Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

आघाडय़ांची खलबते
काँग्रेस आणि भाजपसाठी ‘होमवर्क’चा दिवस
नवी दिल्ली, १४ मे/खास प्रतिनिधी

आपापल्या मित्रपक्षांशी असलेली निवडणूकपूर्व युती शाबूत ठेवून सध्या तिसऱ्या आघाडीत असलेल्या पक्षांना भुरळ घालण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी

 

भाजपने लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली. लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेले एक्झीट पोल, पक्षांतर्गत सर्वेक्षण आणि ठोस माहितीच्या आधारे सत्तेचे गणित जमविण्यात आज काँग्रेस आणि भाजपचे नेते दिवसभर गुंतले होते. शनिवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सत्तेच्या समीकरणांचे ‘होमवर्क’ सज्ज करण्यावर प्रतिस्पर्धी आघाडय़ांनी भर दिला आणि संभाव्य मित्रपक्षांशी संपर्क साधण्याची मोहीमही हाती घेतली.
विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांंमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि युपीएला भाजप-रालोआच्या तुलनेत आघाडी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आत्मविश्वासाचे वातावरण आहे. निकालानंतर पूर्ण बहुमतानिशी सत्तेसाठी दावा करण्याच्या दृष्टीने आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या संभाव्य रणनितीवर चर्चा केली. या बैठकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, प्रणव मुखर्जी, कमलनाथ, जनार्दन द्विवेदी, राहुल गांधी आदी नेत्यांचा समावेश होता. एक्झीट पोलने वर्तविलेल्या भाकितांपेक्षा काँग्रेस सरस कामगिरी बजावेल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.
बुधवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १०, जनपथ येथे भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसपासून दुरावलेले लालूप्रसाद यादव तसेच रामविलास पासवान यांच्याशी फोनवरून संपर्क साधून निकालापूर्वी कटुता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये काँग्रेसशी युती नसली तरी लालू व पासवान अजूनही स्वतला युपीएचे घटक मानत आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनीही समाजवादी पार्टीचे सरचिटणीस अमर सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून उभय नेत्यांमध्ये उद्भवलेल्या विसंवादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आज दिल्लीत दाखल झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी रामविलास पासवान यांची भेट घेऊन चौथ्या आघाडीच्या भूमिकेविषयी चर्चा केली. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आपला पक्ष पुढचा निर्णय घेईल, असे मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे काँग्रेस-युपीएच्या तुलनेत एक्झिट पोलमध्ये किंचित ‘पिछाडलेल्या’ भाजप-रालोआलाही प्रत्यक्षात उत्तम कामगिरी नोंदविण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसपेक्षा भाजपला जास्तजिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्पर्धेत अग्रक्रमावर असेल, असा विश्वास भाजप नेतेही व्यक्त करीत आहेत. पण काँग्रेसपेक्षा दहा-पंधरा जास्त जागा मिळाल्या तरी बहुमतासाठी आवश्यक २७२ चा आकडा कसा गाठायचा हा पेच भाजपपुढे पडला आहे. त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच नव्या मित्रपक्षांना भाजप-रालोआकडे वश करण्याच्या उद्देशाने आज अडवाणी यांच्या निवासस्थानी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, डॉ. मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, अरुण जेटली, सुषमा स्वराज आदी नेते उपस्थित होते. सध्या युपीएमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी, तिसऱ्या आघाडीत असलेले तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू, अण्णाद्रमुकच्या जयललिता, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, तेलंगण राष्ट्रसमितीचे के. चंद्रशेखर राव, प्रजा राज्यमचे सर्वेसर्वा चिरंजीवी, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अशी लांबलचक ‘विशलिस्ट’ भाजपने तयार केली असून निकाल लागण्यापूर्वीच त्यांच्याशी प्राथमिक बोलणी करण्याचेप्रयत्न सुरु झाले आहेत. केंद्रात भाजप-रालोआचेच सरकार सत्तेवर येईल, असा दावा मोदी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. अडवाणीच पंतप्रधान होतील, असा विश्वास रालोआचे संयोजक शरद यादव यांनी व्यक्त केला.