Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

नवनीत

निरक्षर होणे सर्वसामान्यांकरिता एक शाप असला तरी प्रेषितांकरिता ते एक वरदान आहे. धर्मग्रंथातून असे संकेत आढळतात, की जगाच्या पाठीवर पाठविण्यात आलेले अनेक प्रेषित निरक्षर होते. परंतु त्यांना भरपूर ज्ञान प्रदान करण्यात आले होते. ते धरतीवर कुणाकडे शिकले नाही, परंतु त्यांच्या ज्ञानाची प्रत्येक जबाबदारी अल्लाहने आपल्या हाती घेतली होती. प्रेषित मुहम्म (स.) यांना तर ‘अन्नबियुल उम्मी’ म्हणजे ज्यांना ‘लिहिता- वाचता येत नसे असे प्रेषित’ म्हणून संबोधिण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना अशा समाजात पाठविण्यात आले होते, जेथे निरक्षरतेचे साम्राज्य होते. सुशिक्षित माणसे अगदी बोटांवर मोजण्याइतकी होती.

 

तत्कालीन युगात अरबांना ‘जोहलाए अरब’ म्हणजे ‘अडाणी आणि जहाल व्यक्तिमत्व असणारी माणसे’ म्हणून संबोधले जायचे. प्रेषितांचे निरक्षर असणेच वास्तविकरीत्या त्यांच्या प्रेषित होण्याची साक्ष आहे. कारण प्रेषित जगात ज्ञान शिकण्याकरिता येत नसून, ते लोकांना ज्ञान शिकविण्याकरिता येत असतात. जगात त्यांचा कुणीही स्वामी किंवा गुरू नसतो. ते सरळ मार्गे अल्लाहकडून ज्ञान घेत असत आणि लोकांना शिकवत असतात. प्रेषित येशू ख्रिस्त अल्पवयीन असताना त्यांच्या मातोश्रींनी त्यांना शिक्षकाच्या समोर नेऊन बसविले. गुरुजींनी किशोराला सांगितले, ‘वाचा अलिफ़!’ येशू ख्रिस्त म्हणाले, ‘अलिफ़ (अ.) म्हणजे काय?’ शिक्षक म्हणाला, ‘याला काही अर्थ नाही, हे निरर्थी अक्षर आहे!’ येशू म्हणाले, ‘तू येथे निर्थक ज्ञान शिकविण्यास बसला आहेस का? ज्या वस्तू ज्ञानाच्या स्रोत आहेत, तेच ज्ञानाशी निगडित राहिले नाही तर ज्ञान कुठून येईल? याच अक्षरांपासून तर ज्ञानाचा उगम होतो.’ शिक्षक आश्चर्यचकित झाला, की हा मुलगा कुठून आला, त्याने तर मलाच शिकवायला सुरुवात केली. नंतर किशोर येशूने ईश्वराच्या अस्तित्वावर बोलण्यास सुरुवात केली. सगळे थक्क राहिले, की या मुलाच्या पोटातून कसले ज्ञान बाहेर पडत आहे.
अनीस चिश्ती

