Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

औरंगाबादमध्ये गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नागरिकांनी पावसात भिजण्याचा, साचलेल्या पाण्यातून गाडय़ा पळविण्याचा आनंद घेतला. वादळी वाऱ्यामुळे मार्गावर झाडे उन्मळून पडली होती. रस्त्यावरच झाड आडवे पडल्यामुळे वाहने खोळंबून राहिली.

वादळी पावसाचा तडाखा
औरंगाबाद, १४ मे/प्रतिनिधी
शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसाने उकाडय़ातून सुटका केल्यामुळे औरंगाबादकर सुखावले खरे; मात्र शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतूक थंडावली. ही झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अनेक ठिकाणी विद्युत कंपनीचे खांबही कोसळले.

तरुण रमेशने लावला मशरूमरूपी ‘कल्पवृक्ष’!
सतीश टोणगे, कळंब, १४ मे
कितीही शिक्षण घेतले तरी नोकरीची हमी नाही. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘नोकरीऐवजी उद्योग करा,’ हा सल्ला तालुक्यातील खामसवाडी येथील रमेश रणदिवे याने मनावर घेतला. ‘कल्पवृक्ष मशरूम’ (आळिंबी) हा प्रकल्प अल्प भांडवलावर सुरू केला असून ही आळिंबी आता परदेशातही जाऊ लागली आहे. बेताची आर्थिक परिस्थिती व कुटुंबीयांचा विरोध यावर मात करून रमेशने हा प्रकल्प यशस्वी केला आहे.

‘मदर्स डे’
रविवारी, १० मे रोजी सकाळीच चिरंजीवाचा फोन आला. ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा देत तो इंग्रजीतून थाटात म्हणाला, ‘‘माझ्यासाठी केलेल्या आणि आजही करतेयस त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझा कायम आभारी आहे.’’ या अनुवादासारखंच ऐकायलाही जरासं औपचारिक वाटलं हे; पण नाही म्हटलं तरी जीव सुखावलाच! मुलांनी आभार मानावेत म्हणून आई कष्टत राहते असं नाहीच. वात्सल्यातून ती सगळं करते. पण तरीही त्या करण्याची दखल घेतल्या गेल्याचा आनंद तर तिला होणारच. माणूसच आहे ती. शब्दांनी सुखावणारच.

परभणी जिल्हा बँक नमली!
जाचक अटींना अखेर मुरड

आसाराम लोमटे, परभणी, १४ मे
घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट रकमेचा बोजा शेतकऱ्यांच्या सात-बारावर टाकणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अखेर नमती भूमिका घेतली आहे. शेतकऱ्याने जेवढे कर्ज घेतले असेल, तेवढय़ाच रकमेचा बोजा टाकण्यात येणार आहे. यानिमित्ताने जिल्हा बँकेने आपल्या जाचक अटींचे पाश शेतकऱ्यांसाठी सैल केले आहेत.

नांदेडमध्ये ‘महापौर हटाव’ मोहीम सुरू!
नांदेड, १४ मे/वार्ताहर
महापौर बलवंतसिंग गाडीवाले यांच्याविरुद्ध काँग्रेसच्याच काही नगरसेवकांनी आघाडी उघडली असून ‘गाडीवाले हटाव’चा नारा दिला आहे. नगरसेवक अजयसिंह बिसेन या आघाडीचे नेतृत्व करीत असल्याचे सांगण्यात आले.

दुष्काळग्रस्तांना सरकार मदत करणार- सतबीरसिंग
हिंगोली, १४ मे/वार्ताहर

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकरी व दुष्काळाचा फटका बसलेल्यांना राज्य सरकारतर्फे आवश्यक ती मदत केली जाईल, अशी माहिती जिल्ह्य़ाचे पालक सचिव विजय सतबीरसिंग यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

रिक्षाचालक संघटनेच्या तिघांना अटक; पोलिसांशी वाद, एस.टी बसवर दगडफेक
नांदेड, १४ मे/वार्ताहर
वाहन तपासणीच्या नावाखाली पोलीस ऑटोचालकांना त्रास देत आहेत, असा आरोप करीत पोलिसांशी वादावादी करणाऱ्या ऑटोरिक्षा शिवसेना चालक संघटनेच्या वैजनाथ देशमुखसह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी रात्री कौठा परिसरात झालेल्या या घटनेनंतर अज्ञात समाजकंटकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसवर दगडफेक केली.

दोन फरारी आरोपींना अटक
लातूर, १४ मे/वार्ताहर
पुरणमल शासकीय तंत्रनिकेतनामधील रॅगिंगच्या गुन्ह्य़ात फरारी असलेल्या दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी आज अटक केली. अमोल सूर्यवंशी व शिवराज घवले अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही आरोपी सज्ञान असल्यामुळे त्यांना रविवापर्यंत (दि. १७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला.

