायरमेंट अकाऊंट बंद होते आणि सर्व रक्कम सभासदाला परत मिळते.
नवीन पेन्शन योजनेतील पैसे सरकारी रोखे, मान्यताप्राप्त सरकारी योजना तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवले जाणार आहेत. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट येथे ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न आणि पेन्शन यांची कोणतीही हमी दिलेली नाही. बाजारातील चढ उतार आणि मिळणारे उत्पन्न यावर हे सर्व अवलंबून आहे. मात्र यातील गुंतवणुकीचे काही पर्याय हे अत्यंत कमी जोखीम असणारे असून त्याद्वारे गुंतवलेल्या रकमेवर अत्यंत कमी जोखीम घेऊनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकेल. या योजनेत १ एप्रिल २००८ रोजी सरकारी नोकरांच्या रु. २१०० कोटींच्या गुंतवणुकीवर सरासरी १४.५ टक्के दराने उत्पन्न मिळालेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पी.एफ.आर.डी.ए.ने पेन्शन फंडमधील गुंतवणूक इक्विटी शेअर मार्केटमध्ये करण्यावर ५० टक्के ही कमाल मर्यादा घातली आहे. यात सभासदांना खालीलप्रमाणे गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत. याला अॅक्टिव्ह ऑप्शन असे म्हटले आहे.
१) पर्याय ई :- इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमधील रोख्यात केलेली गुंतवणूक.
२) पर्याय जी :- गव्हर्मेट म्हणजे सरकारी रोख्यात केली जाणारी गुंतवणूक.
३) पर्याय सी :- ठराविक उत्पन्न देणाऱ्या मुदत ठेवींमधील गुंतवणूक.
सभासदाला जर गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेण्याचे कौशल्य नसेल तर त्याच्यासाठी ऑटो ऑप्शन असून त्यात ३५ वर्षांपर्यंत इक्विटीमध्ये ५० टक्के आणि सरकारी योजनांत २० टक्के असा पर्याय असून तो ५५ वर्षांपर्यंत सरकारी रोख्यात ८० टक्के आणि इक्विटी रोख्यामध्ये १० टक्के असा कमी होत जातो. या द्वारेउत्तम प्रकारे जोखीमीवरील गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले जाईल. या योजनेसाठी फंड मॅनेजर म्हणून खालील सहा कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
१) युटीआय रिटायरमेंट सोल्यूशन लि. २) एस.बी.आय. पेन्शन फंडस् प्रा. लि. ३) आयडीएफसी पेन्शन फंड लि. ४) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनी लि. ५) रिलायन्स कॅपिटल पेन्शन फंड लि. ६) कोटक महिंद्रा पेन्शन फंड लि.
प्रत्येक सभासदाला या योजनेसाठी अर्ज करताना गुंतवणुकीसाठीचा ऑप्शन निवडणे त्याचप्रमाणे फंड मॅनेजरची निवड करणे आवश्यक आहे. नवीन पेन्शन योजनेसाठी अर्ज करताना आयडेंटीप्रूफ आणि अॅड्रेसप्रूफ देणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या बचत खात्याची माहिती देणेही उपयुक्त आहे.
प्राण अकाऊंट चालू ठेवण्यासाठी पीएफ आरडीए ने वार्षिक व अन्य चार्जेस निर्धारित केलेले असून वर्षांला रु. ३५० एवढी रक्कम अकाऊंट मेन्टेनन्स चार्जेस म्हणून घेतली जाणार आहे. फंड मॅनेजमेंट म्हणून मात्र वर्षांला फक्त ०.०००९ टक्के इतकी कमी रक्कम आकारली जाणार असून ही रक्कम संपूर्ण जगात सर्वात कमी आहे, असा दावा पी एफ आर डी ए ने केलेला आहे. ज्याप्रमाणे रिझव्र्ह बँक देशातील बँकिंग, आयआरडीए देशातील विमा क्षेत्र, ट्राय टेलिफोन आणि मोबाइल क्षेत्र नियंत्रित करते त्याप्रमाणे पीएफ आरडीए देशातील पेन्शन गुंतवणूक क्षेत्र नियंत्रित करेल. नवीन पेन्शन योजना चालू करतानाच त्यातील ग्राहकांच्या संभाव्य तक्रारींसंदर्भात एक सोपी आणि सुटसुटीत तक्रार निवारण प्रणाली पीएफआरडीए ने आताच कार्यान्वित केली आहे. यावर प्रत्यक्ष टेलिफोन आणि इंटरनेटद्वारा ग्राहक तक्रारींवर दाद मागू शकतो.
नवीन पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी सभासद पेन्शन सल्लागाराची मदत घेऊ शकतो. प्राण रिटायरमेंट अकाऊंट उघडण्यापासून ते त्यात कशाप्रकारे सहभागी व्हायचे, गुंतवणूक कशी करायची, गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यातील अडीअडचणी कशा सोडवायच्या याबाबत पेन्शन सल्लागार र्सवकष मार्गदर्शन करू शकतील. ही योजना विकण्यासाठी कोणताही एजंट तुमच्या मागे लागणार नाही. कारण या योजनेत विम्याप्रमाणे एजन्सी चॅनेल समाविष्ट केलेले नाही. सगळ्यात मुख्य म्हणजे ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांना स्वत:हून पी.ओ.पी.कडे संपर्क साधायचा असून दरवर्षी स्वत:चे काँट्रीब्यूशन जमा करायचे आहे. आपली निवृत्ती डोळ्यासमोर ठेवून आपणाला स्वत:लाच ही योजना कार्यान्वित ठेवायची आहे.
सुखी आणि आत्मनिर्भर निवृत्ती हे प्रत्येकाचे स्वप्न असते. विकसित देशात पेन्शन फंडस् अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. सामाजिक सुरक्षिततेचे ते एक साधन आहे. वृद्धापकाळातील गरजांसाठी स्वत:च्या तरुणपणातच आर्थिक तरतूद करणे हे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक बनले आहे. नेमकी
त्याचवेळी ही नवीन पेन्शन योजना जाहीर झालेली आहे. ही योजना नावीन्यपूर्ण तितकीच वेगळी आहे. त्यामुळे यात आपण स्वत:, पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवार सर्वाना या योजनेची माहिती देऊन सहभागी करून घेतले पाहिजे. व्यापक सामाजिक स्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. या योजनेची सर्व माहिती पी.एफ.आर.डी.ए.च्या www.pfrda.org.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी नवीन पेन्शन योजना आता आपल्या दारात उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांपासून, मिळवत्या स्त्रिया, बचतगटातील महिला, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, मोलकरणी यापासून हमाल, मजूर, कामगार, कारागीर, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, विक्रेते, उद्योजक सर्वासाठी ही योजना उपयुक्त आहे. याचबरोबर प्रत्येक कमावता पुरुष त्याच्या घरकाम करणाऱ्या पत्नीसाठी नवीन पेन्शन योजना सुरू करू शकेल आणि तिच्या संसारातील सहभागाचे खऱ्या अर्थाने चीज करू शकेल. आपल्या निवृत्ती नंतरच्या जीवनात खरोखरच प्राण फुंकणाऱ्या या नवीन पेन्शन योजनेत आता आपण प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे.
प्रा. क्षितिज पाटुकले
patukalesir@gmail.com