Leading International Marathi News Daily
बुधवार, १३ मे २००९
  पालकांनो, थोडेसेच लक्ष द्या!
  इकॉनॉमिक्समधील करिअरच्या संधी
  चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर/ सी. ई. ओ.
  इंटरनॅशनल मीडिया स्टडीज् स्कॉलरशिप
  कल्पनेचा आविष्कार
  प्रयोगसदृश अभिकल्प
  कंबाईंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन
  आकर्षक उद्योगांचा पर्याय..
निसर्गोपचार केंद्र
  हेल्थ इन्शुरन्समधील करिअर
  जहाजावरील ‘इलेक्ट्रिकल ऑफिसर’चे आकर्षक करिअर

 

पालकांनी या चालू सुट्टीत फक्त महिना-दीड महिना एवढाच वेळ आपल्या पाल्याने लहानलहान कामांचा उरका कसा करावा यासाठी द्यावा. यामुळे पुढील आयुष्यात पाल्याला या गोष्टींचा कसा फायदा होतो व त्याची प्रगती कशी उत्तम गतीने होते ते पाहाच. आता जवळजवळ सर्वच परीक्षा संपत आल्या आहेत. परीक्षा संपल्यावर पाल्यांना एप्रिल महिना संपेपर्यंत हवा तसा आराम करू द्या. त्यांना काहीही उपदेश करू नका. एकदा मे महिना सुरू झाला की साधारण १५ जूनपर्यंत या दीड महिन्याच्या अवधीत मुलांना व्यवहारज्ञान द्या. हा व्यवहारज्ञानाचा डोस दिवसभर चालू ठेवू नका. त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी पण करू द्या. त्याबरोबरच विरंगुळा म्हणून व्यवहारज्ञान पण शिकू द्या. या व्यवहारज्ञानाचा फायदा या पाल्यांना त्यांच्या
 

पुढील आयुष्यात निश्चितच चांगला होईल व खास म्हणजे तुमचा पाल्य एक उत्तम नागरिक बनेल. हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालकांना पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे पाल्यांचा मोकळ्या वेळेचा फायदा पालकांना उठविता येत नाही. पालकांनो, एक बाब पक्की लक्षात ठेवा की पाल्यांना हे व्यवहारज्ञान शिकवीत असताना त्यांना त्यांचे बालपण पण जगू द्या. त्यामुळे काय होईल तर हीच पाल्ये व्यवहारज्ञान मनापासून गोडीने शिकतील. त्यांना बालपण कसे जगू द्या तर टीव्ही गेम शोचे रिमोट त्यांच्यावर सोपवू नका. त्यांना हिंडू, खेळू द्या. आटय़ापाटय़ा, कबड्डी हे शारीरिक व्यायामाचे खेळ त्याना मुद्दामच खेळू द्या. त्यांना हातपाय मोडण्याचे भय दाखवू नका.
सध्याचा काळ हा स्पर्धेचा असल्यामुळे नोकऱ्या मिळणे दिव्य कर्म झाले आहे. संगणकामुळे कर्मचारी चांगलेच कमी होत चालले आहेत. मुले पदवीधर होतात. पण ती पोपटपंची अथवा ठराविक पद्धतीने अभ्यास करून पास होतात. काही ठिकाणी नोकरी मिळत नसल्यामुळे पुढील शिक्षण चालू ठेवले जाते. पण तेसुद्धा पुढील पदवी मिळविण्याच्या दृष्टीने. ज्ञान मिळविण्याच्या दृष्टीने नव्हे. नोकरीसाठी मुलाखतीला गेल्यावर अनुभव विचारतात. नोकरीशिवाय अनुभव नाही व अनुभव मिळविण्यासाठी नोकरी हवी असे हे विचित्र त्रांगडे आहे. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यासाठी काय करावे म्हणजे आपले पाल्य नोकरी-व्यवसायामध्ये काहीतरी कर्तृत्व नक्कीच दाखवेल यासाठी खालील बाबींकडे लक्ष दिल्यास पाल्याला निश्चितच चांगलेच फायद्याचे ठरेल. म्हणून सुट्टीच्या काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला जुजबी म्हणजेच कामापुरत्या प्रारंभिक (बेसिक) गोष्टी शिकविल्या तरी त्या पाल्याला त्याच्या पुढील आयुष्यात कमालीच्या मोलाच्या ठरतात.
