Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

तोल-समतोल
गेल्या पंधरवडय़ात समतोल फौंडेशनच्या मनपरिवर्तन शिबीराच्या समारोपाला जाण्याचा योग आला.. हा समारोपाचा कार्यक्रम होता डोंबिवलीतील कानविंदे व्यायाम मंदिराच्या सभागृहात, पण समतोलचं शिबीर प्रत्यक्षात झालं होतं ते कल्याणपासून १५-१६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मामणोली गावातील हिंदू सेवा संघाच्या जागेत.. शिबीर होतं ते घरातून पळून आलेल्या किंवा आणल्या गेलेल्या मुलांचं.. ही सारी मुलं सीएसटी, दादर, कल्याण वा ठाणे या अवाढव्य रेल्वे स्टेशनांवर राहणारी.. तिथल्या बिनचेहऱ्याच्या गर्दीत बिनबोभाट सामावून गेलेली..
वय र्वष ८ ते १२ मधली ही मुलं.. कोण कुठल्या गावचा, कोण कोणत्या धर्माचा, कोण काय शिकलेला, कोण कशासाठी घरदार वा आईबापांना सोडून आलेला हे सारं गूढच.. मुंबईच्या उपनगरी रेल्वेनं प्रवास करणारे आपण सारे.. ही मुलं कधी भीक मागण्याच्या निमित्तानं, कधी काही खायला हवं असण्याच्या निमित्तानं, कधी गाणं गाऊन रेल्वे

 

प्रवासात आपलं मनोरंजन करण्याच्या निमित्तानं आपल्याला सामोरी आलेली..
पण आपला पांढरपेशा स्वभाव, आपली मध्यमवर्गीय सुखावस्था, मला काय त्याचंह्ण सारखी आपली साऱ्या समाजालाच फाटय़ावर मारणारी मनोवृत्ती यामुळे ना कधी आपण या मुलांकडे लक्ष दिलं, ना कधी त्यांची दु:खं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.. विजय जाधव नावाच्या तुमच्यामाझ्यासारख्याच एका कनिष्ठ मध्यमवर्गीय तरुणानं मात्र तो प्रयत्न केला.. त्याला हे करावंसं वाटलं, कारण त्याचे डोळे उघडे होते, कान सावध होते आणि मुख्य म्हणजे त्याचं अंत:करण अजून शहरी झालेलं नव्हतं..
रेल्वे स्टेशनवर येणारी ही मुलं कुठून येतात, कशी राहतात, पोट जाळण्यासाठी ती कायकाय करतात, स्टेशनवरचं मुक्त जगणं त्यांना कसं आवडायला लागतं, आईवडिलांबरोबर हिंडणारी, फिरणारी आपल्याच वयाची मुलं पाहिल्यानंतर त्यांच्या मनात कायकाय येतं, मनात उमलून येणाऱ्या त्या भावना दडपून टाकण्यासाठी ती काय करतात, व्यसनांची ओळख त्यांना त्यातूनच होते की आणखी कशातून, अपरिहार्यतेतून येणारी व्यसनांची सोबत मग व्यसनांपुरतीच मर्यादित राहते की ती समलिंगी संबंधांमध्येही परिवर्तित होते.. अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ त्याच्या मनात उठे..
उद्या अशाच एखाद्या कोंडाळ्यात आपल्याच ओळखीतला कुणी मुलगा आपल्याला दिसला तर, या विचारानंही तो अस्वस्थ होऊन उठे.. या मुलांशी बोललं पाहिजे, त्यांची दु:खं समजून घेतली पाहिजेत, त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढला पाहिजे असं त्याला सारखं वाटत रहायचं.. विजयनं मग काही मित्रांशी बोलणं केलं.. समतोलह्ण त्यातून सुरू झाली.. समतोलह्णची सुरूवात झाली या मुलांची पाहणी करण्यातून.. आईबापांपासून दुरावलेली मुलं हिंदी चित्रपटात पाहिलेली होती, पण त्याला निमित्त झालेलं असायचं एखाद्या अपघाताचं, गर्दीत हरवण्याचं, सावत्र आईच्या छळाचं..
