Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

अग्रलेख

किंगमेकर्स!

केंद्रात सरकार कोणत्या पक्षाचे वा आघाडीचे येणार, हे कळायला आता अगदी काही तासच उरले आहेत. कोणत्याही एका पक्षाचे सरकार ही बाब निदान या खेपेपुरती तरी इतिहासजमा झाली आहे. जे मुख्य पक्ष या शर्यतीत आहेत, त्यांना आपले काय होणार, या चिंतेतच पुढले काही तास घालवावे लागणार आहेत. निवडणुकांचे निकाल तोंडावर आल्याने काही व्यक्तींच्या हालचालींवर आता प्रकाशझोत टाकला जाऊ लागला आहे. या व्यक्ती पुढल्या काही दिवसात ‘किंगमेकर्स’ ठरतील. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी ज्या

 

पाहण्या केल्या, त्यात बहुजन समाज पक्षाविषयी स्वतंत्र माहिती जमा करण्यात आली नसली आणि त्या पक्षाला लोकसभेच्या ३० ते ३५ जागा मिळतील, असे गृहीत धरण्यात आले असले तरी स्वत:च्या हिमतीवर लढणाऱ्या एका पक्षाला एवढय़ा जागा मिळणे, ही लहानसहान बाब नाही. तिसऱ्या आघाडीत सामील होण्याविषयी त्यांना निमंत्रण देण्यात आले असताही त्या पक्षाच्या नेत्या मायावतींनी ते झिडकारले आणि देशातल्या सर्व जागांवर आपण आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले. याला मस्ती म्हणत नाहीत. भले हा आत्मविश्वास अनेकांना अडचणीचा ठरणारा असला तरी ज्यांनी आपल्या डाव्या बाजूखेरीज अन्यत्र कधी बघितलेही नाही, त्यांना तो जबर धक्काच होता. आपल्याला पंतप्रधानपद मिळणार असेल तर आपण तुमच्या समवेत आहोत, अन्यथा मी एकटी त्या मार्गाने जाणारच आहे, असे मायावतींनी स्वच्छ शब्दात सांगून त्यांची संगत झिडकारली. मायावतींचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ हे अनेकांना कोडय़ात टाकणारे तत्त्वज्ञान बनले, ते यामुळेच. त्यांच्या पक्षाचे असंख्य नेते मायावतींना पंतप्रधानपदावर बसवण्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहेत, हीच मायावतींची जमेची बाजू आहे. त्यामुळे मायावती कुणाच्या पारडय़ात आपले वजन टाकतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. पाहण्यांनी दाखवलेल्या जागांपेक्षा २५-३० जागा जर भाजपच्या आघाडीला जास्त मिळाल्या तर अडवाणी पंतप्रधान आणि मायावती उपपंतप्रधान, अशी तडजोड अडीच वर्षांसाठी होऊ शकते. मायावती पुढल्या अडीच वर्षांत पंतप्रधान आणि अन्य कोणी तरी उपपंतप्रधान अशीही तडजोड असू शकते. मात्र त्यासाठी मायावतींच्या पक्षाला उत्तर प्रदेशाखेरीज अन्यत्र जागा मिळणे गरजेचे आहे. मायावतींएवढीच आत्मकेंद्रित आणि स्वहिताची पूर्ण जाणीव असणारी दुसरी व्यक्ती म्हणजे अण्णा द्रविड मुन्न्ोत्र कळघमच्या नेत्या जयललिता. तामिळनाडूत त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष ज्या आघाडीत आहे, त्या आघाडीच्या वाऱ्यालाही त्या जाणार नाहीत. तिसऱ्या आघाडीत जयललितांनी सहभागी व्हावे, यासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्टांचे नेते प्रकाश करात आणि भारतीय कम्युनिस्टांचे ए. बी. बर्धन यांनी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले. जयललिता सुरुवातीला त्या आघाडीत पोहोचल्याचे दिसले पण पुढे आपण त्यांच्या नंदनवनात वावरणे योग्य होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी या डाव्यांपासून अंतर ठेवून वागायचे पसंत केले. शिवाय ‘द्रमुक’ चे नेते उद्या त्या पक्षाची भूमिका काय ठेवतात हे गूढ कायम असल्याने जयललिता यांनी निवडणुकीनंतरच आपण काय करायचे ते ठरवू, असे जाहीर करून डाव्यांची धुंदी उतरवून टाकली. जयललिता उद्या डाव्यांबरोबर राहून केंद्रात सरकार कुणाचे आणायचे ते ठरवतात, की अडवाणींच्या पक्षाशी जमवून घ्यायचा प्रयत्न करतात हे पाहावे लागेल. काँग्रेसबरोबर काही काळ जयललिता यांचे सूत जुळले होते. ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ची ओळख दहशतवादी हीच आहे, हे तामिळनाडूत राहून आडपडदा न ठेवता सांगणाऱ्या त्या एकमेव प्रमुख नेत्या आहेत. तथापि आज त्या ‘पट्टली मक्कल कच्छी’सारख्या प्रभाकरनवादी पक्षाबरोबर कशा, हे नाही म्हटले तरी पचायला थोडे अवघड आहे. श्रीलंकेच्या प्रश्नावर तिथल्या तामिळ जनतेविषयी सहानुभूती असणे वेगळे आणि राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांना आपल्या आघाडीत ठेवणे निराळे. तसे पाहिले तर काँग्रेसनेही अशा काही व्यक्तींना जवळ केले होते, हे विसरता येत नाही. उद्याचे ‘किंगमेकर’ म्हणून एन. चंद्राबाबू नायडू यांची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. ते सध्या डाव्या आघाडीत आहेत, पण डाव्या आघाडीला सत्ता मिळणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांना आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा लागणार आहे. भाजपच्या आघाडीत ते सध्या नाहीत, पण यापूर्वीच्या त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत ते त्यांच्या समवेत होते. ‘तेलुगु देसम’ पक्षाला आंध्रप्रदेशात काँग्रेसशीच सातत्याने संघर्ष करावा लागत असल्याने तिसऱ्या आघाडीत राहून काँग्रेसला ते पाठिंबा देतील, ही शक्यता कितपत आहे, ते तपासावे लागेल. तिसऱ्या आघाडीचे अध्वर्यू प्रकाश करात, ए. बी. बर्धन असले तरी त्यांच्या आघाडीतून ‘तेलंगण राष्ट्र समिती’ अचानकपणे बाहेर पडून भाजपला जाऊन मिळाली आहे, एच. डी. देवेगौडांनी आपल्या चिरंजिवांना - कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना - सोनिया गांधींच्या भेटीसाठी पाठवून वेगळा सिग्नल दिला आहे. कर्नाटकच्या प्रश्नावर कुमारस्वामी हे सोनिया गांधींना भेटले, असे जरी देवेगौडा म्हणाले असले तरी ते खोटेपणाचे आहे. त्यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाची कर्नाटकात वाताहत होणार हे दिसत असले तरी गुडघ्याला बाशिंग बांधायला हरकत कुणाची आहे? डावीकडून तिसऱ्यांचे हे दु:स्वप्न महागात पडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते तिसऱ्यांपलीकडचे जे चौथे आहेत, त्यांची दखल घेऊ लागले आहेत. तिथे लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आणि मुलायमसिंग यादव आहेत. लालू आणि पासवान हे केंद्रात काँग्रेसच्या मंत्रिमंडळात आहेत आणि मुलायसिंग यादवांनी काँग्रेस सरकारला अणुधोरणाच्या प्रश्नावर तारले आहे. मायावती ज्या आघाडीत असतील त्या आघाडीत आपण असणार नाही, असे या तिघांनी जाहीर केले आहे. हे तिघेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत काळवेळ पाहून शिरू शकतात, पण सध्या तरी त्यांची अवस्था घर आणि घाट या दोघांनाही दूर अंतरावर ठेवणारी आहे. चौथ्यांचे हे दिवास्वप्न मायावतीच उधळून लावतील आणि त्यांना काँग्रेसकडेच परत जायला भाग पाडतील, अशी शक्यता आहे. एकूण काय, काही ‘किंगमेकर’ आहेत, तर काही राजेपद घेऊ इच्छिणारे पण पत्त्याच्या कॅटमधले जोकरही आहेत. त्यातले काही ‘पपलू’ आहेत. काहींचा ‘सीक्वेन्स’ काही झाले तरी जुळायची शक्यता नाही. त्यांच्या नावावर जुगारात अजून तरी कुणी पैसे लावल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे यापुढल्या २४ तासानंतर जसजसे निकाल हातात पडतील, तसतसे हे नेते कुठे पळतात, कुणाशी बोलतात, कुणाबरोबर बसतात, हे पाहणे मनोरंजनाचे ठरावे. या सर्व पाश्र्वभूमीवर शरद पवारांच्या दिल्लीतल्या भेटीगाठींकडेही पाहायला हवे आहे. शरद पवारांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचीही गाठ घेतली. शरद पवार यांना काहीही करून या खेपेला पंतप्रधान बनायचे आहे. त्यासाठी त्यांनी जबरदस्त ‘फील्डिंग’ही लावली आहे. पवार पंतप्रधान होऊ शकतात, पण त्यांना काँग्रेस किंवा भाजपचा पाठिंबा घ्यावा लागेल. काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाच तर महाराष्ट्रात स्वतंत्रपणाने काँग्रेसने निवडणुका लढवाव्या असा आग्रह धरणाऱ्या विलासराव देशमुख यांच्यासारख्यांना तो चालणार आहे का? विलासरावांनी तिकीट वाटपाच्या बोलण्यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य न घेता काँग्रेसने लढावे, अशी स्वच्छ भूमिका घेतली होती. ते आता पवारांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा द्यायला तयार होणार का, असा प्रश्न आहे. मुद्दा तोही नाही, काँग्रेसपक्षाखेरीज एकाच वेळी पवार हे तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीची भलावण करत होते आणि त्याच वेळी त्यांचे वेचक नेते महाराष्ट्रात काँग्रेस उमेदवारांना पाडायच्या प्रयत्नात होते. प्रसंगी शिवसेनेच्या उमेदवारांनाही ते मदत करत होते. हे काँग्रेसजनांना माहीत नसेल असे नाही. तरीही ते पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार असतील तर काँग्रेसच्या आजवरच्या धोरणाचाच तो पराभव ठरणार आहे. डाव्यांनाही शिवसेनेशी साटेलोटे करणारे पवार चालत असतील आणि अमेरिकेशी अणुउर्जा करार केला म्हणून डॉ. मनमोहनसिंग चालणार नसतील तर त्यांचीही धन्यच आहे. पवारांनी या अणुउर्जा कराराला मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि अन्यत्र पाठिंबाच दिला होता, हे बहुधा त्यांना स्मरत नसावे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या पंतप्रधानपदालाही प्रणव मुखर्जीनी आपली ज्येष्ठता सांगून विरोध केला होता, ते ज्येष्ठांमधले ज्येष्ठ प्रणव मुखर्जीही पवारांना पाठिंबा द्यायला तयार होणार असतील तर काँग्रेसजनांच्या पाठिला काही कणा शिल्लक आहे की नाही असा प्रश्न उरतो. शरद पवारांना पंतप्रधानपद हवे आहे ते मराठी माणूस म्हणून, की सेक्युलॅरिझमचे पाठिराखे म्हणून, की ज्येष्ठ मुत्सद्दी म्हणून? त्यांनी भाजपच्या पाठिंब्याचाही पर्याय निवडायला हरकत नाही. भाजप तो द्यायला तयार असेल तर त्यांनी तशीही चाचपणी करुन पाहावी. कदाचित आतापर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी तीही सुरू केली असेल, ही शक्यता नाकारता येत नाही.