Leading International Marathi News Daily
बुधवार, १३ मे २००९

‘प्ले-ग्रुप, मिनी केजी’ आता नियमबाह्य़ ठरणार?
पुणे, १२ मे/खास प्रतिनिधी

पूर्वप्राथमिक स्तरावरील बालशिक्षण हे केवळ ‘ज्युनिअर-सीनियर केजी’ अशा दोनच वर्षांपुरते मर्यादित राहावे आणि साडेतीन वर्षांवरील मुला-मुलींनाच त्यासाठी प्रवेश द्यावा, अशी शिफारस राज्य शासनाला करण्यात आली आहे. त्यामुळेच हजारो रुपये उकळून दोन-अडीच वर्षांच्या बालकांच्या शाळांच्या चक्कीत पिसून काढण्याचे प्रकार आता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे! राज्य शासनातर्फे बालशिक्षणासाठी कायदा करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी विभागवार समित्या स्थापन केल्या असून त्यांच्या शिफारशींच्या आधारावर कायद्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. पुणे विभागीय समितीची काल बैठक झाली. त्यानंतर आज शासनाला शिफारशी सादर करण्यात आल्या आहेत. प्रचलित पद्धतीनुसार सध्याच्या पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये प्ले-ग्रुप, मिनी केजी आणि ज्युनिअर व सीनियर केजी अशा चार वर्षांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात सेना-भाजपला अधिक जागा; सट्टेबाजांचा अंदाज
मुंबई, १२ मे / प्रतिनिधी

मतदानोत्तर चाचणीवर बंदी असल्यामुळे १५ व्या लोकसभेचे चित्र कसे असेल याविषयी राजकीय निरीक्षक, ज्योतिषी आणि गुप्तहेर खात्याप्रमाणेच सट्टेबाजांनादेखील चांगलाच भाव आला आहे. राजकीय निरीक्षक आकडेवारी, सर्वेक्षणाधारेनुसार, ज्योतिषी कुंडल्या, ग्रहनुसार तर सट्टेबाज निव्वळ अंदाजावर लोकसभेचे चित्र कसे असेल हे सांगत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर अंदाजे १२०० कोटींचा सट्टा खेळला जात असून इंडियन पोलिटिकल लीग आणि इंडियन प्रिमियर लीगमुळे सट्टेबाजांचा धंदा अतिशय तेजीत सुरू आहे.मुंबई हे सट्टेबाजांचे मुख्य केंद्र असून ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार सट्टेबाजांनी देशात काँग्रेस आघाडीच्या सरकारला अधिक पसंती दिली आहे. सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून सट्टेबाजांनी काँग्रेसच्या पारडय़ात आपली पसंती टाकली असून देशात काँग्रेसच्या १४०-१४५-१५० जागा येतील असा त्यांचा अंदाज आहे.

अनुदान तर रखडले, नवीन शाळांवरही गंडांतर !
संतोष प्रधान, मुंबई, १२ मे

राज्यातील मराठी माध्यमाच्या सर्व शाळांना अनुदान देण्याचे धोरण सरकारने जाहीर केल्याने आधीच ४०० ते ५०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने नवीन शैक्षणिक वर्षांत नव्या शाळांना मंजुरी देताना सरकारला हात आखडता घ्यावा लागला आहे. त्यातच कायम विनाअनुदानित शाळांमधील कायम हा शब्द वगळला असला तरी त्याची अंमलबजावणी करणे सरकारला अद्यापही शक्य झालेले नाही. राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शाळांना कायम विनाअनुदानित स्वरूपात मंजुरी देण्याचे धोरण राज्य सरकारने इ. स. २००० मध्ये स्वीकारले होते. शासनाची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय अनुदान सुरू केले जाणार नाही, असे तेव्हा शासनाचे धोरण होते. शालेय शिक्षण विभागाने तसे प्रतिज्ञापत्रही उच्च न्यायालयात सादर केले होते.

‘फिजिक्स’च्या ‘सम्स’ने ‘सीईटी’ विद्यार्थ्यांचा घात!
पुणे, १२ मे/ खास प्रतिनिधी
‘फिजिक्स’च्या पेपरमधील क्लिष्ट ‘सम्स’, म्हणजेच गणिती प्रश्नांनी अभियांत्रिकी-वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा घात केला! ‘संबंधित प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेला योग्य नव्हते. त्यामुळेच खूप वेळ खर्ची पडून फिजिक्स वा केमिस्ट्रीच्या पेपरमधील १० ते १५ गुणांचे प्रश्न सोडवायचे राहून गेले,’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, संबंधित प्रश्न हे पूर्णत: नियमबाह्य़ व अभ्यासक्रमाबाहेरील ठरविता येणार नसले, तरी वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेचा विचार करता ‘वाईड बॉल’ मात्र नक्कीच ठरले, अशा शब्दांत तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिले.राज्यभरातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी आज ‘सीईटी’ दिली. खर्ची टाकलेले हजारो रुपये आणि प्रत्येक गुणांसाठीची शर्यत अशा वातावरणामध्ये ‘सीईटी’च्या पेपरमधील प्रत्येक प्रश्न व गुणाचा मुद्दा संवेदनशील ठरतो. म्हणूनच की काय, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर देऊन दीड वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी गणितापूर्वीच्या सुटीसाठी बाहेर आले नि सर्वच एकच चर्चा सुरू झाली.. ती म्हणजे ‘फिजिक्स अवघड गेल्याची!’