लक्ष देण्याच्या गोष्टी
मित्र-नातलग यांच्यामधील कामापुरता पत्रव्यवहार, पत्रावर व्यवस्थित पद्धतशीरपणे पत्ता लिहिणे म्हणजेच नाव, आडनाव त्यानंतर सदनिका क्र. व इमारतीचे नाव, त्याखाली रस्त्याचे नाव, त्याखाली उपनगर व मुख्य शहराचे नाव टाकून पिनकोड नंबर लिहिणे. पिनकोड नंबर लिहिताना प्रथम तीन आकडे अशा पद्धतीने लिहावा. याशिवाय रजिस्टर्ड पत्र करणे, बँक रोखीची व धनादेशाची स्लिप भरून घेणे, बँकेतून पासबुक-स्टेटमेंट आणणे, रेल्वे रिझर्वेशन फॉर्म भरून घेणे, रेल्वे रिझर्वेशन करून आणणे, आजूबाजूच्या लोकांच्या चर्चेकडे नाक न खुपसता लक्ष देणे, वीजबिलांचा, फोनबिलांचा भरणा करणे, रेल्वेपास काढून आणणे, एकाखाली एक आकडे लिहिणे. त्यामुळे आकडय़ांची बेरीज घेणे सोपे जाते. तसेच कागदाचा मध्य काढून कागद पंच करण्यास शिकविणे. कागद पंच करताना खाली टेबलाचा अथवा सपाटीचा आधार घेणे. कागद हातात धरून चिपळ्याटाईप पंच करू नये. घरी कोणी आल्यावर पंखा लावणे, पाणी देणे, आणखी एक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हाक मारल्यावर ‘ओ’ देणे व काम ऐकल्यावर ‘हो’ म्हणणे. येथे एक बाब खास नमुन्यादाखल सांगाविशी वाटते की, आमच्याकडे पदवीधर लोक कामाला येतात. एकाला पत्राचा मजकूर सांगितला. तो त्याने कागदावर लिहिला. नंतर त्याला पत्ता लिहिण्यास सांगितले असता त्या हीरोने सदर पत्ता पाकिटावर न लिहिता पोष्टकार्डावर लिहिला. याशिवाय या हीरोला वर उल्लेख केलेल्या कितीतरी बारीकसारीक बाबी येत नव्हत्या ते वेगळेच.
पदवीधर तरुणांची त्यांच्या जीवनाला सुरुवात होत असते. त्यांनी आत्ताच चांगल्या सवयी अंगवळणी लावून घेतल्या तर त्याचा उपयोग त्यांना पुढील जीवनात कमालीचा होत असतो. त्यामुळे मिळणाऱ्या बढत्या व होणारी प्रगती यांच संगम छानच जुळतो.
नुकताच दि. २२ एप्रिलच्या ‘काऊन्सेलर’ या पुरवणीत माझा ‘पालकांनो, थोडेसेच लक्ष द्या’ हा लेख आला होता. त्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. बऱ्याच पालकांनी पाल्यांच्या बाबतीत एक-एक वाक्यात नवीन सूचना पण दिल्या. सदर सर्व सूचनांचा विचार करून व त्यामध्ये माझ्या अनुभवांची भर घालून हा लेख खासकरून पदवीधर पाल्ये व त्यांचे पालक या दोघांच्याही नजरेतून लिहिला आहे. वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे व सूचनांमुळे या लेखाचे श्रेय निश्चितपणे त्यांना पण जात आहे व त्याबद्दल मी वाचकांचा आभारी आहे. आजकाल व्यवस्थापन व वेळेचा उपयोग यावर बरेच वर्ग चालू असतात. तर मासिकांतून पण लेख येत असतात. मोठय़ा कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खास व्यवस्थापन व टाईम मॅनेजमेंट यावर बोलण्यासाठी त्या त्या क्षेत्रांतील चांगले वक्ते बोलावतात. व्यवस्थापन व वेळेचा उपयोग या दोन गोष्टी वागण्या-बोलण्यातून व आचरणातून प्रत्यक्ष कृतीत आणल्यास त्याचे फायदे त्वरित दिसून येतात. कोणतीही चांगली गोष्ट त्वरित सुरू करण्यात नेहमी स्वत:चाच फायदा असतो. त्यासाठी खास वार, तारीख, तिथी व वेळ या गोष्टी बघण्याची गरज नसते.
