Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

कोणाची सरशी? मताधिक्य किती? उत्सुकता शिगेला!
नगर, १४ मे/प्रतिनिधी-
विजयी कोण होणार, मताधिक्य किती असेल, दोन नंबरला कोण आणि तीन नंबरला कोण, कोणत्या तालुक्यात कोणाला आघाडी कोणाला पिछाडी..? अशा साऱ्याच प्रश्नांची उत्तरे आता काही तासांच्या अंतरावर आहेत. सर्वाचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघे २४ तास राहिले. उद्या (शनिवारी) दुपापर्यंत साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अनिश्चितताही दूर होईल. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात या वेळी कमालीची चुरस होती. शिवाय दोन्हीकडे जेमतेम मतदान झाले आहे. त्यामुळेच अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर राजकीय वर्तुळातील प्रमुखांचीही हीच अवस्था आहे.

निवडणूक निकालानंतर ‘स्थायी’साठी सभा अपरिहार्य
नगर, १४ मे/प्रतिनिधी

स्थायी समितीसह महापालिकेच्या सर्व समित्यांच्या, तसेच सभागृह नेत्यासह सर्व पदांच्या निवड व नियुक्तया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच होण्याची शक्यता आहे. ‘निर्णय तुम्हीच घ्यायचा’ अशा आशयाचे निवडणूक आयोगाचे ‘मार्गदर्शन’ करणारे पत्रच प्रशासनाने महापौर संग्राम जगताप यांना दिल्याने त्यांच्यासमोर आता यासाठी सर्वसाधारण सभा बोलावण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. मनपाची निवडणूक होऊन ५ महिने झाले, तरी महापौर व उपमहापौर या दोन पदांशिवाय इतर कोणतेही घटनात्मक पद किंवा समिती अस्तित्वात आलेली नाही.

फी वाढ
शिक्षण हे समाजविकासाचे एक अंग आहे. शिक्षणाच्या माध्यमातून शोषणमुक्त समाज निर्माण करता येईल. शिक्षणातूनच मानवी मूल्ये समाजमनावर बिंबवता येतील. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही सामाजिक मूल्ये शिक्षणातूनच समजू शकतील. आर्थिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी प्रथम समाजाला शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणातून एकात्म समाज निर्माण होईल. त्यामुळे सर्व प्रकारची विषमत: हळूहळू नष्ट होईल.

सूत्रधाराच्या तपासासाठी पोलिसांची मोहीम तीव्र
बनावट इंधनप्रकरण

पाथर्डी, १४ मे/वार्ताहर

रासायनिक पदार्थाचा वापर करून बनावट रितीने पेट्रोल व डिझेल तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बीड जिल्ह्य़ातील असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाचा मुख्य केंद्रबिंदू बीड जिल्हा केला आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी तांबेवाडी शिवारात छापा टाकून बनावट पेट्रोल, डिझेल तयार करणारा अड्डा उद्ध्वस्त केला. हा उद्योग तेथे मोठय़ा प्रमाणात चालल्याने पोलीसही अवाक झाले. अशा प्रकारे मोठा उद्योग करणे एकटय़ा व्यक्तीच्या आवाक्याबाहेर असल्याची जाणीव झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी पकडलेल्या आरोपीकडून माहिती घेतली.

वीजजोड नसताना संगणक, पाणीजोड नसताना वॉटर हिटरची खरेदी!
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

नगर, १४ मे/प्रतिनिधी

शस्त्रक्रिया विभाग कार्यरत नसताना त्यासाठी वातानुकूलित यंत्र, वीजजोड नसताना संगणक, पाणीजोड नसताना सोलर वॉटर हिटर असे अनेक अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या निधीतून केलेल्या साहित्य खरेदीत घडल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे दीड कोटी रुपयांच्या या वादग्रस्त खरेदीविषयी आरोग्य विभागाने व्यवस्थित कागदपत्रे रंगविण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यातील गंभीर गैरप्रकार समोर येत आहेत. सदस्य आक्षेप घेऊ लागल्याने अनेक ठिकाणच्या रुग्ण कल्याण समिती सभेत खर्चासंदर्भात कार्योत्तर मान्यतेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सहा महिन्यांच्या चिमुकलीसह महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या
श्रीगोंदे, १४ मे/वार्ताहर

स्वतच्या सहा महिन्याच्या मुलीसह एका महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी तालुक्यातील भानगाव परिसरात घडली. या खळबळजनक घटनेचे कारण मात्र समजू न शकल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेबाबत भानगाव येथील राजेंद्र भाऊसाहेब कसरे यांनी पोलिसांत खबर दिली. राणी दत्तात्रेय कसरे (वय ३५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सहा महिन्यांच्या चिमुकलीसह तिने आज सकाळी जीवनयात्रा संपविली. भानगावजवळील कसरेवस्तीवर राहत्या घरी ही घटना घडली. घरातून प्रथम धूर व नंतर ज्वाला दिसल्याने शेजारील लोकांनी घराकडे धाव घेतली. दरवाजा आतमधून बंद असल्याने फार वेळ गेला. शेवटी ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आतमध्ये माय-लेकींच्या शरीराचा अक्षरश कोळसा झाला होता. ही घटना घडली त्या वेळी मृत राणीचा पती गावात होता. राणीला एक सवत असून तिही गावात राहते. या घटनेचे कारण समजले नसले, तरी संशयाची सुई सवत-पती यांच्या दिशेने जाते. अधिक तपास सहायक फौजदार वसंतराव जाधव करीत आहेत.

