Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पवारांनी फासे फेकले
मुंबई / नवी दिल्ली, १४ मे/प्रतिनिधी

वेगवेगळ्या ‘एक्झिट पोल’च्या निष्कर्षांनंतर काँग्रेसप्रणीत यूपीए आणि भाजपप्रणीत

 

एनडीएला २७२ चा जादुई आकडा गाठणे अशक्य वाटत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपेक्षेप्रमाणे पंतप्रधानपदासाठी फासे फेकले असून त्यादृष्टीने जोरदार जुळवाजुळव सुरू केली आहे. छोटय़ा पक्षांची मोट बांधायला सुरुवात करतानाच उद्योगपतींच्या गाठीभेटी पवारांनी सुरू केल्या आहेत.
सत्तेच्या या सारीपटात पवारांनी आपला सारा अनुभव पणाला लावण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी तिसऱ्या व चौथ्या आघाडीबरोबरच छोटय़ा पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधानपदाकरिता पवारांना नवीन पटनायक, जयललिता, ए. बी. बर्धन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच मुलायमसिंग यादव यांचा पवारांना पाठिंबा आहे. डावे पक्षही पवारांना अनुकूल आहेत. पवारांनी मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. तसेच पवारांनी सोनियांचीही भेट घेतली आहे. काँग्रेसप्रणीत यूपीएला पुरेसे संख्याबळ गाठता आले नाही तर पंतप्रधानपदासाठी काँग्रेसने पािठबा द्यावा, असाही पवारांचा प्रयत्न आहे. अर्थात काँग्रेस पक्ष विरोधात बसणे पसंत करेल पण पंतप्रधानपदासाठी पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निकालाच्या तोंडावरच मेघालयमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला सारून सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेत राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचे ठरले होते. मात्र मेघालयातील राष्ट्रवादीच्या मित्र पक्षाला काँग्रेसने फोडले. यामुळे राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा हे काँग्रेसवर संतप्त झाले आहेत. संगमा यांनी एनडीएचे समन्वयक शरद यादव यांची आज भेट घेतली. काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी असल्याने भाजपच्या मदतीने पंतप्रधानपद मिळविण्याचा पवारांचा प्रयत्न राहील. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता तशी परिस्थिती उद्भवल्यास भाजप पवारांना पािठबा देऊ शकते.
रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी यांनी काल नवी दिल्लीत पवारांची भेट घेतली. यालाही राजकीय वर्तुळात महत्त्व दिले जात आहे. देशातील मोठे उद्योगपती पवारांच्या पाठीशी राहतील अशी चिन्हे आहेत. जयललिता यांचा पवारांना पािठंबा असल्याने द्रमुक पवारांना पािठबा देणार नाही. मायावती कोणत्याही परिस्थितीत पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही. शिवसेना पवारांना अनुकूल आहे. कोणत्याच आघाडीला सत्तास्थापनेसाठी जादुई आकडा गाठता आला नाही तर आकडय़ांची जुळवाजुळव करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. आज दिवसभर पवार हे मुंबईत होते. राजकीय जुळवाजुळवीच्या दृष्टीने त्यांचे डावपेच सुरू होते.