विश्वाचा अंत कसा होणार आहे?
विश्वाच्या भवितव्याबद्दल वेगवेगळय़ा शक्यता व्यक्त केल्या गेल्या आहेत. या शक्यता प्रामुख्याने विश्वाच्या घनतेवर आधारित आहेत. विश्वाची घनता ही एका विशिष्ट घनतेपेक्षा कमी असेल तर पुरेशा गुरुत्वाकर्षणाच्या अभावी असे विश्व निरंतर प्रसरण पावत राहील. विश्वाची घनता जर या विशिष्ट घनतेइतकी असली तरीसुद्धा विश्व हे भविष्यात एका ठराविक गतीने प्रसरण पावत राहू शकेल. या दोन्ही प्रकारांत विश्व हे कालांतराने शीत स्थितीत जाईल. पण विश्वातील पदार्थाची घनता या विशिष्ट घनतेपेक्षा जास्त असेल तर आता प्रसरण पावत असलेले विश्व काही काळानंतर आंतरिक गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावून, अंत:काळी ते पुन्हा बिंदूवत स्थितीत गेलेले असेल.
वर उल्लेखलेली विशिष्ट घनता ही प्रत्येक घनमीटरमध्ये हायड्रोजनचे सुमारे ५ अणू एवढी आहे. आजच्या अंदाजानुसार विश्वाची प्रत्यक्ष घनता ही प्रत्येक घनमीटरमध्ये हायड्रोजनचे सुमारे ०.२ अणूएवढीच आहे. म्हणजे आजमितीला विश्व हे अंतिमत: प्रसरण पावत राहील असे म्हणता येईल. मात्र दृश्य पदार्थाबरोबरच विश्वात अद्याप निरीक्षण न करता आलेले कृष्ण पदार्थ आणि कृष्ण ऊर्जा मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात असावी. कृष्ण पदार्थामुळे विश्वाची घनता ही जर विशिष्ट घनतेपेक्षा जास्त भरली तर विश्वाचा अंत हा आकुंचनाद्वारे घडून येईल. विश्वाच्या या आकुंचनानंतर परत महास्फोट घडून येण्याची शक्यताही काही शास्त्रज्ञांकडून वर्तविली गेली आहे. (या शक्यतेनुसार विश्वाचे प्रसरण आणि आकुंचनाचे हे चक्र सतत चालू राहात असले पाहिजे.) विश्वात जर कृष्ण ऊर्जेचेही प्रमाण मोठे असले तर या ऊर्जेमुळे विश्वाच्या आकुंचनात अडथळा निर्माण होऊन ते सतत प्रसरण पावत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर मराठय़ांचे राज्य नष्ट करण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला. संभाजीच्या क्रूर वधानंतर राजारामने औरंगजेबाला शह देण्यासाठी वतनदारी पद्धत पुन्हा सुरू केली. पराक्रम गाजविणारी नवी पिढी उदयाला आली. त्यात खंडेराव दाभाडे हे एक होते. राजारामाने त्यांना ७०० गावांची देशमुखी दिल्याने वतनदारांचा मुकुटमणी असे त्यांना म्हटले जाते. पुढे सेनाधुरंधर हे पद देऊन त्यास गुजरातला मुलुखगिरी बजावण्यासाठी पाठविले. पुढे शाहूमहाराजांनी त्यांना सेनापतिपद दिले होते. या सुमारास दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूंचे प्रस्थ वाढले होते. तेव्हा दिल्लीच्या बादशहाने सय्यदांच्या बंदोबस्ताची जबाबदारी शाहूवर टाकली. शाहूने सेनापती खंडेरावास सय्यद बंधूंपैकी हुसेन अलीचा बंदोबस्त करण्यास पाठविले असता त्याने अहमदनगरच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवून सय्यदांचा पराभव केला. गुजरात, काठेवाड परिसरात मराठी हुकमत बसविण्याची जबाबदारी शाहूने खंडेरावांवर सोपवली. ती त्याने चोखपणे पार पाडली. कर्नाटकच्या स्वारीतही त्याने मोठा पराक्रम गाजवला. वसई ते सुरतपर्यंतच्या मुलखात मराठी अंमल त्यांनी निर्माण केला. मराठेशाही संकटात असताना पराक्रम गाजविणाऱ्या खंडेराव दाभाडे यांचे १५ मे १७२९ रोजी निधन झाले. इतिहासप्रसिद्ध उमाबाई ही स्वाभिमानी स्त्री त्याची पत्नी होती. पुढे दाभाडय़ांचे अस्तित्व मराठेशाहीत नाममात्र होते. उमाबाई मात्र आपला डामडौल अखेपर्यंत सांभाळून होती
संजय शा. वझरेकर