मुंबईत ‘हरवतात’ रोज सरासरी १७ मुले!
अजित गोगटे, मुंबई, १२ मे

सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबई महानगरात ‘पाय घसरण्याच्या’ १५ ते २५ वर्षे या वयोगटातील दररोज सरासरी १० मुली तर सात मुलगे ‘हरवतात’ असे पोलिसांच्या ‘मिसिंग पर्सन्स ब्युरो’कडून मिळालेल्या गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. पोलिसांच्या दफ्तरी यांची नोंद ‘हरवलेल्या व्यक्ती’ या सदरात होत असली तरी सभोवतालची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता यापैकी बहुतांश मुली व मुले घर सोडून पळून गेलेली असतात, हे उघड गुपित आहे. केम्प्स कॉर्नर येथे राहणारे एक सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबईत गेल्या १० वर्षांत पोलिसांकडे किती व्यक्ती हरविल्याच्या फिर्यादी नोंदविल्या गेल्या, त्यापैकी किती पुन्हा सापडल्या व हरवलेल्या तसेच सापडलेल्या व्यक्तींची विविध वयोगटानुसार वर्गवारी अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती.

महावितरणचा प्रस्ताव
वीजदरवाढीचा ग्राहकांना शॉक !
मुंबई, १२ मे / प्रतिनिधी
स्थिर आकार, इंधन समायोजन आकार, अतिरिक्त आकार, विद्युत आकार असे विविध प्रकारचे आकार ग्राहकांकडून वसूल करूनही विजेचा अखंडित पुरवठा करण्याची कोणतीही शाश्वती देऊन न शकणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने ग्राहकांवर सरासरी जवळपास १२५ टक्क्यांची दरवाढ लादण्याचे ठरविले आहे. तशा आशयाचा प्रस्ताव कंपनीने राज्य विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला असून त्याला मंजुरी मिळाल्यास ग्राहकांचे कंबरडेच मोडणार आहे.राज्यात नियोजित वेळापत्रकापेक्षा विजेचे अतिरिक्त भारनियमन होऊ नये यासाठी ‘महावितरण’ कंपनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून त्याचाच एक भाग म्हणून कालपासून राष्ट्रीय ग्रिडमधून अल्प दराने अधिक वीज खेचून विजेची गरज भागविणारी ‘महावितरण’ कंपनी देशातच असलेल्या विजेच्या तुटवडय़ामुळे अखंडित वीजपुरवठय़ाची खात्री देण्यास असमर्थ ठरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी स्थापित क्षमतेमध्ये गेल्या जवळपास १० ते बारा वर्षांत एक मेगाव्ॉटचीही भर पडलेली नाही, याकडे जाणकार अंगुलीनिर्देश करीत आहेत.

जळगाव व जालना जिल्ह्य़ातील डुकरांचा मृत्यू ‘स्वाईन फिव्हर’मुळे
पुणे, १२ मे/ खास प्रतिनिधी

जळगाव व जालना जिल्ह्य़ात मरण पावलेल्या डुकरांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण झालेली नसून त्यांचा मृत्यू ‘स्वाईन फिव्हर’ या नेहमी आढळणाऱ्या रोगामुळे झाला असल्याचे आज स्पष्ट झाले. भोपाळमधील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज लॅबोरेटरीनेच तसा अहवाल पाठवला असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त दादासाहेब झगडे यांनी लोकसत्ताला दिली. जळगाव जिल्ह्य़ातील दहिवद (ता. अंमळनेर) येथील चार डुकरांचा आजाराने मृत्यू झाला. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्य़ातील राजूर (ता. भोकरदन) येथील काही डुकरांना रोगाची लागण झाली. त्यामुळे राज्यभरातील डुकरांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. स्वाईन फिव्हर हा डुकरांमध्ये नेहमी आढळणारा आजार असून विशेषत: उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होतो. जळगाव जिल्ह्य़ात मृत्युमुखी पडलेल्या डुकरांच्या पेशींचे तर जालना जिल्ह्य़ातील आजारी असलेल्या डुकरांच्या रक्तजलाचे नमुने पशुसंवर्धन खात्याने २९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील आयव्हीआरआयकडे पाठविले होते. त्याचा अहवाल या संस्थेने नुकताच पाठविला असून या डुकरांना स्वाईन फिव्हरची लागण झाली असल्याचा निर्वाळा त्यात दिला आहे.

राज ठाकरे यांच्या याचिकेबाबतचा निर्णय प्रलंबित
मुंबई, १२ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात झारखंड, बिहार येथे दाखल करण्यात आलेले खटले एकत्रितरीत्या एका ठिकाणी चालवण्यासाठी स्थानांतरित करण्यात यावे, यासंदर्भात ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी सुरु आहे. त्यामुळे या याचिकेबाबतचा निकाल दिला जाईपर्यंत जमशेदपूर येथील याचिकेबाबत काहीही निर्णय देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, राज ठाकरे यांच्याविरोधातील सारे खटले स्थानांतरित करण्यात यावेत, याबाबतच्या याचिकेवरची सुनावणी सुरु आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी