Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

वाढता वाढता वाढे
हॉलीवूड असो की बॉलीवूड चित्रपटाचे बजेट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. निर्मितीच्या वेळी ओतलेला पैसा वसूल होतो की नाही, हा भाग नंतरचा पण चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कथा, अभिनेते यापेक्षा चित्रपटाचे बजेट याबद्दलच जास्त बोलबाला असतो. एवढा पैसा खर्च कुठे करणार आणि कसा याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. ‘लगान’नंतर आशुतोष गोवारीकर छोटय़ा प्रोजेक्टमध्ये हात घालतच नाही. आताही ‘बुद्ध’ हा चित्रपट निर्मिती अवस्थेत आहे. गौतम बुद्धाच्या जीवनातील कोणता भाग या चित्रपटात पाहायला मिळणार यापेक्षा १०० कोटीचे बजेट हाच सध्या सर्वाच्या चर्चेचा विषय झाला आहे. अशा प्रकारे चर्चा झालेल्या बहुतेक चित्रपटाचा फुगा फुटतो. तरीही अनेकदा चित्रपटातील श्रीमंती पाहून प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे ‘वसूल’ होतात. याच निमित्ताने गेल्या वीस वर्षांत आलेल्या ‘बिग बजेट’ चित्रपटांचा आढावा..
सहज आठवून पाहिले तर बिग बजेट आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘शोले’, ‘शान’, ‘दी बर्निग ट्रेन’, ‘रझिया सुलतान’, धर्मेद्रचा ‘शालिमार’, ‘सिलसिला’, ‘कर्मा’, इत्यादींचा समावेश आहे. त्यावेळी चित्रपटांमध्ये बडय़ा अभिनेत्यांची संख्या बरीच असली की, त्यांना देण्यात आलेल्या मानधनामुळे ‘बजेट’ वर जात असे. सुपरस्टार अमिताभ बच्चन, धर्मेद्र, हेमा मालिनी, ‘कर्मा’मध्ये दिलीप कुमार वगैरे स्टारकास्ट असल्यामुळे हे चित्रपट बिग बजेट ठरले.

‘जोडी जमली रे’मध्ये आज धमाल
‘जोडी जमली रे’ हा ‘स्टार प्रवाह’चा रिअॅलिटी शो आता चांगलाच लोकप्रिय झाला असून त्याचे नवे पर्व गुरुवारपासून सुरू झाले. नवीन सहा स्पर्धकांच्या ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट्स’ होतील आणि त्यातून जोडीदार निवडले जातील. ‘आधुनिक कांदेपोहे’ असे जरी या शोबाबत म्हटले जात असले, तरी खूपच ‘पर्सनलाइज्ड’ पद्धतीने आणि मुख्य म्हणजे विवाहेच्छूक मुला-मुलींच्या संमतीनेच लग्न ठरविण्याचा हा आगळावेगळा कार्यक्रम ठरला आहे. गुरुवारच्या भागात प्रेक्षकांनी सहा नवीन स्पर्धकांची ओळख करून घेतली. आता विविध इंटरॅक्टिव्ह खेळांमधून जोडीदार ठरवले जातील. जोडीदार निवडीचा हा अनोखा आणि सर्वानाच नवीन असा प्रकार असल्यामुळे सुरुवातीला स्पर्धक आणि त्यांचे पालकही थोडे बावरलेले दिसतात. तसेच टीव्ही माध्यमालाही ते पहिल्यांदाच सामोरे जात असल्यामुळे सूत्रधार जोडी म्हणजे अतुल परचुरे आणि कविता मेढेकर यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. स्पर्धक आणि त्यांचे पालक छोटय़ा पडद्यावर दिसताना गोंधळून जाऊ नयेत, ‘प्रेझेंटेबल’ दिसावेत म्हणून हे दोघेही कसलेले कलावंत त्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. हे करीत असतानाच स्पर्धकांना बोलते करणे, त्यांना अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी मदत करणे यासाठी कविता आणि अतुल दोघेही खूप प्रयत्न करतात. हेही या ‘रिअॅलिटी शो’चे वेगळेपण आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या भागात ‘एट ऑफ वन’ हा वेगळाच खेळ खेळला जाणार आहे. यात स्पर्धक आठ नद्या, आठ संत, आठ देवी यांची नावे सांगतील. इथे त्यांचे ‘जनरल नॉलेज’ दिसेल. तसेच ही माहिती सांगताना काय-काय गमतीजमती घडतात आणि धमाल उडते ते प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. त्याशिवाय संदीप अवचट हे ‘नृदूलदोष’ या ज्योतिषशास्त्रातील विषयावर माहिती देणार आहेत.
प्रतिनिधी

