Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

जी-२० चे फलित
लंडन येथे अलीकडेच झालेल्या शिखर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आय.एम.एफ. (International Monetary Fund) वर्ल्ड बँक (World Bank) आणि एफ.एस.बी. (Financial Stability Board) या संस्थांकडे सोपविली. गेल्या सप्ताहात आय.एम.एफ. आणि वर्ल्ड बँक यांच्या वसंतकालीन बैठका वॉशिंग्टन येथे झाल्या. त्यात अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्या आढाव्याचा हा ताळेबंद नि त्यावर भाष्य.
मंदीवर मात करणारच : आय.एम.एफ.ने धोरण-दिशा ठरविण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी २४ सदस्य राष्ट्रांची एक सुकाणू-समिती नेमलीय. जी, आय.एम.एफ.सी. (International Monetary and Financial Committee) या

 

नावाने ओळखली जाते. भारत या समितीचा सदस्य आहे. सध्या या कमिटीचे अध्यक्ष इजिप्तचे अर्थमंत्री युसूफ ब्यूट्रॉस घाली आहेत. त्यांनी म्हटलंय की, मंदीचे ढग निवळण्याची अस्पष्ट चिन्हं उमटत आहेत, पण आकाश निरभ्र नेमकं केव्हा होईल हे सांगणं कठीण. या वर्षांअखेर (२००९) जागतिक अर्थव्यवस्था ९.३ टक्क्याने संकुचित पावेल आणि २०१०-११ च्या आसपास विकसित व्हायला प्रारंभ होईल असा एक ढोबळ अंदाज आजच्या घटकेला व्यक्त करता येण्यासारखा आहे. हे अंदाज वेळोवेळी बदलत जाण्याची शक्यता अंदाज वर्तवणारे नजरेस आणायला विसरत नाहीत.
आय.एम.एफ.चे प्रमुख अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर ब्लॅन्चार्क यांनी म्हटलंय की, आजच्या घटकेला जागतिक अर्थव्यवस्था परस्परांविरुद्ध वाटणाऱ्या प्रवाशांनी कोलमडण्याच्या स्थितीत आहे. कारण दिवसेंदिवस मागणी (Demand) क्षीण होत चाललीय. जगाच्या तीन-चतुर्थाश भागांत दरडोई उत्पादन तीव्रतेने कमी होत आहे. अशा वेळी भरघोस सरकारी गुंतवणूक झाली तर हळूहळू वेगवेगळ्या दिशांनी वाहणारे प्रवाह एकाच म्हणचे स्थिरतेच्या नि विकासाच्या दिशेने वाहतील नि वाढीची (growth) नैसर्गिक प्रक्रिया बळावत जाईल. कोणतीही आजारी व्यक्ती पूर्णपणे तेव्हाच बरी होते जेव्हा तिच्या अंगी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. सरकारी गुंतवणुकीचं टॉनिक ही शक्ती निर्माण करण्यासाठी मदत करते. सदैव टॉनिक घेतल्याने रोगाचं निर्मूलन नाही होत. तसंच सदैव सरकारी गुंतवणुकीच्या कुबडय़ा प्रगतीपथावरची वाटचाल नाही होत.
वसंतकालीन बैठकीच्या प्रारंभीच आय.एम.एफ.सी.ने खालील मुद्दे अधोरेखित केले आहेत.
मंदीवर मात करणारच.
निर्णयांच्या अंमलबजावणीचा सतत पाठपुरावा करणार.
स्वत:भोवती सुरक्षा कवच’ उभारण्याच्या धोरणाचा नि कृतीचा कोणत्याही राष्ट्राने अवलंब न करणे.’
जागतिक अर्थव्यवस्थेला नि अर्थप्रणालीला विघातक ठरणाऱ्या हालचालींवर जागता पहारा ठेवणे.
आय.एम.एफ.च्या साधनसामुग्रीत भर घालणे.
आय.एम.एफ.च्या कर्जवितरण पद्धती नि त्या संदर्भातील अटी यांच्यात सुधारणा करणे.
