Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

खेबुडकर,रेखा यांना शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
पुणे, १४ मे / खास प्रतिनिधी

प्रसिद्ध मराठी पटकथा लेखक व गीतकार जगदीश खेबुडकर यांना राज्य सरकारच्या

 

वतीने देण्यात येणारा यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर आघाडीचे दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना व्ही. शांताराम स्मृती विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे.
चित्रपट रसिकांच्या हृदयावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री रेखा यांना राजकपूर स्मृती जीवनगौरव पुरस्कार व प्रयोगशील अभिनेता आमिर खान यांना राज कपूर स्मृती विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. व्ही. शांताराम व राज कपूर यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जात होता. यंदापासून असे दोन पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. या पुरस्कारांचे वितरण येत्या ३० मे रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या ४६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातच पद्म पुरस्काराने सन्मानित केलेल्या अभिनेत्री हेलन, गायक उदीत नारायण, हृदयनाथ मंगेशकर तसेच गुलजार, अभिनेत्री ऐश्वर्या राय, कुमार सानू यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यमंत्री सुरेश वडपूरकर, निर्माते दिग्दर्शक रमेश सिप्पी तसेच विजया मेहता, रामदास फुटाणे, अजय सरपोतदार, प्रकाश चाफळकर, इसाक मुजावर व सांस्कृतिक कार्य सचिव जयंत गायकवाड उपस्थित होते. त्यात पुरस्कारांसाठी ही नावे निश्चित करण्यात आल्याचेही सांस्कृतिक कार्यमंत्री पाटील यांनी सांगितले.