अपघातात एक ठार, दोन जखमी
उस्मानाबाद, १४ मे/वार्ताहर
रस्ता दुभाजकाला धडकून एक दुचाकीस्वार जागीच ठार व दोन जण गंभीर जखमी झाले. पोलीस वसाहतीसमोर आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. सोहेल शेख, संदीप घोडेराव, बाळू कवडे मोटरसायकलवरून निघाले होते. रस्ता दुभाजकावर त्यांची दुचाकी आदळली. सोहेल शेख (वय २१) जागीच ठार झाला. गंभीर जखमी घोडेराव व कवडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विनापरवाना दारुसह सहा लाखांचा ऐवज जप्त
गेवराई, १४ मे/वार्ताहर
विनापरवाना नेण्यात येणारी दारू व जीप असा सहा लाख रुपयांचा ऐवज गेवराई पोलिसांनी आज उमापूर रस्त्यावरील बेलगाव फाटय़ाजवळ पकडला. आरोपी मात्र पसार झाले. शहरात दमणहून विनापरवाना विदेशी दारू जीपने (क्रमांक एमएच २३ ई ६१३१) येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक राजू खार्डे यांच्या नेतृत्वाखाली पथक नाशिक-शेवगाव-गेवराई रस्त्यावरील बेलगाव फाटय़ावर दबा धरून बसले. दुपारी ३ वाजता दरम्यान जीप येताना त्यांना दिसली. त्यानंतर त्यांनी जीपचा २ किलोमीटर पाठलाग करून पकडली. त्यातील तीन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. विदेशी दारूचा दोन लाख ६४ हजार ७६० रुपयांचा माल व तीन लाख २० हजार रुपयांची जीप असा, एकूण ५ लाख ७४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा
बीड, १४ मे/वार्ताहर
केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे घरामध्ये बनावट देशी दारूचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा घालून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल, पॅकिंग मशीनसह २८ हजार रुपयांचा माल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या सूचनेनुसार जिल्हा विशेष पथकाने सर्वत्रच अवैध दारू व धंद्याविरुद्ध धाडसत्र सुरू केले आहे. केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे लालासाहेब अनंत काळे व महादेव अनंत काळे हे दोघे भाऊ आपल्या घरातच बनावट दारू तयार करून पॅकिंग मशीनद्वारे विविध कंपन्यांचे लेबल लावून उत्पादन करत असल्याची खबर मिळाल्यानंतर काल सायंकाळी विशेष पथकाच्या पोलिसांनी काळे यांच्या घरावर छापा टाकून दोघांनाही ताब्यात घेतले. छाप्यात देशी दारू तयार करण्याचे साहित्य, विविध कंपन्यांचे बनावट लेबल, पॅकिंग यंत्र व रंग आणि चव यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

परळीत हलका पाऊस
परळी वैजनाथ, १४ मे/वार्ताहर
काळेभोर ढग, विजांचा लखलखाट, गार सोसाटय़ाचे वारे आणि प्रचंड गडगडाट असे नेहमी पावसाळ्यात असणारे वातावरण उन्हाळ्यात बघायला मिळत असल्याने परळीकर कालपासून कडक उन्हाळ्यातही पावसाळी वातावरण अनुभवत आहेत. यामुळे नागरिक सुखावले आहेत. आज दुपारीपासून पुन्हा आकाशात काळे ढग जमू लागले. मध्येच जोरदार वाहू लागले आणि काही वेळातच हलकासा पाऊस आला. सायंकाळीही ढगाळ आणि पावसाळी वातावरण कायम होते.

विजांच्या कडकडाटांसह हिंगोलीत पाऊस
हिंगोली, १४ मे/वार्ताहर
हिंगोलीत गुरुवारी रात्री साडेआठनंतर विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडला. या पावसामुळे थंडावा निर्माण झाला. आज दुपारपासूनच हिंगोलीमध्ये ढगाळ वातावरण होते. जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटांसह बिगरमोसमी पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागातील वीज गायब झाली आहे.

आगीत दोन लाखांचे नुकसान
औरंगाबाद, १४ मे/प्रतिनिधी
शहरात काल दोन ठिकाणी लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. पहिली आग पहाटे चार तर दुसरी आग दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लागली. शॉर्टसर्किटमुळे या आगी लागल्या. अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मंजूरपुरा येथील अजिंठा इमारतीतील सय्यद जावेद यांच्या ऑटोमोबॉईलच्या दुकानाला आग लागली. अर्धातास ही आग धगधगत होती. यात दीड लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे अग्निशमन विभागाने सांगतिले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोकणवाडी चौकातील कैलास मार्केटमधील प्लॅनेट संगणक या दुकानाला आग लागली. यात ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

नांदेडमध्ये कर्मचाऱ्यांना आज दुसऱ्यांदा प्रशिक्षण
नांदेड, १४ मे/वार्ताहर
नांदेड लोकसभा मतदारसंघात १६ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर उद्या (शुक्रवारी) कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कै. शंकरराव चव्हाण सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या प्रशिक्षणास संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात मतमोजणीची सुरू होणार आहे.

