Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचाल
‘सचिन ट्रॅव्हल्स’ या नावाभोवतीचे ‘वलय आणि वळण’ आज दिवसेंदिवस वाढत चाललंय, या पर्यटन संस्थेची विश्वासार्हता व लोकप्रियता बळकट होत चाललीय यामागे या कंपनीचे जन्मदाते प्रमोद जकातदार यांची पस्तीस वर्षांची तपश्चर्या, मेहनत व कल्पकता आहे. या दीर्घ वाटचालीबद्दल प्रमोद जकातदार आज समाधानी व निश्चिंत असले तरी ही वाटचाल सरळ रेषेत झालेली नाही, त्यात बरीच आव्हाने- खाचखळगे- निराशेचे क्षण आले, पण कधी नशिबाने साथ दिल्याने तर कधी चांगले सहकारी लाभल्याने त्यांनी यशस्वी मार्ग काढला. १९७२ साली शिवाजी पार्कला आयोजित करण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रदर्शनाच्या निमित्ताने बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी प्रमोद जकातदार यांचा संबंध आला. प्रदर्शनाला लाभलेल्या प्रतिसादामुळे जकातदार यांना वाटले

 

आपण रायगडसाठीच प्रवासी दौरा आयोजित केला तर? १९७४ साली त्यानी त्यानुसार पाऊल टाकले. तेव्हा त्यांचा मुलगा सचिन एक वर्षांचा होत होता. या निमित्ताने त्यांनी ‘सचिन ट्रॅव्हल्स’ या नावाने प्रवासी संस्था स्थापन केली व ठिकठिकाणी ‘शिवचरणांची यात्रा गाती, शिवशाहीर गाथा’ असे फलक लावले, त्यावरून त्यांना दीडशे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताच त्यांचा अशा प्रकारचे दौरे आयोजित करण्याचा आत्मविश्वास वाढला. एकेक करीत नेपाळ, राजस्थान, कुलू-मनाली, दक्षिण भारत असे दौरे त्यांनी हळूहळू आयोजित केले. यातून जमेल तसे अर्थार्जन व शक्य तितकी समाजसेवा असा त्यांचा हेतू होता. पण हे सगळे आयोजित करणे आजच्याइतके सोपे नव्हते असे ते पटकन सांगतात. आज मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट यांच्या वाढत्या जाळ्यांनी व सहजी उपलब्धतेने देश-विदेशातील असंख्य पर्यटन स्थळांची व तेथील सुविधा-असुविधांची माहिती मिळते. पण पूर्वी पत्रव्यवहाराने स्थानिक हॉटेलचे बुकिंग करावे लागे, स्थानिक गाईडवर अवलंबून राहावे लागे. फार क्लिष्ट व कटकटीचे असे ते काम होते. पण प्रमोद जकातदार यांनी व्यवसायवृद्धीचा ध्यास घेतल्याने ते सगळे सांभाळले. हळूहळू त्यांना नवीन कल्पनाही सुचल्या. ‘अष्टविनायक’ चित्रपटाच्या लोकप्रियतेवरून ‘अष्टविनायक यात्रा’ सुरू केली. कोजागिरी पौर्णिमेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून शांतिवन सहल तर पावसात भिजण्याच्या आनंदासाठी वर्षां सहल असे आयोजन सुरू केले. त्यात व. पु. काळेंसारख्या नामवंत साहित्यिकांचाही सहभाग लाभला. एकीकडे व्यवसायाची वृद्धी होत असली तरी प्रमोद जकातदार यांच्याकडे व्यवहारज्ञान नव्हते. त्यामुळे आपल्या नातेवाईकांपासून आपल्या सेवेतील काही कर्मचाऱ्यांपर्यंत आपल्याला कोण कसे व का फसवतेय याची त्यांना अजिबातच कल्पना येत नव्हती. अशातच त्याना लक्षात आले की, विविध स्तरांवरील फसवणुकीतून आपल्याला एक कोटीचे कर्ज झाले व आपण कोंडीत सापडलोय. अशा वेळी दुर्दैवाने आत्महत्येचे विचार मनात येणे स्वाभाविक आहे. तसा त्यांनी प्रयत्नही केला. पण सुधीर निरगुडकर यांच्या पुण्याजवळील फार्म हाऊसवर भेटलेल्या बाबासाहेब पुरंदरेंमुळे त्यांच्या मन:स्थितीत फरक पडला. त्यांनी प्रमोद जकातदार यांना उत्तम व्यावसायिक अशा अर्थाने प्रतिसाद दिल्याने त्यांना भावले. तेव्हाच मरिन मॅनेजमेंट सव्र्हिसेसचे सुरेश गोडबोले यांनी त्यांना काही लाखाची मदत देऊ केली. प्रमोद जकातदार यांना सावरण्यासाठी हे खूपच हिताचे ठरले. आता त्यांची मुले संकेत व सचिन मोठे झाले. त्यांनीही ‘सचिन ट्रॅव्हल्स’चा कार्यभार सांभाळला. नव्या कल्पना रुजवल्या आणि आता तर ‘सचिन ट्रॅव्हल्स-टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी’ असे रूप त्याने धारण केले. आज दादरसह बोरिवली, वाशी, ठाणे, पुणे, नाशिक येथे सचिनची कार्यालये आहेत, देशासह विदेशातही प्रवासी दौरे वाढलेत. आतापर्यंत साडेतीन लाख जणांनी सचिनच्या सेवेचा लाभ घेतलाय. पण काही अडचणी, एखादा अपघात, असे धोके असतातच. पण या प्रवासात सचिनने पर्यटकांचे श्रद्धास्थान म्हणून मिळविलेली विश्वासार्हता खूप मोलाची आहे. ‘सचिनसेना’, हॅलो प्रवासी अशा नव्या कल्पना यशस्वी होत आहेत. प्रमोद जकातदार ‘पर्यटन व्यवसाय- एक आव्हान’ असे व्याख्यानही देतात. ते स्वत: संकेत हॉलिडेजचे काम पाहतात. त्यात व्यक्तिगत स्तरावरील पर्यटनसेवेचा लाभ ते देतात. एखाद्या नवदाम्पत्याला स्वतंत्रपणे फिरायला जाण्यासंदर्भातील पॅकेजची ते व्यवस्था करतात. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाबद्दल प्रेम, आपुलकी, आत्मियता तर हवीच, पण कल्पकता व चिकाटीने त्याची वाढही करता यायला हवी. २००० साली सचिनला झालेल्या अपघाताने ते हबकले होते. त्यातून तो सावरल्याचे समाधान त्यांना आहे. त्यांच्या दोन्ही सुनादेखील या कंपनीत कार्यरत आहेत. असा सगळा विस्तार त्यांना समाधान देत असतानाच या व्यवसायाची मानसिकता बदलण्याचे श्रेय ते राजा पाटील यांना देतात. त्यानी धार्मिक सहली वगळून प्रवासी सहलीत नावीन्यता आणल्याचे व प्रसिद्धीचे महत्त्व अधोरेखित केल्याचे मानतात. अशा सहलीत मनोरंजनाला वाढता वाव मिळाल्याकडे जकातदार लक्ष वेधतात. अवधूत गुप्ते त्यातूनच सचिनचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाला आहे. पण हा व्यवसाय बाहेरून पाहतो तितका सोपा नसल्यानेच बरेच स्पर्धक गळाल्याची जाणीव ते देतात. या व्यवसायाने महाराष्ट्रात आपले नाव होईल असे मात्र त्यांना वाटत नव्हते. प्रत्यक्षात ते झाले ही त्यांना मोठी मिळकत वाटते.
संपर्क- ९८२१७२६०४४
’ प्रतिनिधी