Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

देता किती घेशील दो कराने!
गेल्या आठवडय़ात निर्देशांकाने १२,००० चीही पातळी ओलांडली आणि ही तात्पुरती बेअर मार्केटमधली रॅली आहे, असं तुणंतुणं वाजवणाऱ्या नकारात्मक विश्लेषकांची भंबेरी उडाली. आता विविध विदेशी कंपन्यांच्या मुखंडाच्या साक्षी काढून या रॅलीचे समर्थन केले जात आहे. ही लेखमाला मात्र शेअर बाजाराबद्दल सदैव सकारात्मकच राहिली आहे. त्यात निवेशनीय म्हणून सतत माहिती दिलेल्या टाटा स्टील, लार्सेन टुब्रो, एचडीआयएल हे सर्व शेअर्स उत्तम वाढले आहेत. भाव कमी होतात तेव्हा सतत त्यांची खरेदी करून भागभांडारात त्यांची टक्केवारी वाढवली पाहिजे. बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, एचडीएफसी बँकेच्या मार्च ०९ वर्षांच्या आकडय़ांचे विश्लेषण या पूर्वी आले आहे. कॅनरा बँक व बँक ऑफ इंडियाचाही विचार गुंतवणुकीसाठी करायला हवा. लहान बँकांमध्ये अलाहाबाद बँक व इंडियन ओव्हरसीज बँका नजरेसमोर ठेवता येतील. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांतील

 

स्टेट बँक ऑफ त्रावणकोर व स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर या बँकांचे शेअर्सही कमी किं/अु गुणोत्तराला उपलब्ध आहेत. या चारही बँकांचे किंवा आधीच्या लेखात परामर्श घेतलेल्या बँक ऑफ बरोडा, कॉर्पोरेशन बँक यांचे आकडे, एचडीएफसी बँकेच्या आकडय़ाशी तुलनेसाठी घेतले तर खासगी बँकांना राणीसारखी वागणूक दिली जाते आणि राष्ट्रीयीकृत बँकांना तितकं वजन दिलं जात नाही. हे स्पष्टच होतं. एचडीएफसी बँकेचे उपार्जन ५२.९० रुपये आहे आणि १२०० रुपयांच्या जवळपासच्या भावामुळे तिचे किं/उ गुणोत्तर २० पट दिसते. जवळपास इतकेच उपार्जन असणाऱ्या बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा यांचे किं/उ गुणोत्तर मात्र फक्त चार ते सव्वाचार पट दिसते. या राष्ट्रीयीकृत बँका जवळपास शंभर वर्षे इतिहास असणाऱ्या आहेत. त्यांची भांडवल पर्याप्तता उत्तम आहे. नक्त अनार्जित वर्षे नगण्य आहेत. कुठल्याही निकषावर त्या अन्य खासगी बँकांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे त्यांना वीसपट जरी दिले नाही तरी निदान दहा ते बारा पट गुणोत्तर तरी मिळायला हवे. अगदी स्टेट बँकेबद्दलही, खासगी बँकांच्या तुलनेत सापत्नभाव दाखवला जातो व हे चित्र निवेशकांनीच बदलायला हवे व त्याला विमा महामंडळे, म्युच्युअल फंड व नव्याने सुरू झालेल्या पेन्शन फंडाने मदत करायला हवी. तसे गुणोत्तर मिळाले, तर या काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या शेअर्सचे भावही चार आकडय़ांत जायला हरकत नाही. त्यांच्या बाजारभावापेक्षा त्याचे पुस्तकी मूल्य बहुतेक ठिकाणी
जास्त आहे. याचीही निवेशकांनी नोंद घ्यायला हवी. बँकांप्रमाणेच सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या शेअर्सची बेगमी पुढील दीडदोन वर्षांसाठी आताच करून ठेवायला हवी. इंफोसिस, टीसीएस, टेक महिंद्र व विप्रो या चार मोठय़ा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव अधूनमधून येणाऱ्या प्रतिक्रियेत कमी होतात. तेव्हा त्यावर लक्ष ठेवून ते खरेदी करायला हवेत. तसेच मधल्या फळीतले कमी किं/उ गुणोत्तर असलेले थ्री आय इंफो, जिओडेसिक, एचसीएल टेक्नॉलॉजी, केपीआयटी कमिन्स शेअर्सही, कमी भावात मिळतात तेव्हा घेऊन ठेवायला हवेत. सध्याच्या रॅलीत या सर्व लहानमोठय़ा शेअर्सनी निवेशकांच्या पदरात किमान २५ टक्के वाढ टाकली आहे. इंफोसिस १२५० रुपये, टीसीएस ५०० रुपये विप्रो २२० रुपये व टेक महिंद्र २८० रुपये या भावांच्या आसपास घेतले तर वर्षभरात निदान ३५ टक्के नफा देऊन जातील. थ्री आय इंफो व केपीआयटी वर ४५ रुपयांच्या मागेपुढे खरेदी इष्ट ठरेल. टेक महिंद्रमध्ये आता सत्यम कॉम्प्युटर अप्रत्यक्षरीत्या, पोटकंपनी म्हणून समाविष्ट झाली आहे. वर्षभरात तिला अमेरिकेतील यू पेड कंपनीचे व अन्य दावे मिटवण्यात यश आले, तर ती कंपनी जोमाने वाढेल. विप्रोने युनिटेक वायरलेसचे नऊ वर्षांंचे कंत्राट मिळवले आहे. त्यामुळे दरवर्षांला तिच्या विक्रीत ३०० कोटी रुपयांची भर पडणार आहे. अमेरिकेतून ऑर्डर्स कमी होण्याच्या शक्यतेवर या दोन कंपन्यांनी वेगळ्या रीतीने मात केली आहे. मध्यम फळीतल्या कंपन्यांमध्ये जिओडेसिक पुन: ८५ रुपयांपर्यंत येईल, तेव्हा घेऊन ठेवण्यासारखा आहे. गेल्या सोमवारी तो ७५ रुपयाला मिळत होता. तिचे मार्च ०९ वर्षांचे आकडे निवेशकांच्या नजरेत भरल्यामुळे तो दोन दिवसांत ४० टक्के वाढून १०९ रुपयांपर्यंत गेला. मार्च ०९ वर्षांची तिची विक्री ६४२ कोटी रुपये होती व करोत्तर नफा २८३ कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल १८.४४ कोटी रुपये असल्याने शेअरगणिक उपार्जन ३०.६८ रुपये आहे. वाढत्या भावाचा विचार करूनही किं/उ गुणोत्तर ३.७ पटीपेक्षा कमी आहे. गेली सहा वर्षे कंपनीची विक्री व नफा दरवर्षी दुप्पट होत आहे. ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी स्थिती पुन्हा सुरू झाली आहे व ही संधी सुटता कामा नये.
’ वसंत पटवर्धन
फोन : ०२० २५६७०२४०