Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

पुण्यात कोण ?
सुनील माळी, पुणे, १४ मे

सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे का डी. एस. कुलकर्णी?.. पुण्यात सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी शहराच्या चारही बाजूंचा कानोसा घेतला असता ‘पुण्यातील निवडणुकीचा निकाल एकतर्फी नाही, तर अगदी थोडय़ा मताधिक्याने कोणीही निवडून येऊ शकतो’, असा निष्कर्ष समोर येतो आहे. लोकसभेची पुण्यातील निवडणूक लढविताना जेवढी चुरस अनुभवाला आली नाही, तेवढी मतदानाच्या दिवशी दिसून आली. त्यामुळेच पुण्याच्या निकालाकडे केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातच उत्सुकता दाटलेली आहे. या निवडणुकीसाठी मतदान तेवीस एप्रिलला झाले आणि त्यानंतर मतमोजणी तब्बल तेवीस दिवसांनी होणार होती.

पुण्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण; फेरीनिहाय निकाल ‘ऑनलाईन’
पुणे, १४ मे / खास प्रतिनिधी

पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून पहिला निकाल दुपारी एक वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीतील कौल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रथमच फेरीनिहाय मतदान ‘ऑनलाईन’ देण्याची व्यवस्था केली आहे. कडक पोलीस तपासणी, मतदारसंघनिहाय बॅरिकेटींग, कर्मचारी आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था अशी वेगळी रचना मतमोजणीसाठी करण्यात आली आहे.पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात शनिवारी (दि. १६) होणार आहे. मतदान झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे याच गोदामातील ‘स्ट्राँगरूम’मध्ये ठेवण्यात आली आहे. मतमोजणी व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पत्रकारांसमवेत केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.या चारही मतदारसंघांतील मतमोजणीचे काम सुमारे साडेचार हजार कर्मचारी करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता करण्यात येणार आहेत.

रेल्वेस्थानक व विमानतळावर पंधरा दिवसांत प्री-पेड रिक्षा
पुणे, १४ मे/ खास प्रतिनिधी

पुणे रेल्वेस्थानक आणि लोहगाव विमानतळावर येत्या पंधरा दिवसात ‘प्री- पेड ऑटो रिक्षा थांबे’ सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी आज लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी अडवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या केंद्राची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सुरुवातीला वाहतूक पोलिसांवर सोपविण्यात आली असून नंतर ती निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणेकरांना करावी लागणार पाण्याची काटकसर
पुणे, १४ मे / खास प्रतिनिधी

जनाई शिरसाई योजनेतून शेतीसाठी सोडलेले पाणी व बाष्पीभवनाच्या वाढलेल्या वेगाने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असून पावसाच्या आगमनापर्यंत पुणेकरांना पाणीवापरात काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी नियोजनापूर्वी म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातच थांबवावे लागणार आहे. खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणात सध्या १६.२२ टक्के म्हणजे ४.५० अब्जघनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे.

माजी मंत्री मदन बाफना अपघातात जखमी
पिंपरी, १४ मे / प्रतिनिधी

पुणे-मुंबई बाह्य़वळण महामार्गावर वाकड येथील हॉटेल न्यू स्वागतसमोर झालेल्या टेम्पो व अॅम्बेसिडर गाडीतील अपघातामध्ये माजी मंत्री मदना बाफना गंभीर जखमी झाले आहेत.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन बाफना (वय ६५), त्याच्या वाहनाचे चालक माणिक वसंत भोसकर (रा. सकाळनगर, बाणेर) हे अपघातात जखमी झाले आहेत. बाफना हे आपल्या (एमएच १४ बीएच ५४००) या अॅम्बेसिडर गाडीतून वडगाव मावळच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्यांच्या वाहनासमोरील टेम्पो अचानक उजवीकडे वळाल्याने हा अपघात झाला.

खेडेकर, वेंगसरकर यांना राजीव गांधी पुरस्कार
पुणे, १४ मे/प्रतिनिधी

वसंतदादा सेवा संस्था व प्रियांकाजी महिला उद्योग संस्था यांच्या वतीने दिला जाणारा राजीव गांधी कला पुरस्कार या वर्षी अभिनेते सचिन खेडेकर यांना देण्यात येणार असून, राजीव गांधी क्रीडा पुरस्कार दिलीप वेंगसरकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती वसंतदादा सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय बालगुडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
संस्थेच्या वतीने गेली पंधरा वर्षे राजीव गांधी यांच्या स्मृतीनिमित्त कला व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असून, या वर्षी नृत्यस्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा २१ ते २९ मे दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. सचिन खेडेकर यांना २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. शां. ब. मुजुमदार या वेळी उपस्थित राहातील. दिलीप वेंगसरकर यांना २९ मे रोजी नेहरू स्टेडियम येथे पुरस्कार देण्यात येणार असून, या वेळी चंदू बोर्डे उपस्थित राहातील. स्पर्धेचे पुरस्कार वितरणदेखील याच दिवशी होईल.

वाहनांच्या डिकीतून चोरी करणाऱ्या चौघांना अटक
पुणे, १४ मे / प्रतिनिधी

जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या डिकीतून मोबाईल, गॉगल व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांसह चारजणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पंधरा मोबाईल, ४७ गॉगल, चार मोटारसायकल आणि पंधरा हजार रुपये रोख असा एकूण दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
निखिल विवेक इंगळे (वय २०, रा. ६१, अध्यापक कॉलनी, सहकारनगर) आणि अनिल दामोदर दुधे (वय २०, रा. गवळीवाडा, अरण्येश्वर) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल महेश निंबाळकर आणि राजकुमार पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यासह बिबवेवाडी परिसरातील दुचाकींच्या डिकीतून चोरी केल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकीची डिकी उचकटून त्यातील ऐवज चोरी करण्याची चौघांची गुन्हे पद्धती होती. कॉन्स्टेबल निंबाळकर यांना याबाबत खबर मिळाल्यावर त्यांनी इंगळे व दुधे या दोघांना अटक केली. आरोपींकडून जप्त केलेल्या मालाचे मालकांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन डेक्कन पोलिसांनी केले आहे.

‘समर्थ भारताच्या स्वप्ना’चा दुसरा वर्धापनदिन साजरा
पुणे, १४ मे/खास प्रतिनिधी

विद्यार्थी-शिक्षकांच्या श्रमदानातून समर्थ भारताचे स्वप्न साकारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दुसरा वर्धापनदिन आज पुणे विद्यापीठात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व चंद्रशेखर धर्माधिकारी या वेळी प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत विकासकामे करण्यात आलेल्या २७२ गावांची माहिती या वेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे गावांच्या इतिहासलेखनाचा खंड, तसेच अन्य आरोग्यविषयक सर्वेक्षणांचे अहवाल आदी जाहीर करण्यात आले. पुणे विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. अरुण अडसूळ यांनी आज सूत्रे स्वीकारली. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कार्यालयामधून त्यांनी आज कारभार पाहण्यास प्रारंभ केला. तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर विद्यापीठाला प्र-कुलगुरू लाभला आहे. ‘विद्यार्थिभिमुख दृष्टिकोन ठेवत सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यापीठातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांना बळ देण्यात येईल,’ असे डॉ. अडसूळ यांनी जाहीर केले होते.

पाकिस्तानच्या विरोधात शिखांचा शांती मोर्चा
पुणे, १४ मे/ प्रतिनिधी

पाकिस्तानमध्ये शीख व हिंदू बांधवांवर दहशतवादी संघटना करीत असलेल्या अत्याचाराचा विरोधात पुणे शीख संगतच्या वतीने गुरुसिंग सभा गुरुद्वारा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान शांती मोर्चा काढण्यात आला. या अत्याचाराच्या विरोधात कडक पावले उचलून हा अत्याचार बंद करण्यास पाकिस्तानला भाग पाडावे व पाकिस्तानातील शीख बांधवांचे स्थलांतर करून पुनर्वसन करावे, असे निवेदन शीख संगतच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी चिंतामण जोशी यांना देण्यात आले. या शांती मोर्चामध्ये आमदार गिरीश बापट, गुरुद्वारा गुरू नानक दरबारचे कार्याध्यक्ष संतसिंग मोखा, चरणजितसिंग सहानी, भोलसिंग अरोरा, दलजितसिंग रॅक आदी उपस्थित होते.

शेजारणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
पिंपरी, १४ मे / प्रतिनिधी

थेरगावच्या सुरेश बारणे चाळीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्रास दिल्याच्या कारणावरुन पेटवून घेतल्याचा गुन्हा हिंजवडी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोराव आकाराम कांबळे (वय ४५, रा. चंद्रीकापूर, ता. आकोट, जि. अकोला) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी सारिका संतोष मुंढे (वय २१, रा. सुरेश बारणे चाळ, थेरगाव) हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची रुपाली कांबळे ही मुलगी तिचा भाऊ अनिल यांच्यासह गेल्या महिन्यापासून थेरगाव येथील सुरेश बारणे चाळीमध्ये राहत होती. तिला सारिका वारंवार मानसिक त्रास देत होती. यावरुन तिने १ मे ला दुपारी बाराच्या सुमारास घरामध्ये स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिचा ११ तारखेला दुपारी तीनच्या सुमारास पुण्यातील ससून सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.