Leading International Marathi News Daily
शुक्रवार, १५ मे २००९

पवारांनी फासे फेकले
मुंबई / नवी दिल्ली, १४ मे/प्रतिनिधी

वेगवेगळ्या ‘एक्झिट पोल’च्या निष्कर्षांनंतर काँग्रेसप्रणीत यूपीए आणि भाजपप्रणीत एनडीएला २७२ चा जादुई आकडा गाठणे अशक्य वाटत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपेक्षेप्रमाणे पंतप्रधानपदासाठी फासे फेकले असून त्यादृष्टीने जोरदार जुळवाजुळव सुरू केली आहे. छोटय़ा पक्षांची मोट बांधायला सुरुवात करतानाच उद्योगपतींच्या गाठीभेटी पवारांनी सुरू केल्या आहेत. सत्तेच्या या सारीपटात पवारांनी आपला सारा अनुभव पणाला लावण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी तिसऱ्या व चौथ्या आघाडीबरोबरच छोटय़ा पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधानपदाकरिता पवारांना नवीन पटनायक, जयललिता, ए. बी. बर्धन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच मुलायमसिंग यादव यांचा पवारांना पाठिंबा आहे. डावे पक्षही पवारांना अनुकूल आहेत.

खेबुडकर,रेखा यांना शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
पुणे, १४ मे / खास प्रतिनिधी

प्रसिद्ध मराठी पटकथा लेखक व गीतकार जगदीश खेबुडकर यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर आघाडीचे दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना व्ही. शांताराम स्मृती विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट रसिकांच्या हृदयावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री रेखा यांना राजकपूर स्मृती जीवनगौरव पुरस्कार व प्रयोगशील अभिनेता आमिर खान यांना राज कपूर स्मृती विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मान्सून केरळात २६ मे रोजी दाखल होणार
पुणे, १४ मे/खास प्रतिनिधी

नैऋत्य मान्सून या वर्षी त्याच्या नियोजित वेळेच्या सहा दिवस आधीच म्हणजे २६ मे रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर तो येत्या दोन-तीन दिवसांतच अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यत: मान्सूनचे अंदमान समुद्रात २० मे रोजी आगमन होते. पाठोपाठ १ जून रोजी तो केरळात दाखल होतो. या वर्षी या दोन्ही ठिकाणी तो वेळेआधी येण्याची शक्यता आहे. या वर्तविलेल्या अंदाजात चार दिवसांची तफावत असू शकते. त्यामुळे मान्सून २२ ते ३० मेच्या दरम्यान केरळात दाखल होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून वरुण गांधींविरोधातील रासुका मागे
नवी दिल्ली, १४ मे / पी. टी. आय.

भारतीय जनता पार्टीचे फायरब्रॅण्ड नेते आणि उत्तर प्रदेशातील पीलभीत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वरुण गांधी यांच्याविरुद्ध लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा तात्काळ हटविण्यात यावा, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने मायावती सरकारला दिला. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने वरुण गांधी यांच्याविरोधातील रासुका हटवून त्यांची मुक्तता केली. सरन्यायाधीश के. जी. बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आज वरुण गांधींची याचिका आली असता त्यावर निर्णय देताना न्यायालयाने वरुण गांधी यांच्याविरोधातील रासुकाअंतर्गत स्थानबद्धताही तात्काळ उठविण्यात यावी, असा आदेश दिला. २९ वर्षीय वरुण गांधी यांना २९ मार्च रोजी पिलभीत येथील प्रचारसभेत जातीय विष पेरणारे प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली रासुकाखाली अटक करण्यात आली होती.

आघाडय़ांची खलबते
काँग्रेस आणि भाजपसाठी ‘होमवर्क’चा दिवस
नवी दिल्ली, १४ मे/खास प्रतिनिधी

आपापल्या मित्रपक्षांशी असलेली निवडणूकपूर्व युती शाबूत ठेवून सध्या तिसऱ्या आघाडीत असलेल्या पक्षांना भुरळ घालण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपने लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली. लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेले एक्झीट पोल, पक्षांतर्गत सर्वेक्षण आणि ठोस माहितीच्या आधारे सत्तेचे गणित जमविण्यात आज काँग्रेस आणि भाजपचे नेते दिवसभर गुंतले होते. शनिवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सत्तेच्या समीकरणांचे ‘होमवर्क’ सज्ज करण्यावर प्रतिस्पर्धी आघाडय़ांनी भर दिला आणि संभाव्य मित्रपक्षांशी संपर्क साधण्याची मोहीमही हाती घेतली.

