Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

चहा आणखी महागणार
मुंबई, १४ मे/ व्यापार प्रतिनिधी

केनिया व श्रीलंकेतील चहाचे उत्पादन घटल्याने तसेच भारतातील उत्तर व दक्षिण भागातील चहा मळ्यांतील चहा खुडण्याचा वेग मंदावल्याने चहाच्या किंमती वाढण्याची

 

शक्यता निर्माण झाली आहे. देशातील चहा खुडण्याचा वेग मंदावल्याने चहाच्या हिरव्या पानांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर चहा उत्पादनाच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लिलाव केंद्रातील चहाच्या किंमतीत सरासरी ८० ते ९० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ महाराष्ट्र टी ट्रेडर्स असोसिएशन’ आणि ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी टेडर्स असोसिएशन’ या चहा व्यापाऱ्यांच्या संघटनांचे अध्यक्ष हेमेंद्र शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२००८-०९ मध्ये देशातील चहाचे उत्पादन ८०० दशलक्ष किलोग्रॅम झाले. अगोदरच्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ३५० दशलक्ष किलोग्रॅमने घसरले आहे. तसेच देशातून होणारी चहाची निर्यात १६० दशलक्ष किलोग्रॅमवरून १९५ दशलक्ष किलोग्रॅमवर गेली आहे. याचा परिणाम म्हणून चहाच्या किंमती वाढणार आहेत, असा इशारा हेमेंद्र शाह यांनी दिला. महाराष्ट्रात चहावर चार टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जातो. महाराष्ट्र वगळता अन्य कोणत्याही राज्यात चहावर जकात नाही. राज्यात मात्र तीन टक्के जकात चहावर लावली जाते. देशाच्या तुलनेत आजही मुंबई-महाराष्ट्रात चहा महागच मिळतो. तरी हे कर रद्द करावेत अशी चहा व्यापाऱ्यांची मागणी आहे.