Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

नाशिकला दिलासा; तर खान्देश तप्त
प्रतिनिधी / नाशिक

वाऱ्याचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रातील तापमान कमी होण्यास काहिशी मदत झाली असली तरी जळगाव व धुळे जिल्ह्य़ाचा पारा मात्र काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होवूनही अद्याप ४० अंशांच्या खाली उतरू शकलेला नाही. त्या तुलनेत नाशिकचे तापमान ३५ अंशापर्यंत खाली आले आहे. एप्रिलच्या अखेरच्या सप्ताहात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सलग १० ते १२ दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकला होता.

राज्यातील नवी हवामान केंद्रे उभारण्याच्या कामाला खीळ
अनिकेत साठे / नाशिक

राज्यात ११८ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) हाती घेतलेले काम अनेक महिन्यांपासून रखडले असून सध्या या कामाच्या प्रगतीविषयी कोणतीही माहिती दिली जात नसल्याने राज्य शासनाच्या एका विभागाने थेट आपला दूत इस्रोच्या मुख्यालयात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या हवामान केंद्रांची श्रृंखला निर्माण होण्यास बराच विलंब झाल्याने पूर व्यवस्थापन, हवामानावर आधारीत पीक-पाणी व दुष्काळी परिसराचे आकलन करण्याचे प्रमुख उद्देश अडचणीत सापडले आहेत.

सामान्य प्रवाशांची स्थितप्रज्ञता सुधारणांच्या मुळावर
प्रतिनिधी / नाशिक

रेल्वे संदर्भातल्या मोठय़ा वा खर्चिक मागण्या तर सोडाच अत्यंत फुटकळ स्वरुपाच्या समस्या सुटणे देखील नाशिककरांच्या दृष्टीने नेहमीच दुरापास्त ठरत आले आहे. पंचवटी वा गोदावरी एक्स्प्रेससारख्या हक्काच्या व नाशिककरांना आपल्याशा वाटणाऱ्या रेल्वेगाडय़ांबाबतच्या प्रश्नांनाही अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात, हे दिसत असतानाही त्याविषयी स्थानिक मंडळी नेहमी मूग गिळून गप्प असतात, असाच आजवरचा अनुभव आहे. अलीकडे काही जण याबाबत जागरुकता दाखवत असले तरी त्यांना इतर घटकांची म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

वृक्षतोडीच्या मुद्दय़ावरून मनसेचे महापालिकेवर शरसंधान
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेने गेल्या वीस वर्षांत लागवड केलेली आठ लाख झाडे नेमकीकुठे आहेत, वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञांचा सहभाग का केला गेला नाही अशा विविध मुद्यांवरून मनसेच्या पर्यावरण विभागाने पुन्हा एकदा महापालिकेवर शरसंधान केले आहे. पंचवटीतील हिरावाडी परिसरातील ८७ झाडे तोडण्यास दोन हजार वृक्षप्रेमी नागरिकांनी हरकत घेतली असून महापालिकेने झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास मनसेचा पर्यावरण विभाग या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा पर्यावरण विभागाच्या प्रमुख संघटक तथा महिला आघाडीच्या सरचिटणीस उत्तरा खेर यांनी दिला.

‘देवराई’ या विषयावर चितमपल्ली यांचे व्याख्यान
प्रतिनिधी / नाशिक

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल, या संकल्पनेचा आधार घेत शहर हिरवे व प्रदूषणमुक्त करण्याबरोबर सूर्याची तीव्रता शोषून घेणाऱ्या वृक्षांची लागवड व्हावी आणि पावसाच्या अगोदर वृक्ष लागवडीचे नियोजन करता यावे, असा संदेश देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब पंचवटी, नेचर क्लब ऑफ नाशिक, सायन्स फिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे ‘देवराईचे महत्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षता अभियानतर्फे संजय आखाडे यांचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत आपल्या जिद्दीने व मेहनतीने संजय आखाडे याने आय. ए. एस. परीक्षा उत्तीर्ण होवून मिळविलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे, हे यश आजच्या तरूण मित्रांना आदर्श घेण्यासाठी आहे, असे प्रतिपादन ‘दक्षता अभियानचे’ अध्यक्ष तथा माजी महापौर प्रकाश मते यांनी केले.

कामगार हक्क मंदीविषयी कायदा शिबिरात मार्गदर्शन
नाशिक / प्रतिनिधी

हक्क, कर्तव्य, जबाबदारीची जाणीव तसेच जागतिक मंदीचे परिणाम अशा विविध विषयांवर येथील निमा हाऊसमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा), आयमा व निपम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिरात मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

करदात्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास कटिबध्द
नाशिक / प्रतिनिधी

प्राप्तीकर विभागाने प्रत्येक बुधवारी दुपारी तीन ते पाच ही वेळ करदात्यांना भेटण्यासाठी जाहीर केली असली तरी कोणत्याही करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कधीही त्यांची भेट घेण्यास तयार आहोत, असे आश्वासन नाशिकचे नवीन मुख्य प्राप्तीकर आयुक्त व्ही. के. श्रीधर यांनी दिले. प्रत्येक पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक भेट घेऊन विविध क्षेत्रातील करसंबंधी प्रश्नांवर चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालकांविरूध्द कारवाई
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरूध्द वाहतूक पोलिसांतर्फे पुन्हा एकदा मोहीम सुरू करण्यात आली असून दंड वसूल करण्यात येत आहे. कारवाईत सातत्य न ठेवणाऱ्या पोलिसांनी बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेविषयी ओरड सुरू झाल्यावर पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. बेशिस्त रिक्षाचालक, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी एकाच दिवसात गणवेश परिधान न करणे, प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसविणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५९ रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करण्यात येऊन १५ हजार ९०० रूपये तडजोड दंड वसूल करण्यात आला. मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल, त्र्यंबकरोड, गंगापूररोड येथे ही मोहीम राबविण्यात आली. रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करावा, फ्रंटशिट प्रवासी बसवू नये, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवू नये, वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्र जवळ बाळगावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त संदीपान कांबळे यांनी केले आहे.

घरगुती सिलिंडरचा वेळेत पुरवठा करण्याचे आदेश
नाशिक / प्रतिनिधी

घरगुती गॅस सिलिंडर नंबर लावूनही महिनाभर मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी वितरकांना सिलिंडरचा वेळेत पुरवठा करण्याचे आदेश दिले.
काही महिन्यांपासून शहरात सिलींडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. विशेष म्हणजे महिनाभर आधी नंबर लावूनही सिलींडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता होती. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी वितरकांची बैठक घेऊन सिलिंडर वेळेत न देण्यात येत असल्याच्या तक्रारीविषयी चर्चा केली. वेळेत सिलिंडर देण्याविषयी त्यांनी आदेश दिले. काही दिवसांपूर्वी लागोपाठच्या सुटय़ामुळे सिलिंडर पुरवठय़ात अडचणी आल्या. आता पुरवठय़ात सुधारणा होऊन ग्राहकांना वेळेत सिलिंडर देण्यात येईल, असे आश्वासन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी सांगितले.