आता येथे पालक व पाल्यांच्या बाबतीत दुसरी बाजू पण लक्षात घ्या. ते म्हणजे मुलांच्या संगोपनात पालकांची तारेवरची कसरत सुरू असते. तर शाळेमध्ये शिक्षक मुलांना त्यांची प्रगती करण्यात व त्यांना संस्कारक्षम बनविण्याच्या प्रयत्नात असतात. घरी पालक तर शाळेत शिक्षक अशी मुलांची दोन्हीकडून जडणघडण होत असताना काही वेळा मुलांची घुसमट पण होते. घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी भिन्न संस्कार होत असतात. घरांतील संस्कार हे मर्यादित असतात तर शालेय संस्कार हे सर्वागीण विकासाचे असतात. अशा वेळी मुलांना काही वेळा आपण आईबरोबर का बाईंबरोबर हा प्रश्न भेडसावतो. आईचे नाते व शाळेतील बाईंचे नाते ही दोन्ही नाती मुलांमध्ये वेगळ्या पातळींवर विकसित होत असतात. शाळेतील शिस्त ही शाळेसाठी वेगळी असते, तर घरची शिस्त ही मोकळ्या वातावरणात असणे महत्त्वाचे असते. म्हणजेच मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने बोला व त्यांच्या शंकांचे निरसन करून मुलांशी मोकळा संवाद साधा. अशाने पाल्य पण त्याचे विचार आपल्या आई-बाबांशी मोकळ्या मनाने बोलून दाखवितो. (शेअर करतो.) अशामुळे पालक व पाल्य या दोघांमध्ये निश्चितपणे मोकळा संवाद साधला जातो.
मागील लेख हा खासकरून दहावी/बारावीच्या मुलांसाठी होता तर हा लेख पदवी प्राप्त करणारे व पदवीधर अशा दोघांसाठी आहे. त्याबरोबरच पालकांसाठीही आहे. असे असताना चांगले वळण या मुलांच्या अंगी यावे म्हणून पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना आत्तापासूनच कसे वळण/सवयी लावल्या पाहिजेत याचे निरनिराळे उल्लेख पुढे या लेखात आणले आहेत. कारण आता ही मुले १२ वीच्या मुलांच्या पुढे ज्येष्ठ (सिनीयर) म्हणून गणली जातात. आता या मुलांना खास सूचना काय तर बँकेचे व्यवहार त्यांनाच करू द्या. बँकेचे व्यवहार करताना नोटा एकदिशा लावण्यास सांगा. म्हणजेच सिहांची/राजांची तोंडे एका बाजूला असू द्या. सर्वात मोठय़ा नोटा खाली व त्यावर त्यापेक्षा लहान अशा क्रमाने नोटा लावण्यास सांगा. वस्तू जाग्यावर ठेवण्याची सवय अशा पद्धतीने लावा की ती वस्तू रात्री तुम्हाला काळोखात पण मिळाली पाहिजे. अशामुळे वेळ चांगलाच वाचतो व वेळेचे महत्त्व पण समजते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्यामध्ये नकारार्थी कधीही आणू नका. म्हणजेच माल शिल्लक नाही असे न म्हणता माल संपलाय असे म्हणा. उद्या मी कामावर येणार नाही असे न म्हणता उद्या मी रजेवर आहे असे म्हणा. दूरध्वनी क्रमांक लिहिताना प्रथम एक्स्चेंजचा क्रमांक व नंतर पुढील क्रमांक लिहिण्यास सांगा. दूरध्वनी क्रमांक बदलल्यास संबंधित ठिकाणी त्वरित कळवा. त्याचा फायदा स्वत:लाच होतो. दूरध्वनी आल्याबरोबर अथवा केल्याबरोबर प्रथम स्वत:ची ओळख मुद्दामच सांगा. त्यामुळे संवादाचा वेळ वाचतो. तसेच फोनवर मुद्देसूद बोला. फोनच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचे म्हणजे कुणाचाही फोन नंबर घेतल्यास प्रथम नाव लिहून नंतर नंबर लिहा. यामुळे सदर नंबर कुणाचा आहे हे नंतर आठवावे लागत नाही.
नेहमी बोलण्यामध्ये जास्तीत जास्त स्पष्टपणा ठेवा. याचे एकच उदा. येथे देऊ इच्छितो. ते म्हणजे सुमारे ३५ वर्षांपूर्वी माझ्या बदलापूरच्या मित्राकडे एक पाहुणे हैदराबादहून आले होते. त्यांना बदलापूरला जाण्यासाठी दादरला फलाट क्र. तीन वर बदलापूर किंवा कर्जत ट्रेन पकडण्यास सांगितले.
