Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

निसर्गाच्या दैवतांचे तळतळाट नकोत!
साऱ्या जगभर दहशतवादानंतर पाणी आणि पर्यावरणावरच सर्वाधिक चर्चा होत आहे. दहशतवादासारखेच पर्यावरणाच्या असंतुलनाचेही संकटही मानवी जीवनाला विळखा घालून बसले आहे. दहशतवादाचा धोका देशांतर्गतही उभा होताना दिसत असतानाच शेजारी राष्ट्रांकडूनही तो आपल्यावर लादला जात आहे पण, पाणी आणि पर्यावरणाच्या

 

असंतुलनाचे संकट मात्र ‘आ बैल मुझे मार या’ पद्धतीने आपणच ओढवून घेतले आहे, हे मनोमन मान्य करणार नाही तोवर संकटाच्या विळख्यातून आपली सुटका होणार नाही. नॉर्वेची राजधानी कोपनहॅगन येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय जी-२० या शिखर परिषदेतही अमेरिका-भारतासह अनेक देशांनी पृथ्वीच्या जल-वायू स्थितीचा आढावा घेतला आणि ग्लोबल वार्मिगची गती कुंठीत करण्याच्या उपायांची सूची तयार करण्यात आली.
तीस लाख लोकसंख्येच्या आजच्या नागपूर शहराचा विचार केला तर हे संकट अधिकाधिक गहिरे होत तर जाणार नाही ना, अशी भीती वाटते. वाढत्या शहरीकरणाचा रोग जडलेल्या साऱ्याच शहरांची व्यथा तशी सारखीच म्हणायला हवी. यंदाचा उन्हाळा नागपूरकरांसाठी नेहमीपेक्षा थोडा अधिकच तापदायक ठरलेला आहे. ऐन मे महिन्याच्या उंबरठय़ावरच पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तो ४७.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला होता. हे तापमान कमी अधिक प्रमाणात नागपुरात आठवडाभर स्थिरावलेले होते, हे विशेष. आजही ते ४३ ते ४५ अंश सेल्सिअसच्या मागेपुढे रेंगाळतेच आहे. मे महिना अद्याप १५ दिवस बाकी आहे. एखाद दोन दिवस पारा ४८ अंश सेल्सिअसला स्पर्श करेल काय, अशी शंका नागपूरकरांच्या मनात डोकावत आहे. हे एवढे उन्हं तापले म्हणून नागपूरकरांच्या दैनंदिनीत काही फरक पडलेला होता, असे वगैरे फार झालेले नव्हते पण, जाणवायचा तो तडाखा जाणवत मात्र होताच.
गेल्या काही वर्षांत प्रशासनाला नागपूरच्या सौंदर्यीकरणाचा ध्यास लागलेला होता आणि त्याचा पहिला तडाखा बसला तो या शहराचे गतवैभव अनुभवलेल्या झाडांना! सौंदर्यीकरणाच्या नावापुरताच नागपुरात उड्डाणपूल झाले, पाठोपाठ चकचकीत रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात आली. बऱ्याच रस्त्यांच्या विस्तारीकरणासोबतच कायमस्वरूपी सिमेंटीकरणही झाले. सोबतीला सिमेंट काँक्रीटची जंगले चारही बाजूंनी वाढतच आहेत. यात चुराडा झाला तो मात्र साठसत्तर वर्षांपासून दिमाखाने तग धरून असलेल्या वृक्षराजीचा. शहराचा विकास साधायचा तर काही गोष्टी मनाविरुद्ध का होईना कराव्याच लागतात. त्याची कुऱ्हाड कोसळली ती या झाडांवर. त्या पाठोपाठ रस्त्यांचे रुंदीकरण आणि फुटपाथचे बांधकाम करतांना त्या आड येणारी झाडे तोडली गेली नाही पण, ती जगावी अशी तजवीजही करण्यास प्रशासन विसरले. महाराष्ट्रातल्या या उपराजधानीतले रस्ते तिला शोभले असे रुंद आणि चकचकीत झाले. फुटपाथही गेरू रंगाच्या टाईल्सने सुशोभित झाले. पावसाळ्यात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याला वाट मिळावी म्हणून फुटपाथच्या खालूनच साऱ्या शहरभर सिमेंटच्या मोठय़ा नाल्या बांधण्यात आल्या पण, फुटपाथवर येणाऱ्या झाडांना पाणी मिळावे म्हणून त्याच्या बुंध्याभोवती आळे करावे, याचा सपशेल विसर या शहर सौंदर्यीकरणाच्या स्वप्नांच्या सौदागरांना पडला. त्याची दृष्ट फळे हयात असलेल्या पिढीसोबतच उगवत्या पिढय़ाच्याही पदरात निसर्ग अलगदपणे टाकणार आहे, हे कुण्याही नियोजनकर्त्यांच्या लक्षात आले नाही. वर्षांनुवर्षे या शहराचा गारवा