अमृतलिंग तलावाचे काम दहा वर्षांपासून रखडले
खर्डा, १४ मे/ वार्ताहर

येथून ३ किलोमीटर अंतरावरील अमृतलिंग तलावाचे काम गेल्या १० वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. तलावात जमिनी गेलेल्या काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. अमृतलिंग प्रकल्पाच्या कामास सन १९९९मध्ये मंजुरी मिळाली. जवळपास २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या या तलावासाठी १ कोटी ५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. ७ जून २००० रोजी कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने २००१-०२मध्ये तिजोरी रिकामी असल्याचे कारण देत संबंधित विभागाला काम थांबविण्याचे लेखी आदेश दिले. पुन्हा २००३-०४मध्ये काम सुरू करण्यात आले. मात्र, ठेकेदारामुळे काम रेंगाळले. तब्बल १० वर्षांनंतरही तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. संथ कामाचा फटका शेतकऱ्यांना मात्र सहन करावा लागत आहे. काम लवकर पूर्ण होईल की नाही याचीही हमी दिली जात नाही. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यावर, ठेकेदारावर सरकारने आजपर्यंत कोणती कारवाई केली हेही गुलदस्त्यात आहे. दीड वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. तलावाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित केल्या. काही शेतकऱ्यांना पं. स. सदस्य विजयसिंह गोलेकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जवळजवळ ३४ लाख रुपयांपर्यंत मोबदला मिळाला. परंतु अजूनही काही शेतकरी वंचित राहिल्यामुळे त्यांची परवड होत आहे.

‘संजीवनी’तर्फे १ जूनपासून सैन्य दल प्रशिक्षण वर्ग
कोपरगाव, १४ मे/वार्ताहर

येथील संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटर फॉर सिव्हील अॅण्ड डिफेन्स सव्र्हिसेसमार्फत १ जूनपासून प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार असून, ३ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये सैन्य दल किंवा इतर सरकारी, निमसरकारी सेवांमध्ये निवड होण्याकरिता सराव करून घेतला जाणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी दिली. १९९२ साली स्थापन केलेल्या या संस्थेमधून प्रशिक्षण घेतले. ११६१ प्रशिक्षणार्थी भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये कार्यरत आहेत. केवळ नाममात्र शुल्क घेऊन या संस्थेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात (९८२२३४४४९३ किंवा ९४०३१२६५६२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्यायाधीश महाडिक, न्हावकर यांची रिक्त जागांवर नियुक्ती
नगर, १४ मे/प्रतिनिधी

जिल्हा न्यायालयातील रिक्त जागांचा कार्यभार येथील दोन न्यायाधीशांकडे उच्च न्यायालयाने सुपूर्द केला आहे. नगरच्या न्यायालयात सत्र न्यायाधीशांची संख्या कमी असतानाच काहींची बदली झाली. त्यामुळे दोन सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी गेल्या पंधरवडय़ात शहर वकील संघाने केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ती पूर्ण केली नाही. रिक्त झालेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश (न्यायालय क्रमांक २) आर. आर. कदम यांच्या जागेवर जिल्हा न्यायाधीश ए. के. महाडिक यांची, तर न्यायाधीश (न्यायाधीश क्रमांक १) एम. जी. सेवलीकर यांच्या जागी न्यायाधीश नागेश न्हावकर यांची उच्च न्यायालयाने नियुक्ती केली. त्यामुळे न्हावकर व महाडिक यांच्या जागा पुन्हा रिक्त झाल्या आहेत.
सध्या न्यायालयात विविध प्रकारचे ३५६ खटले सुरू आहेत. न्यायाधीशांच्या जागा रिक्त असल्याने खटले तुंबू लागले आहेत. सात वर्षांपूर्वी महिला न्यायालय स्थापन झाले. परंतु महिला न्यायाधीशांची नंतर नियुक्ती न झाल्याने त्या न्यायालयाचे काम बंद पडून तेथील खटले इतर न्यायालयात वर्ग झाले.

