Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

सगळीकडे धुरळा जय-पराजयाच्या चर्चेचा
प्रतिनिधी / नाशिक

अनेक कारणांमुळे कधी नव्हे एवढय़ा गुंतागुंतीच्या बनलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे २४ तास उरल्याने सध्या सगळीकडे केवळ कोण विजयी होणार, ही एक आणि एकच चर्चा सुरू आहे. वेगवेगळी समीकरणे, स्थानिक संदर्भ, शह-काटशहाचे राजकारण, मतदानाची घटलेली टक्केवारी अशा अनेक ‘अंडर करंटस्’मुळे उत्तर महाराष्ट्रातल्या सहाही लोकसभा मतदारसंघांमधील लढतींत कमालीची चुरस निर्माण झाली असून मतदान यंत्रांतून नेमका काय निकाल बाहेर येतो, त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रत्येकजण आपापल्या परिने आडाखे बांधत असला तरी निकालाचे भाकीत ठामपणे करताना मात्र कुणी दिसून येत नाही, अशी परिस्थिती आहे.

धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठबळ नसल्याने धुळ्यात गुन्हेगारीचा कळस
संतोष मासोळे / धुळे

शहर आणि जिल्ह्य़ात फोफावलेले निरनिराळे अवैध व्यवसाय, त्यातून जन्माला येवू लागलेली गुन्हेगारी वृत्ती आणि एका पाठोपाठ एक अशा सलग घडणाऱ्या विध्वंसक घटना आता जिल्हवासियांची चांगलीच डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील धाडसी अधिकाऱ्यांनी उचललेल्या खंबीर पावलांतून गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे शक्य असले तरी अशा रिस्क घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता त्यांना वाऱ्यावर सोडण्याची वृत्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृतीतून दिसून येते. यामुळे गुन्हेगारी मोडून काढण्याचा विडा उचलण्याची तयारी कुणीही ठेवत नाही. अशा अनेक कारणांमुळे धुळे जिल्हा वर्षभराच्या काळात चांगलाच गाजू लागला आहे.

वाढत्या तापमानाचा केळी बागांवर परिणाम
वार्ताहर / जळगाव

वाढत्या तापमानामुळे जिल्ह्य़ातील केळी बागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असून त्यातच भारनियमनाची भर पडल्याने केळी बागा सुकू लागल्या आहेत. बागांच्या बचावासाठी शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केले आहे.

जळगाव व रावेर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी ९०० कर्मचारी
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने संपूर्ण सज्जता केली आहे. मतमोजणीचे काम एकाच वेळी १६८ टेबलांवर चालणार असून त्यासाठी ९०० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

नियोजनबध्द विक्रीस शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचाही विरोध
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ात कापूस उत्पादनाचे मोठे क्षेत्र व अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा बीटी वाणाकडे वाढलेला कल पाहता व येथे सुमारे १२ लाख बियाणांच्या पाकिटांची गरज असताना बियाणे कंपन्यांनी जिल्ह्य़ासाठी केवळ दोन लाख ७० हजार पाकिटे देण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घातले असले तरी त्यांच्या नियोजनबद्ध विक्रीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

राज्यस्तरीय बाबुराव बागूल साहित्यविचार संमेलन
प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागूल यांच्या प्रथम स्मृती वर्षांनिमित्त त्यांच्या साहित्यावर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी धुळे येथे १३ जून रोजी राज्यस्तरीय बाबुराव बागूल साहित्यविचार संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख निमंत्रक अ‍ॅड.नाना अहिरे यांनी दिली.

नंदुरबारच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी झारखंडचा अभ्यास दौरा
नंदुरबार जिल्ह्य़ात 'युनिसेफ ',मुंबईमार्फत काही शैक्षणिक उपक्रम गुणवत्ता विकासासाठी राबविले जातात. त्यांच्यातर्फे इतर राज्यातील सामाजिक व भौगोलिक संदर्भासह शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आंतरराज्य अभ्यास दौरे आखण्यात येतात. या मोहिमेअंतर्गत नुकताच झारखंडचा अभ्यास दौरा झाला. 'युनिसेफ 'चे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र बेगूर व सल्लागार वसंत सिन्हा यांनी या दौऱ्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. पी. डी. चित्ते यांची निवड केली होती. या दौऱ्यातील अनुभवाविषयी चित्ते यांनी दिलेली माहिती.

दररोज पाणीपुरवठय़ासाठी धुळ्यात युद्धपातळीवर प्रयत्न
वार्ताहर / धुळे

जिल्ह्य़ातील काही भाग पिण्याच्या पाण्यासाठी होरपळून निघाला असताना धुळेकरांसाठी मात्र पावसाळ्यापर्यंत रोज पाणी देण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू झाले आहेत. पाणी पुरवठय़ासाठी साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून यातून पंप दुरूस्ती, नव्या जलवाहिन्या टाकण्यासह अन्य कामे केली जाणार आहेत. यानतंर लगेचच रोज पाणी पुरविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

रेल्वे कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
मनमाड / वार्ताहर

रेल्वे प्रशासन कामगार विरोधी धोरण अवलंबत असल्याच्या कारणास्तव तसेच कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ वर्कशॉप शाखेतर्फे जनजागरण अभियान व साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

सेतू कार्यालयातील गलथानपणाविरुद्ध आंदोलन
येवला / वार्ताहर

तहसील कार्यालयाच्या परिसरातील सेतू कार्यालयातील विस्कळीत कारभाराचा निषेध करीत पंचायत समिती सभापती संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अनिल पवार यांनी तातडीची बैठक घेऊन सेतू कार्यालयाचा कारभार सुधारण्याचे आश्वासन सभापतींना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सेतू कार्यालयात एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या पाश्र्वभूमीवर सभापती पवार, दक्षता समितीचे अध्यक्ष रवी काळे, उपसभापती मच्छिंद्र मोरे, नगरसेवक मनोहर जावळे, शिवाजी भड, अविनाश गाडे आदींसह कार्यकर्त्यांनी दुपारी चारच्या सुमारास सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला व तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रारही केली. दरम्यान, तहसीलदारांनी सेतू कार्यालयाचे कर्मचारी, सभापती पवार यांच्यासह कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन सोमवापर्यंत कारभारात सुधारणा करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.