Leading International Marathi News Daily
गुरुवार । १४ मे २००९
  आध्यात्मिक ग्रंथांचे महत्व...
आजच्या संदर्भात
  ओपन फोरम
  थर्ड आय - ..आता यांच्याच घ्यायला हव्यात ‘कार्यशाळा’!
  दवंडी - व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी..!
  लँग्वेज कॉर्नर - अडुसष्टचा झंझावात
  स्मार्ट बाय
  ग्रूमिंग कॉर्नर - धावा.. पण जरा जपून!
  दिशा - म्युझियम माझे दुसरे घर
  ऑल द बेस्ट - ४००० व्या प्रयोगाकडे वाटचाल
  अवती भवती - पत्रकार ते पर्सनल फिटनेस ट्रेनर

रामायण, महाभारत, समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक किंवा गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे पुस्तक यामध्ये दिलेले दाखले काळ कितीही बदलला तरी आजच्या संदर्भात उपयोगी पडणारे आहेत. आहे की नाही गंमत! पण आपण त्या नजरेने, त्या विचाराने या ग्रंथांकडे पाहिलेच नसल्याने परदेशी विचार म्हणून या गोष्टींचे स्वागत करतो. ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ या उक्तीनुसार चांगल्या गोष्टी कमी संख्येत असतात जसे पाच पांडव आणि शंभर कौरव म्हणजे वाईट गोष्टी ज्या खूप प्रमाणात असतात.
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी करत असलेले काम अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल? उत्तम संघटनशक्ती व नेतृत्व यासाठी तसेच स्वत:चा व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे? काय करण्याचे टाळावे? वगैरे गोष्टींबद्दल प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे कामांचा बाऊ किंवा बोजा वाटण्यापेक्षा ते करण्यातला आनंद घेता येतो. बहुतेक जणांना हे परदेशी विचार आहेत असे वाटते. इंग्रजीमध्ये यावर बरीच पुस्तके आहेत. मराठीतही थोडी आहेत. पण मी जेव्हा मागे जाऊन विचार केला तेव्हा याच गोष्टी, हेच

 

