Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पनवेलमधील रिक्षा मीटरनुसार धावणार!
अनिरुद्ध भातखंडे

पनवेलमधील रिक्षाचालकांचा एका ‘बलाढय़’ संघटनेने रिक्षांना मीटर लावण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे दोन महिन्यांची मुदत मागितल्याने पनवेल, नवीन पनवेल आणि परिसरातील रिक्षा अखेर मीटरनुसार धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीओच्या

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, लोकसभा निवडणूक निकालानंतर लगेचच या प्रकरणी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पनवेलपासून जवळ असणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, खोपोली आदी ठिकाणी रिक्षाभाडय़ाची मीटरनुसार आकारणी होत असताना पनवेलमधील रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे मात्र प्रवाशांना अवाजवी भाडे द्यावे लागत आहे. गेल्यावर्षी आणि त्यापूर्वीही काही वेळा पनवेलमधील रिक्षा मीटरनुसार धावण्यास सुरुवात झाली होती, परंतु हा बदल अल्पजीवी ठरला होता. रिक्षाचालक संघटना, सर्वपक्षीय राजकीय नेते आणि आरटीओचे अधिकारी या अन्यायाबाबत उदासीन असल्याने सर्वसामान्य, तसेच असंघटित प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या या मनमानी वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या त्यांच्या संघटना, राजकीय नेते आणि आरटीओ यांच्याविरुद्ध प्रवाशांमध्ये कमालीचा असंतोष आहे.
हा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या पाश्र्वभूमीवर रिक्षाचालकांच्या या बलाढय़ संघटनेने आरटीओला पत्र पाठविले असून, त्यात रिक्षांना मीटर लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. रिक्षाचालकांच्या समस्यांकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी या पत्राला लेखी उत्तर दिले असून, मोटरवाहन कायद्यानुसार रिक्षांना मीटर लावणे आणि ते प्रमाणित करणे हे बंधनकारक आहे, असे स्पष्ट म्हटले असल्याने पनवेल आणि नवीन पनवेलमधील रिक्षा लवकरच मीटरनुसार धावणार, याचे संकेत मिळाले आहेत.
प्रवाशांकडून वाटेल तेवढे भाडे आकारताना रिक्षाचालक त्यांच्या समस्यांचा पाढा वाचतात, परंतु त्यांच्या समस्या संघटनेच्या माध्यमातून शासनाशी भांडून सोडविणे शक्य आणि योग्य असताना प्रवाशांना नाहक वेठीस धरणे साफ चुकीचे व अन्यायकारक आहे, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. इंधनाचे दर वाढल्यानंतर एका रात्रीत परस्पर भाडेवाढ करणारीही मंडळी आठ ते दहा रुपयांनी इंधन स्वस्त झाल्यानंतर अनेक महिने उलटले तरी पूर्वीप्रमाणे भाडे का आकारतात, असा प्रश्नही अनेक प्रवाशांनी उपस्थित केला. प्रवासी हे ग्राहक असूनही त्यांना अनेक वर्षे नडणाऱ्या रिक्षाचालकांनी रिक्षांना मीटर लावण्यासाठी आरटीओकडे मुदत मागितल्याने त्यांच्या आणि संघटनेच्या नेत्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसत आहे. मीटरनुसार भाडे आकारले जात नसल्याने आरटीओचीही नाचक्की होत असून, ही समस्या सोडविणे त्यांच्या अधिकाऱ्यांसाठीही अपरिहार्य आहे.