सदर गृहस्थ दादरला सेंट्रलऐवजी वेस्टर्न रेल्वेच्या फलाट क्र. तीनवर चार तासांच्यावर उभे होते. कारण त्यांना मुंबईची माहिती नव्हती. वेस्टर्न रेल्वेच्या फलाटावर बदलापूर/ कर्जत ट्रेन दिसणे शक्यच नव्हते. यासाठी बोलण्यातील स्पष्टपणा तरुण वयांतच अंगी उतरविणे चांगले. अशा घडणाऱ्या घटनांमध्ये पाल्ये व पालक असा दोघांचाही दोष असतो. पालकांनी बऱ्याच बारीकसारीक सवयी या वयांतच त्यांच्या पाल्यांना लावणे गरजेचे आहे. त्याची काही साधी उदाहरणे म्हणजे कागदाला स्टेपल पिन ही उभी लावायची असते. तिरपी किंवा आडवी नव्हे. त्यामुळे कागद पाहत असताना स्टेपल पिनेजवळील कागदाचा भाग फाटत नाही. तसेच सर्व रस्त्यांची नावे, निरनिराळी कार्यालये, मोठी दुकाने, थिएटर्स या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्यांचा खुणा म्हणून स्थळ (लोकेशन) सांगण्यास उपयोग होतो. एखाद्याला ठसका लागल्यास मनाशी कमीपणा न बाळगता त्वरित पाणी द्यावे.
रस्त्यात कुणाची वस्तू पिशवीतून पडल्यास स्वत:हून ती वस्तू उचलून द्या. एखाद्या आपल्याच घरच्या माणसाचा फोन आला व ती व्यक्ती घरी नसल्यास लहान चिठोऱ्यावर सदर निरोप लिहून तो चिठोरा त्या व्यक्तीला दिसेल असा ठेवा. त्यामुळे त्या आलेल्या फोनची दखल घेतली जाते. काम जराही पुढे न ढकलता त्वरित उरका. त्याचे फायदे चांगलेच असतात. उदा. चपलेचा अंगठा तुटल्यास त्वरित दुरुस्त करून घ्या. बाब दोन रुपयांचीच असते, पण तुटलेल्या आंगठय़ामुळे तोंडावर आपटल्यास सुश्रूषालयाचा खर्च ३० हजारांच्या पुढे होईल. रजा फुकट जाईलच व शिवाय अंतराळवीराप्रमाणे सगळीकडून तोंड बांधले जाईल. एखाद्याने काम आपल्यापेक्षा लवकर होत असल्यास त्याचे निरीक्षण करा. फायदा तुमचाच होईल. एखाद्याच्या घरी गेल्यास व ती व्यक्ती घरी नसल्यास त्यांच्या घरात नुसती चिठ्ठी टाकून ठेवा. शेजारी निरोप देऊ नका. कारण निरोप महत्त्वाचा असल्यास व शेजारी विसरल्यास काय होईल याचा आपणच विचार करा. स्वत:च्या नावाची पॅडस् (लेटरहेडस्) छापून घेतल्यास पॅडसवर क्रमांक टाका व शेवटच्या पॅडवर शेवटचे पॅड म्हणून लिहा. तसेच प्रत्येक पॅडमध्ये ९० कागदांनंतर एक लाल/ हिरवा कागद मुद्दामच लावा. त्यामुळे पॅड संपत आल्याचे कळते. कुणालाही रुग्णालयात भेटावयास जाताना साधे कपडे घाला. कपडय़ांचा भपका ठेवू नका. तसेच त्या रुग्णाच्या आजाराबाबत कमीत कमी बोला न त्याला तुम्ही काय मदत करू शकाल ते सांगा. मुलांनी चांगले काम केल्यावर ‘शाब्बास’ म्हणण्यास विसरू नका. अशामुळे याच मुलात नक्कीच कामांची गोडी निर्माण होते. आपले वर्तमानपत्र वाचून झाल्यावर त्याची पाने क्रमवार लावा. आता आपण लहान व मोठे अशा