अल्प उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रांची मदत करणे.
अल्प उत्पन्न असणारी आणि उगवती (emerging) राष्ट्रं यांचा आय.एम.एफ.च्या कार्यात सहभाग वाढविणे.
आय.एम.एफ.ची कार्य-पद्धती सुधारणे.
मंदीची आणीबाणी संपल्यानंतर पुढे काय आणि कसे यासंबंधी धोरण ठरविणे (Exit strategy).
भाष्य : वर अधोरेखित केलेली सर्व ध्येय-धोरणं हा खूप मोठय़ा प्रमाणात शाब्दिक डोलारा आहे. यातले जे काही अमलात यायचे आहे ते अत्यल्प आहे आणि ते अमलात यायला वर्ष-दीड वर्ष सहज लागणार म्हणजे तोपर्यंत मंदीची लाट आपसूक ओसरायला लागेल.
आय.एम.एफ.ला मोठी चिंता सतावते आहे ती अशी की, मंदीवर मात करण्यासाठी ज्या ‘भरघोस’ आर्थिक कर्जवितरणाचा कार्यक्रम राबविण्याच्या संकल्पना नि स्किम्स् आखल्या जात आहेत त्या काम आटोपताक्षणी म्हणजे मंदी ओसरल्याबरोबर कशा मागे घ्यायच्या. सर्दी-खोकल्याच्या आजाराविषयी असं म्हटलं जातं की तुम्ही औषध घेतलं तर एका आठवडय़ात नि न घेतलं तर सात दिवसांत तिचा (सर्दीचा) जोर कमी होतो. आय.एम.एफ.ने तर आजाऱ्याला औषध पोहोचण्यापूर्वीच ते केव्हा आणि कसं बंद करायचं याचा विचार सुरू केला आहे.
आय.एम.एफ. म्हणजे आमची ध्येय-धोरणं नि उपाययोजना यशस्वी होण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या सरकारांनी प्रचंड प्रमाणात विकास-योजना राबवाव्यात असा साळसूद सल्ला दिला आहे. मंदीची लाट ओसरण्यासाठी आखलेलं वेळापत्रक चुकलं तर खापर कोणाच्या माथी फोडायचं याची व्यवस्थित तरतूद करण्यात आली आहे. हे भाष्य वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केलेल्या सत्यावर आधारित आहे.
मंदीचा खरा चेहरा : वर्ल्ड बँक आणि आय.एम.एफ. यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलेला अहवाल म्हणजे ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट (GMR-2009)मंदीच्या खऱ्या चेहऱ्यावर प्रखर प्रकाशझोत टाकतो. त्या झोतात मंदीच्या प्रहाराने विद्रूप आणि कुरूप झालेल्या कुष्ठरोग्याचा- तिसऱ्या जगाचा- चेहरा नजरेस पडतो. तो असा -
जी.एम.आर.-२००९च्या अहवालानुसार ५५ ते ९० दशलक्ष अधिक लोक मंदीच्या महामारीने बेकारीच्या खाईत लोटले जात- जाणार आहेत. तेही २००९-१० या कालावधीत. सदैव भूकग्रस्त असणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात एका वर्षांत वाढणार (1 Billion).वल्र्ड बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ जस्टिन इफुलिन यांच्या अंदाजानुसार असंख्य लोक बेकार तर होतीलच पण दुर्दैवाची बाब अशी की मंदीला म्हणजे मंदी आणणाऱ्या कृतींमध्ये ज्याचा काडीमात्रही सहभाग नाही अशा तिसऱ्या जगातील लोकांना श्रीमंत राष्ट्रांनी केलेल्या हिमालयाएवढय़ा चुकांमुळे जीवन-मरणाचा संघर्ष नुसताच स्वीकारावा नाही लागणार तर त्यात बळी जायला लागेल.
