Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

भाजप - डाव्यामध्ये सत्तासंघर्ष पेटणार!
नवी दिल्ली, १४ मे/खास प्रतिनिधी

शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालांनंतर पंधराव्या लोकसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला सरकार स्थापन करण्याची संधी असली तरी प्रत्यक्षात डावी आघाडी आणि

 

भाजप यांच्यातच सत्तासंघर्ष पेटला आहे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची लालकृष्ण अडवाणी यांना शेवटची संधी असताना केंद्रात कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार येऊ नये म्हणून डाव्या आघाडीने १६ मे नंतरची ठोस रणनिती आखून ठेवली आहे. दोन कट्टर वैचारिक प्रतिस्पध्र्यांमध्ये उद्भवणारा हा टोकाचा संघर्ष काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहे. शनिवारच्या निकालात भाजपने सर्वाधिक जागाजिंकल्यास हातातोंडाशी आलेले पंतप्रधानपद अडवाणी सहजासहजी जाऊ देणार नाहीत आणि २७२ चा आकडा कुठल्याही परिस्थितीत जमविण्यासाठी अडवाणी व त्यांचे सहकारी कोणतीही कसर सोडणार नाही. प्रकाश करात यांच्या तिसऱ्या आघाडीतील पक्षांना खेचून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. त्याचवेळी जातीयवादी भाजपला सत्ता मिळू द्यायची नाही म्हणून डावी आघाडीही कोणत्याही राजकीय तडजोडींसाठी तयार असेल. त्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकारलाही अलिखित समर्थन देण्याचा शेवटचा पर्याय डाव्या आघाडीपाशी तयार आहे. दुसरीकडे काँग्रेस व डाव्या आघाडीचे मनसुबे उधळण्यासाठी सत्तेवरील स्वतची दावेदारी सोडून भाजपही मायावतींना पंतप्रधान बनविण्याचे अखेरचे अस्त्र उपसू शकते. यापैकी कोणत्या शक्यता प्रत्यक्षात उतरतील याचे उत्तर शनिवारच्या निकालातच दडलेले आहे.