Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘मंत्र’मुग्ध सामन्यात राजस्थानची मुंबईवर मात
दरबान, १४ मे / वृत्तसंस्था

किंग्समिड स्टेडियमवर प्रचंड तणावाचे वातावरण..राजस्थान रॉयल्सची शिल्पा शेट्टी आणि मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी मंत्र पुटपुटत संघांच्या विजयाची अपेक्षा करताना..

 

अखेरच्या षटकात ४ धावांची गरज आणि विजयाचे दान कुणाच्या पदरात पडणार याची प्रत्येकालाच उत्सुकता.. अखेरचे षटक टाकण्यासाठी शेन वॉर्नने मुनाफ पटेलकडे चेंडू दिला. खेळपट्टीवर धवल कुलकर्णी आणि हरभजनसिंग. मुनाफने धवलला पहिल्या चेंडूवर धाव काढू दिली नाही. नंतरच्या यॉर्करवर धवल पायचीत झाला. तिसऱ्या चेंडूवर चैतन्य नंदा धाव घेण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरला आणि धावचीत झाला. क्रिकेटचाहत्यांचे हृदयाचे ठोके वाढले. त्या मंत्रांचे पठण सुरूच..मुंबईला विजयासाठी ३ चेंडूंत ४ धावांची गरज होती. हरभजनने एकेरी धाव काढली. पण मलिंगाला एकेरी धाव पळता न आल्याने अखेरच्या षटकातील पाचव्या चेंम्डूवर मुंबईचा डाव १४३ धावसंख्येवर आटोपला. एकीकडे विजयासाठी मंत्रांचे पुटपुटणे आणि दुसरीकडे मंत्रमुग्ध स्टेडियम असे रोमांचकारी वातावरण पाहायला मिळाले. अभिषेक नायरच्या १८ चेंडूतील ३५ धावांच्या झुंजार खेळीमुळे हातातोंडाशी आलेला विजय मुंबई इंडियन्सच्या हातून निसटला. अखेरच्या षटकात अवघ्या ६ धावा काढण्याचे आव्हान मुंबईला पार करता आले नाही. राजस्थान रॉयलने मुंबईचा २ धावांनी पराभव केला.अभिषेक नायरने मुंबईचा अशक्य वाटणारा विजय शक्य केला होता. १८ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार मारून अभिषेक नायरने विजयाचे लक्ष्य सोपे केले होते. अखेरच्या षटकात अवघ्या चार धावांची मुंबईला गरज होती. त्याआधी, सचिनने ३० चेंडूंत ४० धावा फटकावून खराब सुरुवातीनंतर डाव सावरला होता. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक शेन वॉर्नला मिळाले. त्याने २४ धावांत ३ बळी घेतले. दुखापतीमुळे १० दिवसांची विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्या शेन वॉर्नने परिस्थिती ओळखून खेळण्याचे ठरविले आणि सामना खेचून आणला.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १४५ धावा केल्या. सलामीवीर क्विनीने ५१ धावांची खेळी केली तर जडेजाने ४७ धावा केल्या.