विचार आपल्या पौराणिक, आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. रामायण, महाभारत, संत रामदासांचे मनाचे श्लोक किंवा गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे पुस्तक यामध्ये दिलेले दाखले काळ कितीही बदलला तरी आजच्या संदर्भात उपयोगी पडणारे आहेत. आहे की नाही गंमत! पण आपण त्या नजरेने, त्या विचाराने या ग्रंथांकडे पाहिलेच नसल्याने परदेशी विचार म्हणून या गोष्टींचे स्वागत करतो.
म्हणून एका अर्थाने हे ग्रंथ गुरुपदाच्या जागी अढळ आहेत. जसे एखादी कविता पुन:पुन्हा वाचताना दरवेळी नवीन अर्थ उलगडत असेल तर ती कविता श्रेष्ठ आहे असे आपण म्हणतो. तसेच वर सांगितलेले ग्रंथ पुन:पुन्हा वाचले की जीवनातल्या अडलेल्या, पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडतात. म्हणून त्या कालातील कृती आहेत. त्यांचे कार्य दिशादर्शनाचे आहे. आता उदाहरणेच देतो म्हणजे कळेल.
भरताला राज्य मिळावे म्हणून मंथरा दासीने कैकयीचे कान फुंकले आणि रामचंद्रांना वनवास पत्करावा लागला. वनवासातून आल्यावर त्याने कैकयीला नमस्कार केला तेव्हा लक्ष्मण चिडला, ‘‘जिने तुला वनवास घडवला तिला तू नमस्कार करतोस?’’ त्यावर रामचंद्रांनी आपला तोल न ढळू देत सांगितले. ‘‘लक्ष्मणा, तुझा राग स्वाभाविक आहे, पण या वनवासामुळे मी रावणासारखा बलाढय़ शत्रू लवकर मारू शकलो.’’ ऑफिसमध्ये काम करताना सर्वच सहकारी आपल्याबद्दल चांगले बोलतात असे नसते. कुणी तरी पाठीमागे द्वेष करतच असते. पण सर्वाना घेऊन पुढे जायचे आहे हा विचार आपण रामासारखा करावा. रामाने प्रतिकूल परिस्थितीतही षड्रिपूंवर विजय मिळवून सकारात्मक विचार केला. आपणही नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे.
सीतेचा शोध घेणे हे रामाचे अंतिम कर्तव्य होते. आपणही ध्येय गाठताना कशा पद्धतीने आखणी करायला हवी, हे पाहात असतो. सीतेचा शोध घेताना जटायू पक्षी, सेतुबंधनात खारुताई आणि भलीमोठी वानरसेना यांची मदत रामाला झाली. या सर्वाबद्दल त्याने कृतज्ञताच व्यक्त केली. आपले ध्येय पूर्ण करताना ज्या कोणाची थोडी का होईना मदत होते त्या सर्वाबद्दल ऋणी राहणे आवश्यक आहे.
महाभारतातील सर्वच व्यक्तिरेखा ही माणसे नसून स्वभावप्रवृत्ती आहेत असे मानले तर खूप गोष्टी स्पष्ट होतात. ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ या उक्तीनुसार चांगल्या गोष्टी कमी संख्येत असतात जसे पाच पांडव आणि शंभर कौरव म्हणजे वाईट गोष्टी ज्या खूप प्रमाणात असतात.
महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा भाग घ्या. काही वेळा आपण चांगले वागत असलो, आपण कुणाचेही वाईट केलेले नसले तरी समाज आपल्या बाजूने उभा न राहता आपल्यावर चिखलफेक करतो. त्याला आपण बॅडपॅच म्हणतो. पण अशा वेळी काही चांगली माणसे, चांगल्या शक्ती आपल्या मागे उभ्या राहतात आणि आपल्यावरील डाग पुसला जातो. द्रौपदीसारख्या साध्वी स्त्रीचे भर दरबारातून दु:शासन वस्त्रहरण करत असला तरी श्रीकृष्ण त्यावेळी वस्त्र पुरवून तिची लाज राखतो.
समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधात आणि मनाच्या श्लोकामध्ये तर माणसाने कसे वागावे आणि वागू नये याची उदाहरणे ठायी ठायी दिली आहेत. मूर्ख, अज्ञानी माणसाची लक्षणेदेखील सांगितली आहेत. रामदास स्वामी केवळ संत नव्हते तर एक कुशल प्रशासक, ज्ञानवंत होते. त्यांना शास्त्राचे उत्तम ज्ञान होते. पदभ्रमण करताना कुठल्या जमिनीत कुठले पीक घ्यावे, वनस्पतींचे औषधी उपयोग, कुशल नगररचनाकार अशा अनेक भूमिकांतून त्यांनी समाज घडविण्याचे काम केले.
‘अभ्यासोनि प्रकटावे’ किंवा ‘उपासनेला दृढ चालवावे’ असे मूलभूत विचार स्वामींनी मांडले आहेत. अभ्यास न करता एखाद्या विषयावर बोलू नये किंवा दुसऱ्यांच्या गुणांची कदर करावी. ज्ञानासक्त राहावे, पण परमेश्वराचे स्मरण सतत करावे वगैरे सद्विचार व्यक्तिमत्त्व विकासाचा पायाच आहेत.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी लिहिलेले प्रवचनांचे पुस्तक वाचताना तर अनेक वेळा प्रत्यय येतो की, आपण विषयासक्तीमुळे दु:ख ओढवून घेतो, क्षणिक आनंद-सुख उपभोगतो, पण पुन्हा उद्या काय? हा प्रश्न उरतो. पण रामनामाच्या स्मरणाने फक्त आनंद, प्रसन्नता मिळते आणि देहातले अवगुण कमी होतात. प्रपंच जरूर करावा, पण त्यात गुंतून जाऊ नये. एखाद्या कंपनीत बरीच वर्षे काम करताना लोक सांगतात, कामावर प्रेम करा, कंपनीवर नाही, ही कंपनी तुम्हाला केव्हाही तुमची गरज नाही, असे म्हणेल. तेव्हा गुंतू नका. दुसरीकडे चांगला मार्ग असेल तर जरूर बदललेल्या वाटेवरून जा.
वर्षांरंभी कामाच्या बाबतीत आपण ध्येय म्हणजे Goals ठरवतो. त्याच्या पूर्ततेसाठी काय काय करावे लागेल याची आखणी करतो. किती वेळात ते पूर्ण होईल हेही गणित मांडतो. पण ध्येय निवडताना ते आवाक्यातले, स्पष्ट हेतू असलेले आणि साध्य होईल असे असावे. प्रत्येक टप्प्यावर आपण केलेले काम बरोबर आहे का नाही याचा अंदाज घेत राहावे आणि ध्येयाकडे आपण योग्य दिशेने वाटचाल करतो आहोत का ते पाहावे. गोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचायचे असेल तर तुम्ही त्या दिशेने चालू लागता. थोडे पुढे गेल्यावर पुढचा रस्ता कसा आहे ते दिसतो आणि अशी मजल दरमजल करीत आपण इच्छित ठिकाणी पोहोचतो. एकदम पहिल्यांदाच मला सगळा रस्ता दिसावा ही अपेक्षा चुकीची आहे. आपण कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडताना टप्प्याटप्प्याने आपल्या कामाचे सिंहावलोकन करावे.
ही सर्व ग्रंथसंपदा वाचल्यानंतर आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान दुप्पट झाला. आपले संत, महंत आणि त्यांनी रचलेले ग्रंथ किती थोर आहेत, वंदनीय आहेत, त्यामुळे ऊर आनंदाने भरून आला. पण आज आपण हे सर्व काही वाचण्याच्या, चिंतन करण्याच्या भानगडीत पडत नाही. गोष्ट, मालिका म्हणून पाहतो, पण आपल्या आयुष्याशी या सर्वाचा किती धनिष्ट संबंध आहे हे विसरून जातो आणि परदेशी विचार म्हणून स्वागत करायला जातो. जे आता इंग्रजी पुस्तकात सांगितले आहे ते कित्येक वर्षे मागे आमच्या संतमहंतांनी लिहून ठेवले आहे याचा अभिमान वाटतो. मंडळी, विशेषत: तरुणांनो, हे वाचल्यावर वरीलपैकी एखादा तरी ग्रंथ वाचा म्हणजे कळेल. जे तू शोधतो आहेस विदेशी विदेशी म्हणून ते तुझ्याकडेच आहे. आजच्या संदर्भात या ग्रंथांचा विचार कर आणि मनावरली, बुद्धीवरली ही धूळ झटकून टाक.
रवींद्र लागू
viva.loksatta@gmail.com