टिकवून ठेवणाऱ्या झाडांना त्याच्या मुळापर्यंत पाणी मिळावे, त्यांचे अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचते व्हावे ते अशा शहरभरातल्या फुटपाथवरील झाडांच्या बुंध्यांभोवती आळे न केल्याने होत आहे. ही झाडे उन्हाळा म्हणूनच नव्हे तर, पावसाचे पाणी वरचेवर झेलत चातकाप्रमाणे थेंबन् थेंब टिपत आहेत. भूमिगत नाल्यांमुळे जमिनीवरचे खेळते पाणी त्यांच्या वाटय़ाला येतच नाही. एखाद्या मांडवात पंचपक्वानांच्या पंगतीवर पंगती उठत आहेत आणि मांडवाबाहेर अन्नाच्या कणाकणाला मोताद झालेल्यांनी आशाळभूतपणे त्याकडे बघत रहावे, तसे या झाडांचे केविलवाणे जिणे झाले आहे. या शहरातील पावसाचे सारे पाणी या रस्त्यावरील झाडांना खुशाल वाकुल्या दाखवत थेट शहराबाहेर निघून जात आहे. ते धड शहरातही मुरत नाही, हे कुणाच्याच कसे लक्षात येत नाही, हाच खरा प्रश्न आहे. मध्यंतरी काही पर्यावरणवाद्यांनी वेळीच हा धोका लक्षात आणूनही दिलेला होता, कोर्ट-कचेऱ्याही जाल्या पण, प्रशासनाच्या मनावर स्वार झालेली सौंदर्यीकरणाची झिंग काही उतरलेली नाही.
एकीकडे या निसर्गदत्त ऋषींचे हे दीनवाणेपण दिसत असताना दुसरीकडे शहराच्या चारही बाजूंनी उभारल्या जाणाऱ्या फ्लॅट स्किम्समध्येही झाडांसाठी किंवा वृक्षारोपणासाठी म्हणून काही विचार झालेला दिसत नाही. अगदी स्वत:ची घरे उभारणाऱ्यांनाही घराचे अंगण कसे टाईल्सने आच्छादलेले स्वच्छ हवे आहे. घरात शिरताना पायाला मातीचा कण लागायला नको, याची कोण काळजी घेतली जात आहे. घराच्या आसपास किंवा गॅलरीत तुळशीच्या चारदोन कुंडय़ा मांडून ठेवल्या की ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत मराठमोठय़ा संस्कृतीचे गोडवे गायला आम्ही मोकळे. तसे लोकप्रतिनिधींना या इकॉलॉजिकल इम्बॅलन्सचे काही सोयरसुतक असण्याचे कारण दिसत नाही तरी यासंदर्भात काही प्रयत्न होण्याचे संकेत आहेत. प्रत्येकाला आपापले जगणे जगू द्यायला हवे, भोगू द्यायला हवे, अनुभवू द्यायला हवे, हा संस्कृतीचा मूलगाभा आहे. फक्त आपल्या मस्तीत आपले जगणे इतरांच्या जगण्यावर उतणारे नको पण, निसर्गाच्या बाबतीत हे भान बाळगायचे कुणी, असा हा प्रश्न आहे. पडे झडे तोच वाढे, असे म्हणत आजी नातवाला मातीत मनसोक्त खेळू देत असे, पडू देत असे, त्याच्याच प्रयत्नाने त्याला उभे राहून वाढू देत असे. निसर्गाची पहिलीवहिली ओळख ही अशी त्या चिमुकल्याला करून देत असे. आता मूल पडले रे पडले की, सारे घर एक दुसऱ्याला बेजबाबदार ठरवत दचकून उठावे इतके हे शहर बदलत आहे. या शहराचे तापमान असे बेसुमार वाढू द्यायचे नसेल तर नागपूरकरांनाही दचकून जागे करावे लागणार आहे. या शहरातील सिव्हिल लाईन्ससह फार थोडे परिसर हिरवेगार दिसतात. बाकी सर्वच बाराही महिने भगभगते उन्हं जाणवत राहते.
मागील वर्षीच्या अत्यल्प पावसाळ्यामुळे या उन्हाळ्यात नागपूर विभागातील जलसाठय़ांमध्ये २२ टक्क्यांनी घट झाली असून १४ मोठय़ा धरणांमध्ये फक्त ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पावसाचा पहिला मृदगंध यायला अद्याप महिना बाकी आहे. शहरात काही भागात अनियमित तर, काही भागात एकदोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या सीमावर्ती भागात तर बारमाही टँकर्सच फिरवावे लागतात, इतके हे पाणी टंचाईचे भीषण रूप आहे. निसर्गातील पंचतत्त्वांना जर आपण समजावून नाही घेतले तर हे शहर कणाकणाने पर्णहीन झालेले दिसेल आणि निसर्गाच्या या दैवतांचे तळतळाट आपल्याला कोणत्या स्वरूपात भोगावे लागतील, हे सांगता येत नाही. आपलाच भवताल आपल्याला समजून घ्यावा लागेल.
चंद्रकांत ढाकुलकर