पण इथे तसं नव्हतं.. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर येऊन कोसळणाऱ्या, या व अशा शेकडो-हजारो मुलांच्या कहाण्या विजयनं ऐकल्या होत्या.. कुणी बेवडय़ा बापाच्या मारहाणीला कंटाळून घर सोडलं होतं, कुणी आई-वडिलांमधील भांडणाचे ओरखडे मनावर घेऊन घर सोडलं होतं, कुणी चोरीचा आळ आल्यानं घर सोडलं होतं तर कुणाला अमिताभ-शाहरुख-आमीर बनण्याचं स्वप्न पडून घर सोडण्याचा मोह झाला होता..
दुर्दैव असं की मुंबईत आल्यावर या मुलांना ना अमिताभ भेटला होता, ना शाहरुख होण्याचा मार्ग सापडला होता, ना आमीर बनण्याच्या दिशेनं त्यांचं पहिलं पाऊलही पडलं होतं.. इथं त्यांच्या नशिबी आलं होतं बूटपॉलिश करणं, संडासमुताऱ्या धुणं, डबे साफ करणं, अपघातातली प्रेतं उचलणं, छोटय़ामोठय़ा चोऱ्या करणं आणि दोन वेळच्या खाण्यापिण्याची सोय झाली की मोकळ्या वेळेत पत्ते कुटणं, जुगार खेळणं असं काहीबाही.. या निरागस मुलांचा प्रवास एकापरीनं संपत होता, तो अशा न संपू शकणाऱ्या दुष्टचक्रात..
समतोलह्णनं हे सारं पाहिल्यानंतर, निरखल्यानंतर स्थायी रुपात काही काम उभं करावं असं मनाशी योजलं.. शेल्टर चालविणाऱ्या एओनजीओज समतोलह्णनं पाहिल्या होत्या.. पोलीस, सरकारी यंत्रणा, चाइल्ड हेल्पलाइनकडून ठोस काही होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं..
मुलांना नुसता निवारा नकोय, त्यांना प्रेमाचे चार शब्द हवे आहेत हे समतोलह्णच्या स्त्री-पुरूष कार्यकर्त्यांनी मुलांशी केलेल्या मैत्रीनंतर त्यांच्या ध्यानी आलं होतं..
ती दोस्ती मग सुरू झाली.. त्या दोस्तीला ठोस स्वरुप यावं म्हणून मग मुलांबरोबर राहणं सुरू झालं.. मुलांचा मोठा ग्रुप जमला की त्याला शिबीराचं रुप देणं सुरू झालं.. शिबीरात येणाऱ्या मुलांचं नकळत समुपदेशन सुरू झालं.. गप्पांमधून, संवादांमधून मुलांमधला आत्मविश्वास जागा होत राहिला.. व्यसनं सुटत राहिली.. घर, भावंडं, आईवडिल, नातेवाईक, शाळा हे सारं आठवणीत येत राहील अशी रचनाच होत राहिली.. मामणोलीचं शिबीरं आणि डोंबिवलीत झालेला त्याचा समारोप हा त्याचाच एक भाग होता..
समतोलह्ण आता संस्था म्हणून उभी राहते आहे.. विजयच्या जोडीनं पाचसहा कार्यकर्त्यांची टीम समतोलह्णचा तोल सांभाळते आहे.. मुलांची शिबीरं, त्यांचं स्टेशन सुटल्यानंतरचं, शिबीराव्यतिरिक्तचं कायमचं राहणं, त्यासाठी शेल्टरसारखी रचना, एकेका मुलाचे पालक शोधून काढण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचेही मन वळविण्यासाठी, मुलाला प्रत्यक्षात घरी पोचविण्यासाठी होणारा खर्चही वर्षांकाठी आठदहा लाखांच्या घरात जाऊ लागला आहे..