‘महापुरुषांचे विचार आत्मसात करा’
बोरी, १४ मे/वार्ताहर
महापुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. विद्या चौधरी यांनी आज केले. छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती राजश्री शाहू महाराज विचार प्रतिष्ठानाने आज ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. डॉ. कालिदास चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना चौधरी, बाळासाहेब जाधव, नितीन कनकुटे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. चौधरी म्हणाल्या की, महापुरुषांचे विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून ते अमलात आणण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेऊन गावागावात स्वच्छता मोहीम राबवावी. यानंतर रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

जळकोटमध्ये बेलगाम वृक्षतोड
जळकोट, १४ मे/वार्ताहर
तालुक्यात अलीकडे काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या झाडांची लाकडे घेऊन जाणारे अनेक वाहने तालुक्यातून भरवस्तीतून, मुख्य रस्त्याने दररोज खुलेआम रवाना होतात. पण त्याविरुद्ध कुठलीच कार्यवाही प्रशासनाकडून होत नाही. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील नावीन्यपूर्ण उपक्रम या भागात ‘वन संवर्धन व वन संरक्षण या बाबत उपाययोजना करणे’ या तरतुदीचा अंतर्भाव आहे. पण याबाबत वन विभागाने मार्गदर्शन किंवा कार्यवाही केल्याचे अथवा कुठल्या तंटामुक्त गाव समितीने अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही.

सीईटी परीक्षा शांततेत
लातूर, १४ मे/वार्ताहर
आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र या तिन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली एकच सामायिक प्रवेश परीक्षा जिल्ह्य़ातील वीस परीक्षा केंद्रांवर शांततेत पार पडली. शहरातील एकूण १२ परीक्षा केंद्रांवर ७ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनान उपकेंद्रप्रमुखासह ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, निवासी उपजिल्हाधिकारी अनसूया गिरी, शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेले डॉ. नागावकर यांनी ही परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी परिश्रम घेतले.

दूरध्वनी सेवा विस्कळित
सोयगाव, १४ मे/वार्ताहर
दूरसंपर्क विभागाची सेवा विस्कळित झाल्याने गावातील अनेक दूरध्वनी सोमवारी दुपारपासून बंद पडले. यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. दोष नेमका काय होता, हे समजले नाही.

सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ
बोरी, १४ मे/वार्ताहर
गावात व परिसरात काल रात्री अचानक आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी लग्नसमारंभाच्या मंडपाचे नुकसान झाले.
काल सकाळपासून आकाश निरभ्र होते, उन्हाची तीव्रताही अधिक होती. रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले, दुधगाव येथे कापडी मंडपाचे जवळपास पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
बुधवार-गुरुवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने मोठय़ा प्रमाणावर मंडप उभारण्यात आले होते. वाऱ्यामुळे मंडप डेकोरेशन वाल्यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी मंडपाविना लग्न लावण्यात आले. कौसडी परिसरात विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे बऱ्याच वेळ वीजपुरवठा बंद होता.

कायदा असूनही बालविवाह सर्रास !
वसमत, १४ मे/वार्ताहर

बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही ग्रामीण भागासह शहरी भागात मोठय़ा प्रमाणात बालविवाह होत आहेत. पण संबंधित विभाग मौन बाळगून असल्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. कायदा लागू झाला त्या वेळी ग्रामीण व शहरी भागातील विवाह सोहळय़ांवर करडी नजर ठेवल्याने अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावणारे पालक चांगलेच धास्तावले होते. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून या कायद्याला बगल देत बालविवाह होत आहेत. ग्रामीण भागात तर लग्नपत्रिका न छापता व जवळचे नातेवाईक बोलावून असे विवाह घरातच उरकून घेण्यात येतात. ‘कोणाची तक्रार आमच्याकडे आल्यास आम्ही कारवाई करू शकतो’, असे संबंधित विभागातर्फे सांगितले जाते.

सोनीमोहा येथे कृषिदिंडीचे स्वागत
धारूर, १४ मे/वार्ताहर

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषी विभागाने काढलेल्या कृषी दिंडीचे तालुक्यातील सोनीमोहा येथे आज आगमन झाले. शेतकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. या वेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया कशी करावी, बियाणे खरेदीच्या वेळी घ्यावयाची काळजी, फळबाग लागवड कशी करावी, सेंद्रीय शेती, जीवामृत, अमृत पाणी, कम्पोस्ट खत, गांडूळ खत आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग घोळवे यांनी रथाचे पूजन केले.तालुका कृषी अधिकारी वसंत अजबे, मंडळ कृषी अधिकारी शरद शिनगारे, संतोष घसिंग आदींनी दिंडीचे स्वागत केले.

तीनशे गावांत पाणीटंचाई
उस्मानाबाद, १४ मे/वार्ताहर
खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा खालील असणाऱ्या ३०७ गावांत टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याचे जिल्हाधिकारी द. रा. बनसोड यांनी आज जाहीर केले.
टंचाईसंदर्भातील परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आलेल्या गावात सवलतीही लागू करण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील ५९, तुळजापूरमधील ७६, उमरगा तालुक्यातील ९६, लोहाऱ्यातील ३७, भूम ६ व वाशीमधील ३२ गावांता समावेश आहे.
उमरगा तालुक्यातील पीक परिस्थिती सर्वात भीषण आहे. याच तालुक्यात पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे.