Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

नवी मुंबईतील पावसाळ्यापूर्वीची कामे रखडणार!
नवी मुंबई/प्रतिनिधी :
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा यांनी शहरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेली पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी ३० मेपर्यंतची अंतिम मुदत दिल्यानंतरही या कामांचा सद्यस्थितीतील वेग पाहता, ही कामे नवी मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरतील, अशी भीती आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महानगर गॅस निगममार्फत गॅसवाहिनी टाकण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्त करण्यात अजूनही महापालिकेस यश आले नसल्याने, पावसाळ्यात नवी मुंबईकर गॅसवर असण्याची शक्यता अधिक आहे.

पनवेलमधील रिक्षा मीटरनुसार धावणार!
अनिरुद्ध भातखंडे

पनवेलमधील रिक्षाचालकांचा एका ‘बलाढय़’ संघटनेने रिक्षांना मीटर लावण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे दोन महिन्यांची मुदत मागितल्याने पनवेल, नवीन पनवेल आणि परिसरातील रिक्षा अखेर मीटरनुसार धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, लोकसभा निवडणूक निकालानंतर लगेचच या प्रकरणी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पनवेलपासून जवळ असणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, खोपोली आदी ठिकाणी रिक्षाभाडय़ाची मीटरनुसार आकारणी होत असताना पनवेलमधील रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे मात्र प्रवाशांना अवाजवी भाडे द्यावे लागत आहे. गेल्यावर्षी आणि त्यापूर्वीही काही वेळा पनवेलमधील रिक्षा मीटरनुसार धावण्यास सुरुवात झाली होती, परंतु हा बदल अल्पजीवी ठरला होता. रिक्षाचालक संघटना, सर्वपक्षीय राजकीय नेते आणि आरटीओचे अधिकारी या अन्यायाबाबत उदासीन असल्याने सर्वसामान्य, तसेच असंघटित प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या या मनमानी वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या त्यांच्या संघटना, राजकीय नेते आणि आरटीओ यांच्याविरुद्ध प्रवाशांमध्ये कमालीचा असंतोष आहे.

नियमबाह्य पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
पनवेल/प्रतिनिधी -
पनवेलमधील प्रमुख रस्त्यांवर सम-विषम तारखांनुसार गाडय़ा लावणे आरटीओने सक्तीचे केले असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. विशेष म्हणजे चुकीच्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या चारचाकी गाडय़ांवर आरटीओची कृपादृष्टी असल्याचे दिसत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि दुतर्फा वाहतूक लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आरटीओने प्रमुख रस्त्यांवर सम-विषम तारखांनुसार गाडय़ा लावणे बंधनकारक केले आहे, मात्र अनेक चारचाकी गाडय़ा विरुद्ध दिशेला तासन्तास उभ्या केल्या जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाडय़ा उभ्या असल्याचे चित्र दिसते. यामुळे वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होऊन वारंवार वाहतूक कोंडी होते. चुकीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी गाडय़ा त्वरित उचलून नेणारे आरटीओचे पथक या चारचाकी गाडय़ांवर कधीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशिष्ट क्रमांकांच्या गाडय़ांना हे अधिकारी नेहमीच अभय देतात, असा आरोपही काही नागरिकांनी केला.

रवी भोईर यांच्या अपात्रतेस १७ जूनपर्यंत स्थगिती
मतदानापासून वंचित
उरण/वार्ताहर -
उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य रवी भोईर यांच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेस उच्च न्यायालयाने १७ जूनपर्यंत स्थगिती आदेश दिला आहे, मात्र या दरम्यान त्यांना सदस्य म्हणून नगर परिषदेच्या कामकाजात भाग घेण्यास न्यायालयाने मुभा दिली असली, तरी नगर परिषदेच्या कोणत्याही बैठकीत मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. कामात अनियमितता व जादा दराच्या निविदा स्वीकारून भोईर यांनी नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे सदस्य चिंतामण घरत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरील सुनावणीनंतर भोईर यांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदस्य म्हणून अपात्र घोषित करतानाच सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही मनाईचा आदेश दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात भोईर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भोईर यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने १७ जूनपर्यंत नगरसेवकपद कायम ठेवले आहे, मात्र या दरम्यान भोईर यांना नगर परिषदेच्या कोणत्याही सभांमध्ये मतदान करण्यास मनाई केली आहे.