Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

उद्या निक्काल!
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

विदर्भातील मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण
मतदान केंद्रावर आमदार, खासदारांना प्रवेश बंदी!
सकाळी ११ पासून मतदानाचा ‘कल ’कळणार
विदर्भातील लोकसभेच्या १० जागांसाठी १६ एप्रिलला झालेल्या मतदानानंतर तब्बल एक महिन्याने १६ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सर्वच मतदारसंघात एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होणार असून प्रशासनाने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. विदर्भातील सुमारे २० हजार कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होतील. सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवार वगळता आमदार आणि खासदारांनाही केंद्रांवर प्रवेश नाकारण्यात आला आहे.

मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी मोतीचूर लाडू आणि ‘मिक्स व्हेज’
पन्हं आणि ताकही देणार

नागपूर, १४ मे/ प्रतिनिधी

नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीची शनिवारी सकाळी सात वाजतापासून सुरू होणाऱ्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सकाळपासून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करताना सर्वच बाबींचा विचार करण्यात आला आहे. ‘मिक्सव्हेज’, पोळ्या, भात आणि मोतीचूरचे लाडू असा जेवणाचा मेन्यू असून सध्या उन्हं अधिक असल्याने कर्मचाऱ्यांना पन्हं आणि ताकही देण्यात येणार आहे. १६ एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील मतमोजणी शनिवारी कळमना बाजार येथे होणार आहे.

निवडणूक निकाल चर्चेत
‘चेहरा’ अस्पष्टच!

नितीन तोटेवार , नागपूर, १४ मे

मतमोजणीला फक्त दोन दिवस शिल्लक असताना एकीकडे उमेदवार व त्यांच्या खंद्या समर्थकांची घालमेल होऊन हृदयाचे ठोके वाढत आहे तर, दुसरीकडे मतदारांची उत्सुकता ताणली जात आहे. विदर्भातील कोणत्याच मतदारसंघाबाबत राजकीय पंडित, ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासकांना ठाम मत व्यक्त करता येत नसल्याने निवडून येणारा चेहरा नवीन राहतो की, जुनाच कायम राहील, याबाबत चित्र अस्पष्ट आहे. यामुळे सध्या चेहरा हरवलेलीच चर्चा सर्वत्र ऐकू येते.

आमदार फडणवीस, पडोळेंना मतमोजणी परिसरात मज्जाव
रामटेक : गुन्हेगारी पाश्र्वभूमीवरून ६५ अर्ज फेटाळले

नागपूर, १४ मे/प्रतिनिधी

सुरक्षेच्या कारणावरून निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश न देण्याचे आदेश आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज केलेल्या आमदार देवेंद्र फडणवीस आणि दीनानाथ पडोळे यांना १६ मे रोजी कळमना परिसरात मतमोजणीच्यावेळी उपस्थित राहता येणार नाही. तसेच रामटेक मतदार संघात उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून अर्ज केलेल्या ६५ प्रतिनिधींचे अर्ज गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आले आहेत.

वीज महावितरणच्या इतिहासातील सर्वाधिक दरवाढीचा प्रस्ताव
संदीप देशपांडे, नागपूर, १४ मे

वीज महावितरण कंपनीने २००९-२०१० वर्षांसाठी मागितलेली ३६ टक्के दरवाढ म्हणजे कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक दरवाढ असून त्यामुळे भारनियमन व वाढत्या वीजबिलांमुळे त्रस्त असलेले वीज ग्राहक हादरून गेले आहेत. वीजपुरवठय़ाबाबत तब्बल नऊ हजार ५७८ कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्याचे मुख्य कारण देत ‘महावितरण’कडून मोठय़ा प्रमाणावर वीजदरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. महावितरणचा खर्च दिवसेंदिवस वाढत असला तरी यापूर्वी वीज मंडळाच्या कार्यकाळात आणि वीज कंपन्या अस्तित्वात आल्यानंतरही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केव्हाही वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला नव्हता. महावितरणने बुधवारी जारी केलेल्या माहिती पत्रकातूनही ही बाब स्पष्ट झाली आहे.

आणखी एकाचा गॅस्ट्रोने मृत्यू
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

शहरात तीनशेहून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली असून यातील ५० पेक्षा अधिक रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने गॅस्ट्रो झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एका रुग्णाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला आहे. सध्या सगळीकडेच पाण्याचा हाहाकार माजला असून टंचाईग्रस्त नागरिकांना गढूळ पाण्याचाही वापर करावा लागत आहे. यामुळे गॅस्ट्रोची लागण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उन्हाळी जलतरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, १४ मे/ प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सिटिझन स्पोर्टिग क्लबच्या वतीने १० एप्रिलला सुरू झालेल्या दोन महिन्याच्या उन्हाळी जलतरण शिबिरातील एक महिन्याच्या पहिल्या बॅचला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ८ ते १४ वयोगटातील मुलामुलींनी सहभाग घेतला होता. या शिबिरात नवशिके व स्पर्धात्मक सरावासाठी इच्छुक असे दोन गट पाडले असून शिबिरात मुलांना जलतरणाविषयी आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने व विविध प्रकारचे कौशल्य शिकवण्यात येत आहे. प्रथमच अशा प्रकारचे शिबीर नागपूर सुधार प्रन्यासच्या सहकार्याने घेण्यात आले. शिबिराची दुसरी बॅच १० मेपासून सुरू झाली आहे. तरी इच्छुकांनी शिबिराच्या स्थळी प्रशिक्षकांना भेटून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी अनिल पांडे किंवा खुशाल बाळबुधे यांना प्रत्यक्ष शिबिराच्या स्थळी किंवा ९२३७५२३६६, ९८८१७२६७७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मृत प्राणी उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करा -मामा धोटे
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

