Leading International Marathi News Daily
गुरुवार, १४ मे २००९

एनडीएला बहुमत न मिळाल्यास पवारांना पाठिंबा- मनोहर जोशी
मुंबई, १३ मे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)ला बहुमत प्राप्त झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदी बसविण्याकरिता शिवसेना त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असे उद्गार शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आज काढले. याच विषयावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात अलीकडेच दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. त्या पाश्र्वभूमीवर जोशी यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जोशी म्हणाले की, लोकसभा निकालानंतर रालोआला बहुमताकरिता आवश्यक २७२ चा जादूई आकडा गाठता आला नाही तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शरद पवार यांना पंतप्रधान करण्याकरिता पाठिंबा देईल. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात दूरध्वनीवरून संभाव्य राजकीय पाठिंब्याबाबत अलीकडेच चर्चा झाली.

नवी दिल्ली, १३ मे/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपताच आज सायंकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’च्या निष्कर्षांंनुसार केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आणि भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआमध्ये कमालीची चुरस असून काँग्रेस-युपीएला किंचित आघाडी असल्याचे दिसून आले आहे. तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता क्षीण झाली असली तरी विविध प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व वाढणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे. ‘इंडिया टीव्ही’ वृत्तवाहिनीच्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला १९५ ते २०१ जागाजिंकण्याची संधी आहे. त्यात राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टीचा समावेश केल्यास युपीएचे संख्याबळ २२७ ते २३७ घरात जाईल. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचे संख्याबळ १८९ ते १९५ दरम्यान असेल, तर तिसऱ्या आघाडीतील घटक पक्ष ११३ ते १२१ जागाजिंकतील, असा अंदाज ‘इंडिया टीव्ही’च्या एक्झिट पोलने वर्तविला आहे. ‘हेडलाईन्स टुडे’ वाहिनीने काँग्रेस आणि मित्रपक्ष १९१ जागाजिंकतील, असे भाकित वर्तविले आहे. भाजप-रालोआला १८० जागा मिळतील, तर डाव्या आघाडीला ३८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे या वाहिनीने म्हटले आहे. बसपसह इतर पक्षांना १३४ जागा मिळतील, असा अंदाज या वाहिनीने व्यक्त केला आहे.

शेवटच्या टप्प्यात ६२ टक्के मतदान
नवी दिल्ली, १३ मे/वृत्तसंस्था

मागील तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेली रणधुमाळी आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर संपुष्टात आली आजच्या पाचव्या टप्प्यातील शेवटच्या मतदानाच्या प्रक्रियेत प. बंगालमध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात एक ठार झाला असून १०जण जखमी झाले आहेत. तामीळनाडूमध्ये तीन ठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये एक ठार झाला असून १३जण जखमी झाले आहेत. अखेरच्या टप्प्यामध्ये ६२ टक्के एवढे विक्रमी मतदान झाल्याचे वृत्त आहे.

बनावट जात प्रमाणपत्र : निलंबित नगरसेवक नारायण पवार यांना अटक
मुंबई, १३ मे / प्रतिनिधी

बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी दोषी ठरलेले कुर्ला येथील निलंबित अपक्ष नगरसेवक नारायण जानू पवार (४२) यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज कुर्ला पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पवार यांना अटक करण्यात आली असून त्यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पवार यांनी २००७ साली कुर्ला येथील विभाग क्र. १५८ मधून अपक्ष म्हणून नगरसेवकाची निवडणूक लढवली होती. काँग्रेस उमेदवार मसूर अन्सारी यांचा पराभव करून ते निवडूनही आले होते. मात्र पवार यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे ही निवडणूक लढविल्याची तक्रार अन्सारी यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केल्यावर याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. २९ सप्टेंबर २००८ रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पवार यांना दोषी ठरवून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस केली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये कुर्ला पोलीस ठाण्यात पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक होण्याच्या भीतीने पवार यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यावर पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळून लावत १३ मेपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज पवार यांनी कुर्ला पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मुंबई, १३ मे/प्रतिनिधी
जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक अगोदरच मेटाकुटीला आला असताना महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीमुळे ग्राहकाचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा , अशी मागणी शिवसेनेने केली आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला गेला तर शिवसेना आंदोलन करील, असा इशाराही दिला आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस अरुण जगताप यांनी सांगितले की, महावितरण व नियामक आयोगाची भेट घेऊन दरवाढीला असलेला विरोध स्पष्ट केला जाणार आहे. त्यानंतरही दरवाढ लागू केली तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल.

अमेरिकेतील ‘येस’ स्पर्धेत भारतीय वंशाचे विद्यार्थी चमकले
ह्य़ूस्टन १३ मे/पीटीआय

अमेरिकेतील यंग एपिडेमिऑलॉजी स्कॉलर्स स्पर्धेत (येस) तीन भारतीय विद्यार्थ्यांसह ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावली आहे. एकूण ५६० प्रवेशिका या स्पर्धेसाठी आल्या होत्या. त्यात अमृता सेहगल हिला ५० हजार अमेरिकी डॉलर, अ‍ॅलन जोसेफ व विशाखा सुरेश यांना अनुक्रमे ३५ हजार व १५ हजार अमेरिकी डॉलरची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. एपिडेमिऑलॉजी म्हणजे साथीच्या रोगांचे शास्त्र असून त्यात या रोगांचा मुकाबला करण्याच्या तंत्राचा अभ्यास केला जातो. अमृता सेहगल ही मेन्लो -आथरटन हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने मुलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा प्रतिबंध या विषयावर प्रकल्प सादर केला आहे. ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडे ठिसूळ होतात. अ‍ॅलन जोसेफ याने स्टडी ऑफ हायस्कूल अ‍ॅथलेटिक अँटेरियर क्रुशिएट लिगॅमेंट या विषयावर प्रकल्प केला आहे. विशाखा ही प्लानो वेस्ट सीनियर हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने आरोग्यास पोषक अन्नाची उपलब्धता व व्यायामाची व्यवस्था या विषयावर प्रकल्प सादरीकरण केले आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी