Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

बॉक्साईट वाहतूकप्रश्नी मंगळवारी कोल्हापुरात व्यापक बैठक
कोल्हापूर, १४ मे / विशेष प्रतिनिधी

बॉक्साईट वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्यातून बिघडणारी कायदा व सुव्यवस्था याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी दिनांक १९ मे रोजी या प्रश्नाशी संबंधित सर्व घटकांची एक व्यापक बैठक आपण बोलावली असून या बैठकीत नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरणाचा समतोल आणि कायदा व सुव्यवस्था यांना प्राधान्य देऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुवारी शिवसेना व हिंदाल्को विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.बॉक्साईट वाहतुकीमुळे नागरी जीवन धोक्यात येत असल्याने या वाहतुकीला पायबंद घालावा या मागणीसाठी गुरुवारी राधानगरी-भुदरगड तालुक्यातील ग्रामस्थांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

स्वतंत्र सांगली तालुकानिर्मिती आचारसंहितेपूर्वी- प्रतीक पाटील
सांगली, १४ मे / प्रतिनिधी

स्वतंत्र सांगली तालुकानिर्मितीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सांगली तालुका अस्तित्वात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याची माहिती खासदार प्रतीक पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक तसेच सांगली जिल्हय़ातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस रोहयोमंत्री मदन पाटील व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित होते.

डाव्यांच्या पाठिंब्याविना काँग्रेस आघाडी सरकार येणार- पृथ्वीराज चव्हाण
कराड, १४ मे/वार्ताहर

केंद्रातील पाच वर्षांच्या कारकीर्दीत केलेल्या भरीव कामगिरीच्या जोरावर काँग्रेसला भाजपपेक्षा ३० ते ३५ जादा जागा मिळून केंद्रात काँग्रेस मित्रपक्षांचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे महासचिव पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. डॉ. मनमोहन सिंग हेच नवे पंतप्रधान असतील, तर लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान होण्यास अजिबात संधी नसल्याचा दावा त्यांनी केला.
विविध एक्झिट पोलचे अंदाज पाहाता पुरोगामी लोकशाही आघाडीलाच सत्ता स्थापण्याची पुनश्च संधी असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीपेक्षा आम्ही मोठे अंतर गाठू. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेत यायला निश्चितच अडचण नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गॅस एजन्सी कार्यालयातून गूढरीत्या सव्वालाख लंपास
कोल्हापूर, १४ मे / प्रतिनिधी

राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये असलेल्या घोटणे गॅस एजन्सीच्या कार्यालयातील एक लाख ३५ हजार रुपयांची रक्कम गूढरीत्या लंपास करण्यात आली. कार्यालयाच्या दरवाजांना असलेली कुलपे जशीच्या तशी होती. तरीही कार्यालयाच्या आतमधील एक कपाट फोडून कपाटातील ही रक्कम लंपास झाल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. या प्रकरणी नगरसेवक शेखर घोटणे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेखर घोटणे यांचे गॅस एजन्सीचे कार्यालय राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये आहे.

सोलापूरला वाळू तस्करांकडून एक कोटी ७१ लाख दंड वसूल
सोलापूर, १४ मे/प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्य़ात वाळू तस्करांकडून धुमाकूळ घातला जात असताना जिल्हा प्रशासनाने वाळू तस्करी रोखण्यासाठी मार्च अखेर १२८१ वाळू वाहतुकीच्या मालमोटारींवर कारवाई करुन एक कोटी ७१ लाख २ हजारांचा दंड वसूल केला आहे. मात्र कारवाईचा हा केवळ देखावा असून प्रत्यक्षात वाळू तस्करी किती तरी पटींनी होत असल्याचे बोलले जाते.
वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सजग असल्याचा भास निर्माण करण्यात येत असून प्रत्यक्षात प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणा व राजकीय वरदहस्त यामुळे वाळू तस्करांना रान मोकळे मिळाले आहे. यात अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवत असल्याचे दिसून येते.

दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचा गोळीबार
सोलापूर, १४ मे/प्रतिनिधी

कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावर भांबुरे वस्तीजवळ संशयित दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. परंतु यात कोणीही जखमी झाले नाही किंवा एकालाही अटक झाली नाही. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. भांबुरे वस्तीजवळ शिवलाल शहा यांच्या शेतात दरोडेखोर आल्याची माहिती मिळाल्याने कुर्डूवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर चव्हाण व सहकारी तेथे तात्काळ धावून गेले. पोलीस आल्याचे पाहताच संशयित दरोडेखोरांना पळ काढण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

इचलकरंजी अर्बन बँकेच्या कागल शाखेला टाळे ठोकले
कागल, १४ मे / वार्ताहर

येथील इचलकरंजी अर्बन बँकेच्या शाखेतील संस्था व व्यक्तिगत ठेवीदारांच्या ठेवींबाबत प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने जाहीर केल्याप्रमाणे आज शाखेला टाळे ठोकण्यात आले. शुक्रवारी याबाबत निर्णय न झाल्यास शाखेतील कर्मचाऱ्यांची धिंड काढण्याचा इशारा रमेश माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला असून, मुख्य कार्यालयातील प्रशासन व संस्थाप्रमुखांच्या आडमुठय़ा धोरणाच्या तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी रमेश माळी, दिलीप सणगर, सुभाष करंजे, मुकुंद जोशी, अरुण पाटील, नाना जकाते, रत्नाकर मुरगुडे, अनिता बनके, स्वप्ना माळी, बाळासो. साठे, राहुल पाटील, बाबूराव पाटील आदी सहभागी झाले होते. गेले तीन दिवस ठेवीदार शाखेत येत आहेत. मात्र बँकेचे अध्यक्ष, मुख्य शाखेचे व्यवस्थापक कागल शाखेत येऊन ठेवीदारांशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता जिल्हा पोलीसप्रमुखांना सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब निंदनीय असून अर्बन बँकेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, जनता बँकेचे अध्यक्ष, अर्बन बँकेचे मुख्य व्यवस्थापक व जबाबदार संचालक येऊन ठेवीदारांना ठोस निर्णय देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, येथे असलेल्या कर्मचारी बँकेकडून व आंदोलकांकडून पूर्णपणे कात्रीत सापडला असून, मुख्य कार्यालयाकडून केवळ फोनवरून कर्मचाऱ्यांना आदेश देण्याचेच काम होत असल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक
कोल्हापूर, १४ मे / प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली. या निमित्ताने सायंकाळी पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकापासून मंगल कलशाची मिरवणूक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पापाची तिकटी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाची जागा गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. त्याठिकाणी संभाजीराजेंचा पुतळा उभा करण्यात यावा अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे. याच ठिकाणी पुतळा उभा करण्याचे निश्चित झाले असून संभाजीराजेंचा वध ज्या ठिकाणी करण्यात आला त्या वढू बुद्रूक गावातील पवित्र माती मंगलकलशातून येथे आणण्यात आली. या मातीचे अंश नियोजित पुतळ्यामध्ये घातले जाणार आहेत. या मंगलकलशाची मिरवणूक सायंकाळी काढण्यात आली. राजे संभाजी तरुण मंडळ यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापालिकेचे पक्षप्रतोद अजित राऊत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, हिंदूुराव शेळके तसेच अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त सकाळी मराठा सेवासंघाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढून रूईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजीराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

गोकुळच्या मायक्रो ट्रेनिंग सेंटरची तिटवेत आजपासून सुरुवात
राधानगरी, १४ मे / वार्ताहर

दुग्ध व्यवसायातील प्रगत प्रशिक्षणाअभावी शेतक ऱ्यांची होणारी कोंडी दूर करण्यासाठी गोकुळ तर्फे राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे मायक्रो ट्रेनिंग सेंटरची सुरुवात उद्यापासून होणार आहे. गोकुळच्या सहकार्याने सुरू होणारे हे केंद्र जिल्ह्य़ातील एकमेव केंद्र ठरणार आहे. दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्य़ात उत्तम पशुधन असूनही प्रगत तंत्रज्ञान देणारे केंद्र नाही. त्यामुळे ेगोकुळने तिटवे येथे ८० म्हशींचा गोठा चालवणाऱ्या सागर किल्लेदार या प्रगतशील शेतक ऱ्याच्या प्रत्यक्ष गोठय़ावरच हे केंद्र सुरू करण्याचे प्रयोजन केले आहे. किल्लेदार हे दुग्ध व्यवसायासह कृषी क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी. वैरण, पशुखाद्य विकास व जातिवंत जनावरांची पैदास या विषयी वर्षांतील अतिवृष्टीचे तीन महिने वगळता २१० दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकादिवशी तीस शेतक ऱ्यांच्या तुकडीला प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्राथमिक दूध संस्थेमार्फत शेतक ऱ्यांची निवड केली जाणार असून प्रतिशेतक ऱ्यांमागे गोकुळ शंभर रुपये खर्च करणार आहे. दुधाचा महापूर योजनेचे जनक डॉ.व्ही.कुरियन यांच्या दूधविकास संकल्पनेनुसार घरोघरी दूध व्यवसाय वाढविण्यासाठी हे केंद्र चालवले जाणार आहे. या केंद्रासाठी आतापर्यंत कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील ९०० शेतक ऱ्यांनी नावे नोंदवली आहेत. आज सकाळी ९ वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार असून विविध ठिकाणचे तज्ज्ञ मार्गदर्शनाला उपलब्ध होणार आहेत.

