Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे..
नवी दिल्ली, १४ मे/पी.टी.आय.

मुलायमसिंग यांची साथ आयुष्यात कधीही सोडणार नाही, असे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी आज स्पष्ट केले. निवडणूक निकालांना दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना दिल्लीत पत्रकारांशी वार्तालापात अमरसिंग बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून रामपूर मधील सपाच्या उमेदवार जयाप्रदा यांना विरोध करणारे पक्षातीलच नेते आझम खान आणि अमरसिंग यांच्यात वाद रंगला होता. आझम खान यांच्याविरोधात मुलायमसिंग यांनी कठोर कारवाई न केल्यास भविष्यात पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल.

सरकार स्थापण्यात तामिळनाडूला महत्त्व
नवी दिल्ली, १४ मे/पी.टी.आय.

द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि त्याचे विरोधक अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) या तामीळनाडूमधील दोन महत्त्वपूर्ण पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला मताधिक्य मिळाले, तरी त्या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. येथील लोकसभेच्या ३९ जागा गेल्या दशकभरापासून केंद्रात सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा उचलत असल्याचे दिसून आले आहे. डीएमके प्रमुख व तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी आणि अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यातील संघर्षांमध्ये जो मताधिक्य मिळवेल, तो केंद्रात सत्ता स्थापण्यास महत्त्वपूर्ण घटक बनणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांचे लक्ष सध्या तामीळनाडूमधील घाडामोडींवर लागले आहे.

..तर अ‍ॅन्टोनी पंतप्रधान होतील!
नवी दिल्ली, १४ मे / वृत्तसंस्था

पंतप्रधानपदासाठी डॉ. मनमोहन सिंग हेच काँग्रेसचे उमेदवार असतील, असे जाहीर करून डाव्यांचा रोष ओढावून घेणाऱ्या काँग्रेसने आता एक पाऊल मागे घेण्याचे ठरविले असून पंतप्रधानपदासाठी संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांचे नाव पुढे करण्याचा काँग्रेस विचार करीत असल्याची चर्चा आहे. ‘एक्झिट पोल’च्या निष्कर्षांनंतर डाव्यांच्या मदतीशिवाय काँग्रेस आघाडीला केंद्रात सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे डाव्यांना खूश करण्यासाठी काँग्रेसची ही नवी खेळी असल्याचे म्हटले जात आहे. अ‍ॅन्टोनींच्या नावाला डाव्यांची हरकत नसावी, असा काँग्रेसचा अंदाज आहे.

डावे युपीएला पाठिंबा देणार नाही
नवी दिल्ली, १४ मे/पी.टी.आय.

१५ व्या लोकसभेत केंद्रसरकार बनविताना डावी आघाडी काँग्रेस प्रणित आघाडी सरकारला कदापि आपला पाठिंबा देणार नाही असा स्पष्ट पवित्रा माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी येथे घेतला. काँग्रेस प्रणित आघाडीला पाठिंबा न देण्याचा निर्णय जाहीर करतानाच करात यांनी त्याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारुढ होणार नाही यासाठी डावी आघाडी कसोशीने प्रयत्न करेल, असा इशाराही दिला.

भारतीय राजकारणात अमेरिकेचा हस्तक्षेप सहन करणार नाही
नवी दिल्ली, १४ मे / पी. टी. आय.

१५ व्या लोकसभेच्या मतदानाच्या अगदी शेवटच्या दिवशी भारताचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची अमेरिकेचे राजदूत पीटर बर्ली यांनी घेतलेली भेट हा ‘भारतीय राजकारणात साफ साफ हस्तक्षेप असून तो सहन केला जाणार नाही,’ अशी कडवी प्रतिक्रिया डाव्या पक्षांच्या नेत्यांनी, तसेच तेलुगू देसमचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली आहे.

एक्झिट पोलचे निष्कर्ष अनेक पक्षांना अमान्य
नवी दिल्ली, १४ मे/पीटीआय

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे ‘घोडामैदान’ जवळ असतानाच काल जाहीर झालेले मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) निष्कर्ष बहुसंख्य पक्षांनी अमान्य केले आहेत. विविध वाहिन्यांवर जाहीर झालेल्या या निष्कर्षांबाबत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी सावध पवित्रा घेतला असतानाच भाजपसह एनडीएचे घटकपक्ष, समाजवादी पार्टी, भाकप आणि माकप या पक्षांनी हे निष्कर्ष धुडकावून लावले आहेत.

मनसे युतीला पाच-सहा जागांवर विजयापासून रोखणार
‘डोबा’चा सर्वेक्षण अंदाज जाहीर
मुंबई, १४ मे / खास प्रतिनिधी
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत एखाद-दुसऱ्या जागेवर विजयाचा चमत्कार करण्याची शक्यता धूसर असली तरी मुंबई, पुणे, नाशिक परिसरात शिवसेना-भाजपच्या सहा उमेदवारांना मनसेचे उमेदवार विजयापासून रोखण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असे घडले तर महाराष्ट्रातील निकालाचे चित्र अपेक्षेपेक्षा कितीतरी वेगळे दिसू शकेल, असा अंदाज ‘डोबा मार्केटिंग’ने निवडणूकपूर्व सर्वेक्षणाद्वारे व्यक्त केला आहे.

सोमनाथ चटर्जी पक्षात परतण्याची शक्यता नाही
नवी दिल्ली, १४ मे/पीटीआय

लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात पुन्हा परत घेण्याची शक्यता पक्षाने आज फेटाळली. ज्या कारणासाठी पक्षाने त्यांना काढले ते कारण अद्यापही अस्तित्वात असल्याचे पक्षाने म्हटले आहे.या संदर्भात माकपच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य एम. के. (मधुकर काशिनाथ) पंधे यांनी सांगितले की, अणुकराराच्या मुद्दय़ावर सरकारवरील विश्वासदर्शक ठराव हा निर्णायक प्रसंग होता. त्यावेळी चटर्जी यांनी पक्षाशी द्रोह करून कॉँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षाने आपल्याला पुन्हा प्रवेश दिला तर आपल्याला आनंद वाटेल, या चटर्जी यांच्या कथित वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारता पंधे म्हणाले की, विश्वासदर्शक ठरावाच्या घटनेनंतर स्वत: चटर्जी यांनी चूक कबूल केलेली नाही. कॉँग्रेसला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा देण्याबाबत ते म्हणाले की, पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.