एसटी बसमधून व्यापाऱ्याचे ३ लाख ३३ हजार लांबवले
नगर, १४ मे/प्रतिनिधी

ढाब्यासमोर उभ्या असलेल्या एसटी बसमधून मिरची व्यापाऱ्याचे ३ लाख ३३ हजार रुपये चोरटय़ाने लांबविले. हा प्रकार काल रात्री आठच्या सुमारास नगर-जामखेड रस्त्यावर टाकळीकाझी शिवारात साईराम ढाब्यासमोर घडला. नगर तालुका ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौला अली हसन अहमद नरीवेभूला (वय ३०, रा. पिन्न्ोली, जि. गुंटूर, आंध्र प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. मौला अली हसन हे आंध्र प्रदेशातून नगरला मिरची पाठवतात. येथील व्यापाऱ्याकडून नंतर ते पैसे गोळा करतात. काल त्यांनी नेहमीप्रमाणे व्यापाऱ्याकडून ३ लाख ३३ हजार रुपये गोळा केले. ते एका सुटकेसमध्ये ठेवले. नंतर ते हैदराबादला जाण्यासाठी तारकपूर बसस्थानकात शिर्डी-हैदराबाद (केपी-२८ झेड ४३७१) या एसटीमध्ये बसले. ही बस नंतर टाकळीकाझी शिवारात असलेल्या साईराम ढाब्यावर जेवणासाठी थांबली. प्रवासी खाली उतरले असता कोणी तरी बसमधून अली हसन यांची सुटकेस लांबविली. तपास हवालदार महंमद शेख करत आहेत.

मृत झालेल्या सिग्नल्सचे पत्रकार चौकात आज श्राद्ध
नगर, १४ मे/प्रतिनिधी

पतितपावन संघटनेच्या वतीने उद्या (शुक्रवारी) सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार चौकात सिग्नलला पिंडदान व श्राद्धविधी करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे शहर उपाध्यक्ष सचिन धोत्रे यांनी दिली. शहरातील मुख्य रस्त्यावरील सिग्नल अनेक महिन्यांपासून बंद आहेत. जनतेच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या वाहतूक प्रश्नाची सोडवणूक व्हावी, यासाठी प्रशासन व शहर वाहतूक शाखेला वारंवार निवेदने दिली. मात्र, काही उपयोग झाला नाही. शहरातले सिग्नल मृत झाले आहे. या सिग्नल्सला मुक्ती मिळावी, यासाठी त्यांचे पिंडदान व श्राद्धविधी करण्यात येणार आहे. जनतेने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

केडगावात वळवाच्या सरी
नगर, १४ मे/प्रतिनिधी

पाणीटंचाईने वैतागलेल्या केडगावकरांना दिलासा देण्यासाठी वळवाच्या सरींनी आज संध्याकाळी हजेरी लावली. मावळतीच्या उन्हात सुरू असलेल्या या पावसामुळे सुरेख इंद्रधनुष्य तयार झाले होते. नगर शहरात मात्र पाऊस झाला नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमारे १० मिनिटे वळवाच्या सरी आल्या. आकाशात पांढऱ्या ढगांमध्ये असलेला एकुलता एक कृष्णामेघ बरसत होता. सुरुवातीला थेंब इतके टपोरे होते की गारांसारखा त्यांचा मार लागत होता. उन्ह असताना पावसात भिजून तलखी घालवण्याचा आनंद मुलांनी घेतला. केडगावमध्ये पाऊस पडत असताना नगर शहर मात्र कोरडे होते. औद्योगिक वसाहतीपर्यंतचे रस्ते भिजलेले दिसत होते.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
नगर, १४ मे/प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चिमाजी आप्पा खामकर (रा. पडोळे चाळ, टिळक रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुटुंब व आरोपी खामकर शेजारी शेजारी राहतात. खामकर याला दोन बायका आहेत, तसेच त्याच्या एका मुलीचे लग्नही झालेले आहे. बुधवारी रात्री त्याने या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले.

रांगोळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर, १४ मे/प्रतिनिधी

शैला गुंदेचा व पूनम कटारिया यांच्या वतीने नवीपेठेतील इचरजबाई फिरोदिया प्रशालेत आयोजित रांगोळी, ग्रीटिंग, वारली पेंटींग प्रदर्शनाला उत्स्फर्त प्रतिसाद मिळाला. दि. २१पर्यंत तेथे प्रशिक्षण शिबिरही होणार आहे. रांगोळीकार संजय बहारघरे (नागपूर), वारली पेंटींगचे कलाकार माधव डेहाणकर (अमरावती), शुभेच्छापत्रांचे निर्माते राजेश वैद्य (धुळे) यांच्या कलाकृतींनी दर्शकांची मने जिंकून घेतली. बहारघरे यांनी सादर केलेल्या ३५ गुणिले २० फूट ताजमहालची रांगोळी, छायाचित्रांसारख्या भासणाऱ्या व्यक्तींच्या रांगोळी, डेहाणकर यांची पारंपरिक वाटली चित्रे, वैद्य यांची स्टेन्सिल रांगोळी आदी कलाकृतींना दर्शकांची विशेष पसंती लाभली.