सर्वसहमतीने जगाने स्वीकारलेली आठ ‘मिलेनियम गोल्स’ कागदावरच विरणार अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. ही आठ ध्येयं प्रामुख्याने खालील संदर्भातली आहेत : भूक (hunger),बालक आणि माता यांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण, प्राथमिक शिक्षणाला वंचित राहणाऱ्यांची वाढती संख्या, एच.आय.व्ही., एड्स, मलेरिया आणि इतर गंभीर आजार यांच्याशी लढण्यासाठी अत्यल्प ठरणारी साधनसामग्री.
जी-२० च्या नऊ सदस्य राष्ट्रांनी लंडन शिखर परिषदेनंतर २३ पावलं अशी उचलली की जी या Protectionism enhanced या सदरात मोडतात. याचा विपरीत परिणाम इतरांवर होऊन त्यांच्या (इतरांच्या) समस्या वाढतील. जी-२० च्या उर्वरित सदस्य राष्ट्रांनी निर्णयाच्या अंमलबजावणीचा देखावा केला. एक दार उघडलं पण दोन दारं बंद केली.
भाष्य : श्रीमंत आणि गरीब हा भेद कधीच मिटणार नाही. दोघांमधली दरी कमी करणं यासाठी सामूहिक नि संघटित प्रयत्न करणं हीच Public Policy ची दिशा असणार- असायला हवी. सध्या तरी प्रत्येक देशाचं सरकार आपापल्या कुवतीनुसार सरकारी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून आपापल्या देशाचं भलं करण्यात गुंतलेली आहेत. प्रगतिपथावर असणाऱ्या नि गरीब राष्ट्रांमध्ये दळणवळण आणि मूलभूत गरजा पुरविण्यासाठी मोठमोठय़ा Infrastructure योजनांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे, जेणेकरून मंदीवर मात करण्याचा मार्ग तयार होईल.
तेजी-मंदी जीवन-मरणाएवढी सत्य : तेजी-मंदी ही जीवन-मरणाएवढी सत्य आहे. रात्रंदिवस याप्रमाणेच तेजी-मंदीचं रहाटगाडगं अविरत सुरू राहणार असं मानणारा अर्थतज्ज्ञ लोकांचा एक गट आहे. अलीकडेच 'The Origin of Financial Crises' हे जॉर्ज कूपर यांचं पुस्तक वाचण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार पतनिर्मिती (Credit Creation) हा संपत्ती निर्मितीचा खरा स्रोत आहे आणि तेजी-मंदीलाही तोच कारणीभूत आहे. त्याच्यामुळे आर्थिक विषमता (Financial imbalance) निर्माण होतो. जॉर्ज कूपर यांच्या पुस्तकाचं सार त्याच्याच खालील वाक्यात सामावलेलं आहे. त्याचं मराठीत भाषांतर न करता जसंच्या तसं खाली उद्धृत करीत आहे.
''The greater challenge lies in changing our mindset from one of the unquestioning faith in market efficiency to one that accepts the need for governance of aggregate cerdit creation, and the occasional tough choices that this requires.'' जी-२० ची शिखर परिषद नि त्या संदर्भातील सारं काही वर उद्धृत केलेल्या वाक्याच्या संदर्भात बघायला हवं.
अंमलबजावणी करणाऱ्यांविषयी : आय.एम.एफ. आणि वर्ल्ड बँक यांची वसंतकालीन बैठक आटोपली. आता पुढची बैठक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. त्यानंतर पुन्हा जी-२० परिषद.
कधीतरी एक वेडा विचार मनात येतो तो असा - नेमेचि एकमेकींना किटी पार्टीत भेटणाऱ्या श्रीमंत अतिविशाल महिलांनी ‘जनजागृतीसाठी’ वेळ आणि पैसा खर्च करावा- तशाच तर नाही ना या वसंतकालीन नि ग्रीष्मकालीन बैठका? हा वेडा विचार चुकूनही प्रत्यक्षात खरा न ठरो अशी प्रामाणिक इच्छा.
अरविंद नेरकर,
E-mail Id: amnerkar@gmail.com
मोबाईल नं. : ९८१९०३८५८२