माध्यमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रच कायम ठेवणार
‘सीबीएसई’च्या शहाला राज्य मंडळाचा काटशह
पुणे, १४ मे/खास प्रतिनिधी
‘सीबीएसई’सारख्या केंद्रीय मंडळांच्या दबावाला धुडकावून राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे त्रिभाषा सूत्रच कायम राखले जाईल, अशी ग्वाही देणारी शिफारस पुण्यातील शैक्षणिक विचारमंथन कार्यशाळेत आज एकमुखाने करण्यात आली. केंद्रीय मंडळांच्या शाळा प्रादेशिक अस्तिमेच्या दृष्टीने घातक ठरत असल्याने त्या शाळांमधूनही स्थानिक भाषाशिक्षण देण्यासाठी दबाव आणावा, असे या वेळी सुचविण्यात आले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही राज्यस्तरीय कार्यशाळा भरविण्यात आली होती. भाषाविषयक योजना, गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन, मूल्यांकनाच्या पद्धती, प्रशिक्षण योजना आणि ई-शिक्षण या विषयांवर र्सवकष चर्चा करून शिफारशी सादर करण्यात आल्या. बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह राज्यभरातून आलेले शिक्षक, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, शासकीय अधिकारी आदींनी या कार्यशाळेत मतप्रदर्शन केले. या प्रत्येक गटावर आधारित शिफारशी करण्यात आल्या असून, शैक्षणिक धोरणात सुधारणा घडविण्याच्या मोहिमेत त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

चहा आणखी महागणार
मुंबई, १४ मे/ व्यापार प्रतिनिधी

केनिया व श्रीलंकेतील चहाचे उत्पादन घटल्याने तसेच भारतातील उत्तर व दक्षिण भागातील चहा मळ्यांतील चहा खुडण्याचा वेग मंदावल्याने चहाच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील चहा खुडण्याचा वेग मंदावल्याने चहाच्या हिरव्या पानांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर चहा उत्पादनाच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लिलाव केंद्रातील चहाच्या किंमतीत सरासरी ८० ते ९० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ महाराष्ट्र टी ट्रेडर्स असोसिएशन’ आणि ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी टेडर्स असोसिएशन’ या चहा व्यापाऱ्यांच्या संघटनांचे अध्यक्ष हेमेंद्र शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजप - डाव्यामध्ये सत्तासंघर्ष पेटणार!
नवी दिल्ली, १४ मे/खास प्रतिनिधी

शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालांनंतर पंधराव्या लोकसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला सरकार स्थापन करण्याची संधी असली तरी प्रत्यक्षात डावी आघाडी आणि भाजप यांच्यातच सत्तासंघर्ष पेटला आहे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची लालकृष्ण अडवाणी यांना शेवटची संधी असताना केंद्रात कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार येऊ नये म्हणून डाव्या आघाडीने १६ मे नंतरची ठोस रणनिती आखून ठेवली आहे. दोन कट्टर वैचारिक प्रतिस्पध्र्यांमध्ये उद्भवणारा हा टोकाचा संघर्ष काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहे.

अमरसिंहांच्या प्रकृतीची दिग्विजय यांच्याकडून चौकशी
नवी दिल्ली, १४ मे / पी.टी.आय.
काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांच्या प्रकृतीची दूरध्वनीवर विचारपूस केली. दोन्ही नेत्यांनी बऱ्याच काळानंतर परस्परांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूक निकालाचा दिवस जवळ येऊ लागल्याने समाजवादी पक्षाला चुचकारण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केल्याचे हे लक्षण असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. मात्र, दिग्विजय सिंह यांनी याचा इन्कार केला. ते म्हणाले, अमर सिंह यांची प्रकृती बरी नसल्याचे कळल्याने त्यांची विचारपूस केली एवढेच. निवडणूक प्रचाराच्या काळात एखाद्या विधानाने अमर सिंह दुखावले गेले असतील तर माफ करावे, असे आपण त्यांना सांगितले. अमर सिंह यांनीही अशीच भावना दिग्विजय सिंह यांच्याकडे व्यक्त केली. उल्लेखनीय म्हणजे उत्तर प्रदेशातील जागावाटपाची चर्चा फिस्कटण्याला दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा आरोप अमर सिंह यांनी केला होता.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी