Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सून केरळात २६ मे रोजी दाखल होणार
पुणे, १४ मे/खास प्रतिनिधी

नैऋत्य मान्सून या वर्षी त्याच्या नियोजित वेळेच्या सहा दिवस आधीच म्हणजे २६ मे

 

रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर तो येत्या दोन-तीन दिवसांतच अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यत: मान्सूनचे अंदमान समुद्रात २० मे रोजी आगमन होते. पाठोपाठ १ जून रोजी तो केरळात दाखल होतो. या वर्षी या दोन्ही ठिकाणी तो वेळेआधी येण्याची शक्यता आहे. या वर्तविलेल्या अंदाजात चार दिवसांची तफावत असू शकते. त्यामुळे मान्सून २२ ते ३० मेच्या दरम्यान केरळात दाखल होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तविण्यास २००५ सालापासून सुरुवात झाली. तेव्हापासून २००८ पर्यंत वर्तविण्यात आलेला अंदाज बरोबर आला असल्याचेही या विभागाकडून सांगण्यात आले. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्रातील आगमन व पुढील प्रवास कसा असेल याबाबत आताच निश्चितपणे काही सांगता येणार नाही. याचबरोबर मान्सूनचे अंदमान समुद्रातील आगमन व केरळातील आगमन याबाबतही निश्चित असे काही सांगता येत नाही, असे नॅशनल क्लायमेट सेंटरचे डॉ. डी. एस. पै यांनी सांगितले. या वर्षी देशात मान्सूनचा पाऊस ९६ टक्के पडेल, असा अंदाज यापूर्वीच हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. आता मान्सूनचे आगमनही वेळेआधी होण्याची शक्यता आहे.