Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

माध्यमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रच कायम ठेवणार
‘सीबीएसई’च्या शहाला राज्य मंडळाचा काटशह
पुणे, १४ मे/खास प्रतिनिधी

‘सीबीएसई’सारख्या केंद्रीय मंडळांच्या दबावाला धुडकावून राज्यातील माध्यमिक व

 

उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे त्रिभाषा सूत्रच कायम राखले जाईल, अशी ग्वाही देणारी शिफारस पुण्यातील शैक्षणिक विचारमंथन कार्यशाळेत आज एकमुखाने करण्यात आली. केंद्रीय मंडळांच्या शाळा प्रादेशिक अस्तिमेच्या दृष्टीने घातक ठरत असल्याने त्या शाळांमधूनही स्थानिक भाषाशिक्षण देण्यासाठी दबाव आणावा, असे या वेळी सुचविण्यात आले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही राज्यस्तरीय कार्यशाळा भरविण्यात आली होती. भाषाविषयक योजना, गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन, मूल्यांकनाच्या पद्धती, प्रशिक्षण योजना आणि ई-शिक्षण या विषयांवर र्सवकष चर्चा करून शिफारशी सादर करण्यात आल्या. बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह राज्यभरातून आलेले शिक्षक, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, शासकीय अधिकारी आदींनी या कार्यशाळेत मतप्रदर्शन केले. या प्रत्येक गटावर आधारित शिफारशी करण्यात आल्या असून, शैक्षणिक धोरणात सुधारणा घडविण्याच्या मोहिमेत त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
भाषाविषयक परिस्थितीवर आग्रही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता व राज्याची अस्मिता असे सूत्र ठेवून शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले आहे. ‘सीबीएसई’सारख्या केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मात्र दोनच भाषा शिकविल्या जात आहेत. त्यामुळेच त्या मंडळांचे विद्यार्थी प्रगतिपथावर असून, राज्य मंडळानेही द्विभाषा सूत्र स्वीकारावे, असा दबाव येत आहे. त्यातच मुंबईसारख्या ठिकाणी ‘सीबीएसई’ शाळांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवेशाचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्या शर्यतीमध्ये राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या संधी त्रिभाषा सूत्रामुळे हिरावून घेतल्या जातात, अशी टीकाही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंडळांचे अंधानुकरण न करता त्रिभाषा सूत्रच चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जादा भाषा शिकावी लागल्याने ‘आपल्या’ मुलांवर ओझे पडते नि ‘त्यांची’ मुले पुढे जातात, अशा समाजातील गैरसमजुतींचे निराकरण करण्यासाठी चळवळ उभारावी, असेही ठरविण्यात आले.
‘मराठी मुलांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी साधता याव्यात, यासाठी इंग्रजी व परदेषी भाषाशिक्षणावर भर देण्यात येत आहे. यापुढील काळातही तो कायम राखण्यात येईल,’ असे निश्चित करण्यात आले.
‘शिक्षणप्रक्रियेतील महत्त्वाचे घटक असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही अशाच प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, पालकवर्गालाही त्यावेळी आमंत्रित करण्यात येईल,’ असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजयशीला सरदेसाई यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे यापुढील काळात ज्ञान रचनावादाला गाभास्थानी ठेवून शैक्षणिक बदल केले जातील. कमकुवत गटांमधील वा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारणेच्या या प्रक्रियेत कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा डॉ. सरदेसाई यांनी दिली.