मृत प्राणी उचलणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून त्यांना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अन्य साहित्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व नगरसेवक मामा धोटे यांनी केली आहे. सध्या ‘स्वाईन फ्ल्यू’ आजाराचा धसका जगानेच घेतला आहे. प्राण्यांपासून हा आजार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सर्व खबरदारी घेण्याची गरज असताना महापालिका मात्र कुठलीही खबरदारी घेत नसल्याचा आरोप मामा धोटे यांनी केला आहे. शहरातील अनेक भागात मेलेली कुत्री, डुकरे व अन्य प्राणी उचलण्याचे काम अनेक कर्मचारी करतात. यामुळे या कर्मचाऱ्यांना हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मास्क, पंजे, बुट देण्यात आले पाहिजेत. तसेच असे प्राणी उचलण्यापूर्वी ते र्निजतुक करण्यासाठी औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी या कर्मचाऱ्यांना अशा औषधांचा पुरवठा करण्यात यावा. औषधांची फवारणी केल्यास त्या जागेवरील विषाणू नष्ट होतील आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना व नागरिकांना आजार होणार नाही, अशी अपेक्षाही धोटे यांनी व्यक्त केली आहे. हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खोकला, ताप येणे, डोके दुखणे, छाती दुखणे यासारखे आजार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

कारच्या धडकेने सायकलस्वार जखमी
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

कारच्या धडकेने सायकलस्वार मुलगा गंभीर जखमी झाला. गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास सेंट्रल अॅव्हेन्यूवरील गांधी पुतळा चौकात हा अपघात घडला.
इंडिका कारने (तात्पुरता क्रमांक एमएच३१/०३६०) होंडा सिटी कारला (एमएच३१/सीडब्ल्यू/३३०५) समोरून धडक दिली. त्यानंतर एका सायकललाही धडक दिली. या अपघातात सायकलस्वार मुलगा अक्षय अनिलकुमार मोदी (रा़ मस्कासाथ पुलाजवळ) जखमी झाला. त्याला रहाटे रुग्मालयात दाखल करण्यात आले. आरोपी कारचालकाने नवीनच कार घेतली होती. अपघातानंतर पळून गेलेल्या कारचालकाविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला़

दोन मुलांना विष पाजून मारणाऱ्या मातेला जन्मठेप
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

पोटच्या मुलांना विषारी द्रव्य पाजून ठार मारणाऱ्या एका निर्दयी मातेला सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. वाडीमधील शस्त्रनिर्मिती कारखाना वसाहतीत १८ फेब्रुवारी २००८ रोजी सकाळी ही घटना घडली होती. गीता ऊर्फ मीना भगवान वाडेकर हे आरोपी महिलेचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मयूर भगवान वाडेकर (वय १६ वर्षे) व रितेश भगवान वाडेकर (१४ वर्षे) या दोघांचे घरी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या दोघांना चहातून एन्डोसल्फान हे विषारी द्रव्य दिल्याने त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून मुलांची आई गीताला अटक केली. अनैतिक संबंधास मुलांची अडचण होत असल्याने व तिला तिच्या मनाप्रमाणे वागता येत नसल्याने तिने हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली होती. वाडी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी़ ए़ शेख यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. बचाव व सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. आरोपी गीता उर्फ मीना भगवान वाडेकर हिला जन्मठेप व १० हजार रुपये दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ज्योती वजानी तर आरोपीतर्फे अॅड. धुर्वे यांनी बाजू मांडली.

चोरीच्या दोन ऑटोरिक्षा जप्त
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजताच्या सुमारास एका ऑटो रिक्षाचालकाला पकडून त्याच्याजवळून चोरीच्या दोन ऑटोरिक्षा जप्त केल्या. गणेशपेठ पोलीस गस्त घालत असताना एक ऑटो एम्प्रेस मिलकडून महापालिका नाक्याकडे वेगात जाताना दिसला. त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. ऑटोचालकाने त्याचे नाव मोहम्मद शाहीद मोहम्मद जाहीद (रा. गौसिया कॉलनी, मोठा ताजबाग) सांगितले. ऑटो रिक्षाची (एमएच३१/सीपी/१८३१) कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. ऑटोरिक्षाची पाहणी केली असता इंजीन व चेसीस क्रमांकावर खोडतोड दिसली़ त्यावर दुसरे आकडे पंच केलेले होते. पोलिसी हिसका बसताच त्याने ऑटो रिक्षा चोरल्याचे सांगितले. एमएच३१/ए/४०९५ क्रमांकाचा ऑटो रिक्षा जप्त करण्यात आला. त्यावरील रेडियम नंबर प्लेट उचकवून पाहिली असता त्याखाली एमएच३१/सीएम/ ९३८५ क्रमांक दिसला.