दोघांच्याही नजरेतून जीवनातील महत्त्वाच्या बाबींकडे उदाहरणांसह वळू या. मागील लेखात दखल (कॉग्नीझन्स) व ग्राह्य़/ गृहीत (इम्लाईड) या दोन संज्ञा (टर्मस) आणल्या होत्या. प्रथम दखल शब्दाचा खोल अर्थ समजावून घ्या. पहिले उदा. म्हणजे एखाद्या ओळखीच्या बाईला रात्रीच्या वेळी नाटक/सिनेमा संपल्यावर तिच्या घरी सोडावयाचे असल्यास त्या माणसानी त्या बाईच्या दारापर्यंत जावयाचे असते व घरच्या माणसांनी दार उघडल्यावर परत निघावयाचे असते. त्या बाईला इमारतीच्या दाराजवळ सोडून चालणार नाही. तशागत एखाद्या लहान मुलाला दुसरीकडे सोडावयाचे असल्यास लहान मुलांचे बोट व तेसुद्धा घट्ट मोठय़ा माणसाने पकडावयाचे असते. लहान मुलांनी मोठय़ा माणसाचे नव्हे. तसेच लहान मुलाला वाहनाचा धक्का लागू नये म्हणून त्या पद्धतीने मुलाला पकडायचे असते. आता आपण ग्राह्य़/ गृहीत (इम्लाईड) या संज्ञेकडे वळू या. याचे पहिले उदा. म्हणजे एखाद्याने त्याचे पैसे बँकेत भरावयास दिल्यास ती जबाबदारी पैसे घेणाऱ्यांनी स्वीकारलेली असते. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट पण हेच सांगतो. समजा सदर पैसे चोरीला गेले तर ते पैसे घेणाऱ्यांनी भरून द्यावयाचे असतात. तसेच एखाद्याला साखर आणावयास सांगितली तर दुकानदार साखरच देतोय ना हे घेणाऱ्याने बघावयाचे असते. दुकानदारांनी साखरेऐवजी डाळ दिली त्याला मी काय करू हे उत्तर देऊन चालणार नाही. त्याबरोबरच तिसरी महत्त्वाची संज्ञा म्हणजे जबाब/ प्रतिसाद (रिस्पाँड) उदा. आपण एखाद्याला कळविले की मी कोकणात मालवणला चाललोय. आमच्या कारमध्ये एक जागा आहे. यायचय का? तर त्या व्यक्तींनी निरोपाला प्रतिसाद द्यावयास हवा. परंतु तसे न करता ती व्यक्ती निघावयाच्या दिवशी सामानासकट अचानकपणे आपल्या कारशी येऊन उभी राहते. या असल्या गोष्टींचा त्रास जीवनात फारच होतो. याचे आणखी एक उदा. महणजे ती एका गरजू मुलाला चिठ्ठी देऊन माझ्या एका मित्राकडे नोकरीसाठी पाठविले. त्या मित्रांनी त्वरित त्या मुलाला नोकरीवर रुजू करून घेतले, पण मित्रांनी अगर त्या मुलानी (एकानेही) मला या विषयी काहीच कळविले नाही. जेव्हा त्या मुलांनी माझ्या मित्राकडे चोऱ्या केल्या व पोलीस माझ्या घरी येऊन उभे राहिले तेव्हा या जबाब/ प्रतिसाद न मिळाल्याची किंमत मला किती मोजावी लागली याचा वाचकांनीच मुद्दाम विचार करावा. कॉग्नीझन्स, इम्लाईड, रिस्पाँड या संज्ञांवर खुलासा सांगणारी आठ-दहा पानी पुस्तके असतात. ती वाचून कृती केल्यास त्याचे फायदे फारच होतात. तरी या बाबी पदवीधर व पालकांनी विचारात घेतल्यास मुलांचा उत्कर्ष नक्कीच कमालीच्या म्हणजेच यानाच्या वेगानी होतो हे लक्षात घ्या.