आतापर्यंत २०-२०, २५-२५ मुलांची निदान आठ तरी शिबीरं झाली आहेत.. एकेका शिबीरातून किमान १५-२० मुलं तरी घरी पोचवली गेली आहेत.. हा वेग कमी आहे याची जाधवना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाणीव आहे.. दररोज १० ते १२ मुलं जर मुंबईत असा प्रकारे येत असतील, तर वर्षांला चारेक हजारांच्या घरात येणाऱ्या मुलांना शोधून काढून त्यांना-त्यांना त्यांच्या-त्यांच्या पालकांपर्यंत पोचविण्यासाठी समतोलह्णचे काम किती पटींनी वाढवावे लागेल याचे गणित त्यांच्या मनात तयार आहे.. गरज आहे ती त्यांना साथ देऊ शकणाऱ्या तुमच्यामाझ्यासारख्या जागरुक नागरिकांची.. समतोलह्णशी संपर्क : विजय जाधव ९८९२९६११२४
००
समतोलह्णच्या पंधरवडय़ापूर्वीच्या कार्यक्रमाची आठवण आज झाली ती दुसऱ्याच कारणाने.. ते कारण म्हणजे डोंबिवलीचा जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट.. या ट्रस्टच्या वतीनं एक अनाथालय चालवण्यात येतं.. अनाथ अर्भकांचं संगोपन ही संस्था करते.. ही मुलं त्यांच्याकडे येतात ती कुणीतरी सोडून दिल्यानंतर, आईबापाविना एकाकी पडल्यानंतर, पोलीसांकडे कुणीतरी पोचविल्यानंतर.. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे अशीच दोन मुलं आली ती डोंबिवली पोलीसांकडून.. त्यांचा रीतसर सांभाळ सुरू झाला, मुलं इतकी लहान की त्यांना घरादाराविषयी काहीच सांगता येत नव्हतं..
खरं तर डोंबिवलीच्या जवळच असणाऱ्या उल्हासनगरातील संतोष ठाकूर, सुनीता ठाकूर यांची ही दोन्ही मुलं.. घराबाहेर खेळताखेळता ती बेपत्ता झाली, ठाकूर पतीपत्नीनं भरपूर शोध घेतला, पोलीसात तक्रार दाखल केली.. पोलीसांनी त्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापायला दिले.. ते फोटो संस्थेच्याच पदाधिकारी डॉ. कीर्तिदा प्रधान यांच्या पाहण्यात आले, आणि त्यांनी पुढाकार घेऊन पोलीसांना त्यांची माहिती दिली.. भिवंडीच्या ज्युवेनाईल कोर्टात मुलांना आणलं गेलं, ठाकूर पतीपत्नीनं तर मुलांची ओळख पटवून दिलीच, पण आईवडिलांना पाहिल्यानंतर मुलांचाही बांध फुटला..
एक कुटुंब उद्ध्वस्त करून टाकणारं नाटय़ अखेर त्या एका भेटीनं संपलं.. पण त्याला जशा कारणीभूत झाल्या डॉ. कीर्तिदा प्रधान, तशीच ती अज्ञात व्यक्ती जिनं त्या दोन मुलांना उपनगरी रेल्वेच्या डब्यात पाहिल्यानंतर काळजी वाटून पोलीसांच्या हवाली केलं, आणि पोलीसांमधलंही ते संवेदनशील अंत:करणही ज्यानं योग्य संस्थेच्या ताब्यात त्या मुलांना सोपवलं..
समतोलह्णसारख्या संस्थांचे हात बळकट करण्यासाठी आवश्यकता जशी पैशांची आहे, जागांची आहे, तशीच कानडोळे उघडे ठेवून समाजात वावरणाऱ्या नागरिकांची आहे.. अगदी आपल्या शेजारच्या घरातही आईबापांच्या दुर्लक्षामुळे, परस्परांतील विसंवादांमुळे अंतराय पडत नाही ना, हे पाहण्याची आहे..
sumajo51@gmail.com