बेकायदा वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
सोलापूर, १४ मे/प्रतिनिधी

बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपातून पोलिसांनी भरलेल्या खटल्यात डॉ. शांतीकुमार वि. चिकमठ (वय ५३, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांची सोलापूरच्या न्यायदंडाकाऱ्यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. डॉ. चिकमठ हे बोगस डॉक्टर असून ते बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जेलरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शंकर चव्हाण यांनी २ मे २००३ रोजी भवानी पेठेत छापा घालून डॉ. चिकमठ यांना पकडले होते. त्यांच्याकडे दवाखान्याचे फलक, रुग्णासाठी खाट, सलायन स्टॅन्ड, जननवार्ता रजिस्टर, साई प्रसूतिगृह या नावाचा शिक्का, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीत डॉ. चिकमठ यांनी स्वत वैद्यकीय व्यवसाय केल्याचा कोणताही पुरावा नाही. रुग्णांचा तसा जबाबही घेतला गेला नाही, असा युक्तिवाद अॅड. शशी कुलकर्णी यांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडताना केला. या खटल्यात त्यांना अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. सचिन कोळी, अॅड. स्वाती क्षीरसागर यांनी साह्य़ केले.

शाहू साखर कारखान्याची दुसरी उचल टनाला २२५ रुपये
कागल, १४ मे/वार्ताहर

येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे सन २००८-०९ मध्ये गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २२५ रुपये दुसरी उचल जाहीर केली असून, या उचलीपोटी १५ कोटी ८७ लाख रुपये १५ मे रोजी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी दिली. याप्रसंगी सर्व संचालक उपस्थित होते.
कारखान्याने पहिली उचल प्रतिटन १२०० रुपयेप्रमाणे दिली असून, यापोटी ८७ कोटी ३८ लाख रुपये ऊस उत्पादकांना अदा केले आहेत. सन २००८-०९ गळीत हंगामात कारखान्याने १८० दिवसांत ७ लाख ५ हजार ७५४ टन उसाचे गाळप केले. १२.८३ सरासरी उताऱ्याने ९ लाख ६ हजार ४१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, उद्दिष्ट पूर्ण करण्यात कारखाना यशस्वी ठरला आहे. सन २००८-०९ मध्ये कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाने १४८ दिवसांत ८३ लाख स्पीरिटचे उत्पादन केले आहे. सरासरी स्पीरिट उतारा ५ टन २८० लीटर इतका मिळाला आहे. प्रतिदिनी ४५ हजार लीटर उत्पादन क्षमता असताना सरासरी उत्पादन प्रतिदिनी ५५ हजार ८०७ लीटर इतके मिळाले असून, डिस्टिलरी विभाग अद्याप सुरू आहे.

पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी धरणाचे पाणी सोडण्याचा आराखडा
इचलकरंजी, १४ मे/वार्ताहर

पंचगंगा नदीतील दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेऊन धरणातून नदीत पाणी सोडण्याचा कालावधी किती असावा, याचा कृती आराखडा बनविण्यात येणार आहे. याप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी पाटबंधारे खात्यास कृती आराखडा बनविण्याचा आदेश दिला. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या दूषित पाणीप्रश्नी झालेल्या बैठकीस इचलकरंजीचे प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, शिरोळचे जि.प.सदस्य अमरसिंह पाटील, पाटबंधारे खात्याचे अधिकारी तसेच नांदणी, शिरोळ, धरणगुत्ती आदी गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.अमरसिंह पाटील यांनी पंचगंगा नदीमध्ये धरणातून पाणी सोडले की, दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर होतो याकडे लक्ष वेधले. कोल्हापूरपासून वाहात येणारे पाणी, त्यामध्ये सामावणारे दूषित पाणी यामुळे नदीतील पाण्याला उग्र, घाण वास येतो. या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तेरवाड धरणातील बॅकवॉटरमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. त्यामुळे नदीत पाणी सोडू नये, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. बैठकीत धरणातील पाणी उपलब्धता, धरणाची दुरुस्ती, पाणी सोडण्याचा वेळा, भारनियमन आदी मुद्दय़ांची चर्चा झाल्यानंतर जिल्हाधि-काऱ्यांनी उपरोक्त आदेश दिला.