नंद्याच्या लग्नाची गोष्ट
चॉइस इज युवर्स

दर शुक्रवारी प्रदशित होणाऱ्या मराठी चित्रपटात भरत जाधव, संजय नार्वेकर किंवा भरत जाधव असलाच पाहिजे, असा एक अलिखित नियमच झाला आहे. याच अलिखित नियमाचे पालन करणारा ‘होऊन जाऊ दे’ हा भरत जाधवचा चित्रपट येत्या शुक्रवारी दाखल होत आहे. या चित्रपटातील सीताराम पाटील हे आजोबा आपल्या नातवाचे-नंद्याचे लग्न जमविण्याच्या खटपटीत असतात. घरातील प्रत्येक नातलगाचा वेगवेगळा स्वभाव आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या मुलीचा शोध सुरू असतो. थोडक्यात ‘नंद्याच्या लग्नाची गोष्ट’ असे चित्रपटाचे कथासूत्र आहे. नंद्याची भूमिका भरत जाधवने साकारली आहे. विजय सातघरे दिग्दर्शित ‘होऊन जाऊ दे’मध्ये दिपाली सय्यद, रमेश देव, विजय चव्हाण, रवींद्र बेर्डे इत्यादी कलाकार आहेत. विजय सातघरे यांनी यापूर्वी ‘नशीबाची ऐशीतैशी’ हा विनोदी चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपट दिग्दर्शकाचे माध्यम असले तरी बहुतांश मराठी चित्रपट त्यातील कलाकारांच्या नावावरच गर्दी खेचतात. ‘झक मारली..’चा दुसरा आठवडा सुरू होत असतानाच ‘होऊन जाऊ दे’ हा ‘भरत’पट येत आहे. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देतात ते येत्या आठवडय़ात कळेलच.

बेधुंद
आठवडय़ाला दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणे ही काही नावीन्याची बाब राहिलेली नाही. विनोदी चित्रपटांप्रमाणेच इतर विषयांनाही मराठी चित्रपट स्पर्श करीत आहेत. असाच थोडासा वेगळा विषय असलेला ‘बेधुंद’ चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरातील तरूण एका लष्करी शिबिरात जातात. तेथे त्यांची गाठ अशोक मराठे या शिस्तप्रिय मेजरशी गाठ पडते. या शिबिरात , असे या चित्रपटाचे कथासूत्र आहे. ‘डोंबिवली फास्ट’मध्ये आक्रमक भूमिका साकारणाऱ्या संदीप कुलकर्णी यांनी या चित्रपटात ‘अशोक मराठे’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाचा ‘लूक’ पाहून नाना पाटेकरांच्या ‘प्रहार’ची आठवण होते. डॉ. किशोर भोईर व डॉ. कामिनीदेवी भोईर यांची निर्मिती असललेल्या या चित्रपटाच्या ‘बोल्ड’ जाहिरातींनीही उत्सुकता वाढवली आहे. संतोष जुवेकर, सुशांत शेलार, मुग्धा गोडबोले इत्यादी यंग ब्रिगेडही चित्रपटात आहे. ज्ञानेश भालेकर यांची ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ सध्या जोरदार सुरू आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी आलेल्या ‘गोलमाल’ या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘बेधुंद’च्या निमित्ताने त्यांनी एक गंभीर विषय हाताळला आहे. ‘प्रहार’मधील ‘मेजर चौहान’ने प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटविलेला आहे. संदीप कुलकर्णीचा ‘मेजर अशोक मराठे’ पाहायलाही हरकत नाही.
टॉकिजवाला

भीतीची ‘ब्रिटिश ट्रीटमेंट’
आपल्याकडे दाखल होणारे बहुतांश इंग्रजी चित्रपट हे थेट ‘हॉलीवूड’ या अमेरिकेतील चित्रनगरीतून आलेले असतात. ब्रिटिश चित्रपट येथे अगदी क्वचित प्रदर्शित केले जाताना दिसतात. त्यामुळे ‘डूम्झ्डे’ नामक आपल्याकडे दाखल होणाऱ्या ब्रिटिश चित्रपटाकडे वितरणातल्या आगामी बदलाची नांदी म्हणून पाहता येईल. नील मार्शल या दिग्दर्शकाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या ‘डिसेन्ट’ या लो बजेट भीतीपटाचे जगभरात कौतुक झाले होते. ‘डूम्झ्डे’ हा जगाच्या अंताचा दिवस दाखविणारा बिग बजेट भयपट आहे. जीवघेण्या विषाणूमुळे शहरेच्या शहरे नष्ट होताना दाखविणारे अनेक चित्रपट आतापर्यंत आलेत. रिचर्ड मथीसनच्या ‘आय अॅम लेजंड’ कादंबरीवरच बेतलेला डॅनी बॉयलचा ‘२८ डेज लेटर’ किंवा ‘आय अॅम लेजंड’मध्ये या विषयाला चांगल्यापैकी मांडण्यात आले आहे. ‘डूम्झ्डे’मध्ये स्कॉटलंडमध्ये शिरणारा जिवघेणा व्हायरस आहे. व्हायरसमुळे युरोपातील शहरे नष्ट होत आहेत. या व्हायरसचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञ- डॉक्टरांच्या पथकाला आलेले भयंकर अनुभव, हा ‘डूम्झ्डे’चा कथाभाग आहे. चित्रपट अमेरिकेत चालला नाही, आणि ब्रिटिश सिनेमा म्हणून अमेरिकन समीक्षकांनीही चांगलं म्हटलेलं नाही. त्या टीकेकडे दुर्लक्ष करून चित्रपट पाहण्यासारखा आहे. व्हायरस पसरल्यानंतर शहरांची होणारी वाताहत माणसांच्या बदलणाऱ्या प्रवृत्तींवर भीतीदायक असे भाष्य या चित्रपटातून करण्यात आले आहे. सुरुवातीपासून शेवटापर्यंत अत्यंत वेगात घडणाऱ्या या ‘डूम्झ्डे’ला पाहण्यासाठी केवळ भीतीची ‘ब्रिटिश ट्रीटमेंट’ कशी असते, हेही कारण पुरेसं ठरावं.