Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मर्दानी काबूलवाली!
पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी शरियत लागू केला तेव्हाच अमेरिकेने त्याची गंभीर दखल घेतली आणि तेथील शीख समाजावर जिझिया कर लादला गेला त्यानंतर मात्र योगायोगाने का होईना, पण तालिबान्यांना नेस्तनाबूत करण्याची निर्णायक कारवाई सुरू झाली. पाकिस्तानातील हिंदू समाजाबद्दल अधेमधे का होईना बोलले जाते, लिहिले जाते. पण त्यालगतच्या अफगाणिस्तानातील हिंदू व शीख समाजाची फारशी दखल घेतली जात नाही. अफगाणिस्तानातही हिंदू आणि शीख समाज नांदतो आहे, काबूलमध्ये आशामाईचे मंदिर आणि त्यात तेवणारी अखंड ज्योत, भैरवनाथ मंदिर, मंगलवार मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत, स्तूप आहेत, गुरुद्वारा

 

आहेत, तेथे सण साजरे होतात इतकेच नव्हे तर जिर्गा या स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रशासकीय सभेतही दोन जागा हिंदूूंसाठी राखीव असतात; या गोष्टींची फारशी चर्चा कधी होत नाही. वैदिक काळातील तेथील हिंदू राजवटी, हिंदूू शाहांच्या (क्षत्रियांच्या) राजवटी, त्यांची नाणी, गांधारीचे माहेर असलेले कंदहार (गांधार) ; हा इतिहास सोडाच पण अलीकडच्या काळातील हिंदू-शीख वास्तव्याचीही फारशी दखल घेतली जात नव्हती. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व मिळविले तेव्हा तेथील हिंदूंवरील अत्याचाराच्या कहाण्या जगासमोर येऊ लागल्या. आपण हिंदू आहोत, हे जाहीर करण्यासाठी तेथील हिंदूंना पिवळ्या रंगाचे चिन्ह आपल्या पोशाखावर लावावे तसेच महिलांनीही बुरखा घालावा, असे फर्मान तालिबानी राजवटीने सोडले होते. त्या काळात अफगाणिस्तानातील अनेक हिंदूंनी मायदेशातून पळ काढला आणि भारत, पाकिस्तान, जर्मन, अमेरिका व ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय मिळविला. तरीही प्रतिकूल परिस्थितीत नेटाने अफगाणिस्तानातच राहिलेल्या हिंदू व शीख समाजाने तालिबान्यांची राजवट संपल्यानंतर आज अफगाणिस्तानच्या विकासात आपला भरीव वाटा उचलला आहे. या समाजाची मान आज अभिमानाने उंचावली आहे ती अवघ्या पंचविशीतील अनारकली कौर होनरयार या तरुणीमुळे. अफगाणिस्तानातील मानवी हक्क चळवळ व वृत्तपत्रांच्या संघटनेने तिला ‘वर्षांतील सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व’म्हणून गौरविले आहे. या पुरस्कारापर्यंतचा तिचा प्रवास तसा अनपेक्षितच होता. अनारकली कौर हिला खरेतर पायलट व्हायचे होते. मात्र ती डॉक्टर झाली. देशातील अस्थिरतेने ती अस्वस्थ झाली. देशात लोकशाही आली पाहिजे, या विचारातूनच ती सामाजिक कार्याकडे ओढली गेली. मानवी हक्कांसाठी काम करू लागली. तालिबानी राजवटीचा खात्मा झाला आणि देशात लोकशाहीचे वारे वाहू लागले तेव्हा देशाच्या नव्या घटना समितीची सदस्य म्हणून तिची निवड झाली तसेच अफगाणिस्तानच्या मानवी हक्क समितीवरही तिची नेमणूक झाली. तालिबान्यांच्या मगरमिठीतून सुटलेल्या अफगाणिस्तानातील अनारकली कौर ही त्यामुळेच तालिबान्यांशी टक्कर देत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठीही प्रेरणास्थान ठरत आहे.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com