Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नवी मुंबईतील पावसाळ्यापूर्वीची कामे रखडणार!
नवी मुंबई/प्रतिनिधी :
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा यांनी शहरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेली पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी ३० मेपर्यंतची

 

अंतिम मुदत दिल्यानंतरही या कामांचा सद्यस्थितीतील वेग पाहता, ही कामे नवी मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरतील, अशी भीती आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महानगर गॅस निगममार्फत गॅसवाहिनी टाकण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्त करण्यात अजूनही महापालिकेस यश आले नसल्याने, पावसाळ्यात नवी मुंबईकर गॅसवर असण्याची शक्यता अधिक आहे. आयुक्त विजय नाहटा यांनी दोनच दिवसांपूर्वी आपत्कालीन नियोजन समितीची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आयुक्तांनी अगदी रीतसर आढावा घेतला. नालेसफाईची कामे ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याने यावर्षी शहरात पाणी तुंबणार नाही, असा दावाही नाहटा यांनी करून टाकला. १५ मेनंतर शहरातील सर्व प्रकारची खोदकामे बंद करण्याचे आदेशही नाहटा यांनी यावेळी दिले. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांना ३० मे ही अंतिम मुदत असल्याने आता कामाला लागा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. आयुक्तांच्या या आदेशामुळे महापालिकेची यंत्रणा जोमाने कामाला लागेल, अशी अपेक्षा एकीकडे व्यक्त होत असताना, दुसरीकडे मात्र अनेक उपनगरांमध्ये ही कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी मुंबई परिसरात अनेक उपनगरांमध्ये रस्त्याची कामे आजही अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. महानगर गॅस निगमने शहरात वाहिनी टाकण्यासाठी खोदलेले रस्ते अजूनही बुजविण्यात आलेले नाहीत, तसेच काही ठिकाणी गटारे, कल्व्हर्ट यासारखी कामे सुरू असून त्याचा वेगही मंद असाच आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत ही कामे पूर्ण होतील किंवा नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.