सिद्धी बारावीत गेली होती. अभ्यासाबरोबरच ती खूप पुस्तकं वाचायची. पाहिलेल्या चित्रपटांवर, नाटकांवर, वाचलेल्या पुस्तकांवर बाबांशी चर्चा करायची. आई-बाबांची एकुलती एक सिद्धी फक्त त्यांचीच नाही तर शेजाऱ्या-पाजाऱ्यांची, नातेवाइकांचीही लाडकी होती. आजीला तिच्या हुशारीचे फार कौतुक वाटे. जेव्हा तेव्हा तिच्यावरून मीठमोहऱ्या ओवाळून म्हणायची, नक्षत्रासारखी नात माझी कुणाची दृष्ट न लागो. सिद्धी आई-बाबांबरोबर रविवारच्या संध्याकाळी बाहेर गेली होती. बाहेर भटकायचे, थोडी खरेदी करायची, घरी येताना बाहेरच जेवून यायचे, असा बेत आईने ठरवून टाकला आणि सिद्धीने व बाबांनी त्याला दुजोरा दिला. आई-बाबांबरोबर बाहेर जायला तिला खूप आवडायचे. बाबा गमती सांगून मायलेकींना हसवायचे. कधी बागेत हिंडणे तर कधी मॉलमध्ये चक्कर मारणे, कधी पुस्तकांच्या दुकानात जाणे, तर कधी तुळशीबागेत छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची खरेदी करणे असा मजेत वेळ जायचा. तुळशीबागेत आईला फळे कापायची सुरी घ्यायची म्हणून तिघे एका गाडीपाशी आले. सुऱ्या, कात्र्या, छोटे डबे, ताटल्या, गाळणी, गाडीवर दाटीवाटीनं पहुडली होती. आईने काही सुऱ्या खालून वरून न्याहाळल्या. हातात घेऊन त्यांना धार आहे का ते पाहिलं. निळय़ाशार मुठीची आणि तलवारीसारख्या किंचित अर्धगोल धारदार पात्याची सुरी निवडली. ‘किती रुपयांना दिली रे ही सुरी?’ आईने विचारले. ‘फक्त तीस रुपये. पिवर स्टेनरेश टील आहे बाई.’ गाडीवाल्याने त्याच्या खरखरीत आवाजात उत्तर दिले. सिद्धी आणि बाबा हा संवाद ऐकत शेजारीच उभे होते. सुरी पुन्हा हातात उलटसुलट करत आई म्हणाली, ‘काहीतरीच काय सांगतोस? वीस रुपयाला मिळतात या सुऱ्या. वीसला दे. अहो, वीस रुपये द्या जरा.’ ती बाबांना म्हणाली. तेही वीस रुपये काढून देऊ लागले. सिद्धीला गप्प बसवेना. ती आई-बाबांना म्हणाली, ‘आपण एअरकंडिशन मॉलमध्ये जाऊन तिथल्या वस्तू ते म्हणतील त्या किमतीला जर घेतो, तर तुम्हा त्या बिचाऱ्याशी पैशाबाबत घासाघीस का करताय? उलट त्याने सांगितलेल्या किमतीपेक्षा जास्त दिले तरी हरकत नाही. तो दिवसभर उन्हात उभा आहे. घसा दुखेपर्यंत माल खपविण्यासाठी ओरडतो. त्याची विक्री झाली तर घरी जेवण शिजतं.’ आई गप्प झाली. बाबाही विचारात पडले. सिद्धीच्या म्हणण्यात तथ्य होते. दोघांनाही ते पटले. आपल्या विचारी आणि सहृदय लेकीचा त्यांना अभिमान वाटला. अर्थात सुरीचे तीस रुपये हातगाडीवर कात्री-सुऱ्या विकणाऱ्याला मिळाले हे सांगायला नकोच. बऱ्याचदा पालकांच्या स्वत:च्या सवयी आणि विचार ठाम असतात. आपण करतो, सांगतो आणि विचार करतो तोच बरोबर, असे त्यांना वाटते. खरेतर आपल्या मुलांकडूनही शिकता येण्याजोग्या बऱ्याच गोष्टी असतात. हे आई-वडील विसरतात. तुमचा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा वेगळा असतो. तुमची मतं आणि विचार असतात. आई-बाबांबरोबर कल्पनांची देवाणघेवाण नक्कीच करायला हवी.
आजचा संकल्प- माझ्या पालकांना जे ठाऊक नाही ते मी त्यांना सांगेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com