हे सर्व लिहिण्याचा उद्देश एवढाच की अनुभवासाठी अथवा नोकरीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून येतात तेव्हा त्याना काहीच येत नसते. एक साधी बाब येथे नमूद कराविशी वाटते की आम्ही एखाद्याला हाका मारीत असतो तेव्हा त्याच्या शेजारचा कर्मचारी संबंधित व्यक्ती जागेवर नसल्याचे स्वत:हून सांगत नाही. त्या शेजारच्या कर्मचाऱ्याकडे विचारणा केल्यावर संबंधित व्यक्ती बाहेर अथवा प्रसाधनगृहात गेल्याचे समजते. ही असली प्रारंभिक वळणे मुलांच्या अंगी बाणविणे ही कामे निश्चितच पालकांचीच आहेत. अशा परिस्थितीत भीक नको पण कुत्रा आवर अशी आमची परिस्थिती होते. या अशा जुजबी गोष्टी पाल्याला माहीत नसल्यामुळे त्याची प्रगती खुंटते ही बाब पालकांच्या लक्षातच येत नाही. तसेच दखल म्हणजे इंग्रजी भाषेत ‘कॉग्नीझन्स’ या शब्दाला फारच महत्त्व आहे. म्हणजेच हाक मारल्यावर ‘ओठ म्हणणे व काम सांगितल्यावर ‘ओ’ म्हणणे. याला महत्त्व अशासाठी की संबंधित व्यक्तीने काम ऐकले आहे. काम सांगितल्यावर ‘हो’ म्हणण्याची पद्धत नसली तर ती व्यक्ती काम ऐकले नाही, असे म्हणून काम सांगणाऱ्याची चांगलीच पंचाईत करून ठेवते. तसेच ग्राह्य म्हणजे ‘इम्लाइड’ या शब्दाला पण फार महत्त्व आहे. कोणी ‘पाणी द्या’ म्हटल्यावर पाणी पेल्यांत द्या असे म्हणत नाही. पेल्यात हा शब्द ग्राह्य आहे. केवळ शैक्षणिक पदवीमुळे उन्नती होते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
हल्ली कुटुंब पण मर्यादित असते. त्यामुळे पालकांनी वर उल्लेख केलेली कामे आपल्या पाल्याकडून त्यांच्या कलाकलाने करून घेतल्यास ही पाल्ये त्यांच्या पुढील जीवनात नक्कीच वर येतात. याचे कारण अशी कामे करीत असताना या शिकाऊ पाल्यांना कामाची गोडी निर्माण होते. जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होण्याची इच्छा असल्यास या मुलांना एक खास कानमंत्र हा द्या की, समोरचा माणूस काय बोलतोय इकडे नीट लक्ष देऊन तसे वागल्यास हवी असलेली कामे भराभर होतात व फुकट जाणाऱ्या वेळेची चांगलीच बचत होते. उदा. टेबलाच्या खणात वस्तू पाहण्यास सांगितल्यावर कपाटांत १० तास बघितली तरी ती वस्तू मिळेल का? तर नाही.
तसेच प्रत्येक वस्तू आपल्याशी बोलते हे लहान मुलांना शिकवा. उदा. चेकबुकात चेकबुक संपत आल्याची ऐक स्लीप असते. ती स्लीप आपल्याला सांगत असते की आता चेकबुकात दोन-तीन चेक्स शिल्लक आहेत. तरी माझ्यावर सही करा व मला बँकेत घेऊन जा व नवीन चेकबुक घेऊन या. दाराच्या बिजाग्रांतून जेव्हा करकर आवाज येत असतो तेव्हा ते दार आपल्याला बिजांग्रात तेल घालून हा कटकटय़ा आवाज बंद करा असे सांगत असते. बघा वस्तू आपल्याशी बोलतात की नाही. पण या नजरेतून बघणारे लोक फारच कमी असतात व जे अशा नजरेतून बघतात ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. तसेच फाजील आत्मविश्वास न ठेवल्यास कामे लवकर होतात. त्यामुळे फुकट जाणारा वेळ, होणारा शारीरिक त्रास, मानसिक त्रास व नुकसान हे सर्वच वाचते. माणसाने वेळेचा उपयोग करावयाचा ठरविल्यास दूरदर्शनवरील मालिका बघताना ज्या जाहिराती येतात त्या वेळी किती तरी लहान लहान कामे उरकता येतात. पण हे कोणाला, तर इच्छा असणाऱ्याला.
तरी खास करून पालकांनी आपले पाल्य शाळा-कॉलेजमध्ये असताना त्याच्या कलानी शाळा-कॉलेजच्या सुट्टीमध्ये लहान लहान कामे करून घेतल्यास पाल्याला कामे करण्याची गोडी निश्चितच उत्पत्न होईल. तरी खास करून मध्यमवर्गीय पालकांनी वरील सर्व बाबींचा विचार केल्यास पाल्याचा पुढील भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल ठरेल. बघा, पालकांनो थोडेसेच लक्ष द्या!
शरद भाटे
संपर्क - ०२२-२५४०६४२४