Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्यात कोण ?
सुनील माळी, पुणे, १४ मे

सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे का डी. एस. कुलकर्णी?.. पुण्यात सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी शहराच्या चारही बाजूंचा कानोसा घेतला असता ‘पुण्यातील निवडणुकीचा निकाल एकतर्फी नाही, तर अगदी थोडय़ा मताधिक्याने कोणीही निवडून येऊ शकतो’, असा निष्कर्ष समोर येतो आहे.
लोकसभेची पुण्यातील निवडणूक लढविताना जेवढी चुरस अनुभवाला आली नाही, तेवढी मतदानाच्या दिवशी दिसून आली. त्यामुळेच पुण्याच्या निकालाकडे केवळ पुण्यातच नव्हे तर

 

संपूर्ण राज्यातच उत्सुकता दाटलेली आहे. या निवडणुकीसाठी मतदान तेवीस एप्रिलला झाले आणि त्यानंतर मतमोजणी तब्बल तेवीस दिवसांनी होणार होती. या तेवीस दिवसांत पुणेकरांची चर्चा या एकाच प्रश्नाभोवती घोटाळत होती, ‘कलमाडी, शिरोळे का डीएसके?’
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या झालेल्या पुनर्रचनेमुळे पूर्वापार प्रमुख पक्षांचे मानले जाणारे विधानसभा मतदारसंघ बदलले आहेत. जुन्या रचनेनुसार कसबा, भवानी, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि बोपोडी हे सहा मतदारसंघ होते. त्यातील कसबा आणि शिवाजीनगर हे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे मतदार बहुसंख्येने असणारे तर भवानी, कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि बोपोडी हे मतदारसंघ काँग्रेसचे मतदार बहुसंख्येने असणारे असे होते. आता बदलेल्या रचनेत कोथरूड आणि पर्वती हे मतदारसंघ भाजपचे मतदार बहुसंख्येने असणारे असे झाले असून शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे काँग्रेसचे मतदार बहुसंख्येने असणारे झाले आहेत. कसबा या भाजपच्या परंपरागत मतदारसंघाला काँग्रेसच्या मतदारांचे पूर्वीच्या भवानी आणि पर्वतीतील पट्टे जोडण्यात आले आहेत.
मतदारांच्या परंपरागत कौलानुसारची पुण्यातील लोकसभा मतदारसंघाची रचना अशी झालेली असली, तरी प्रत्यक्षात यंदा काँग्रेस आणि भाजपच्या परंपरागत मतदारांमध्येच भरीव फूट झाल्याचा अंदाज असल्याने निकाल या परंपरेवर लागणार नाही, असे वाटते. काँग्रेसशी आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बरीच मोठी फौज आतून मराठा समाजाचा उमेदवार असलेल्या भाजपच्या दिमतीला होती. सोशल इंजिनियरिंगचा पुकारा करणाऱ्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या डी. एस. कुलकर्णी यांचा हत्तीही बऱ्याच दलित-मुस्लीम वस्त्यांमध्ये झुलल्याचेही स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये अशी फूट होत असतानाच डीएसके यांनी भाजपच्या ब्राह्मण समाजाची काही मतेही आपल्याकडे वळविल्याने भाजपही या फुटीपासून वाचला नसल्याचेच चित्र दिसते आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणजित शिरोळे यांनी बऱ्यापैकी नवमतदारांना आकृष्ट केले आणि त्यातही भाजप-शिवसेनेचा मतदारही काही प्रमाणात असल्याने मनसेचा फटका भाजपला अधिक बसण्याची शक्यता स्पष्ट होते आहे.
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत सात लाख वीस हजार मतदान झाले होते. या निवडणुकीत जवळपास तेवढेच म्हणजे सात लाख ३४ हजार मतदान झालेले आहे. यामध्ये साडेतीन लाखांच्या आसपास मते मिळविणारा उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र यंदाची निवडणूकच वेगळी असल्याने मतांचे वाटप अनेक मतदारांमध्ये होऊन सव्वादोन ते अडीच लाख मतेही विजयासाठी पुरेशी होऊ शकतील, असा अंदाज आहे.
काँग्रेस-भाजप या प्रमुख पक्षांना कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळेल आणि ते किती मिळेल, याविषयी औत्सुक्य असून प्रत्यक्ष मतदानावर काही ठोकताळे बांधण्यात येत आहेत. काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य शिवाजीनगरमध्ये, त्या खालोखाल पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आणि त्याखालोखाल वडगाव शेरीमध्ये मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त होते. शिवाजीनगरमध्ये एक लाख ११ हजार मतदान झाले असून तेथे काँग्रेसला तीस ते चाळीस हजार मतांचे अधिक्य अपेक्षित आहे. भाजपच्या मते मात्र काँग्रेसचे हे मताधिक्य आपण दहा ते वीस हजारांपर्यंत कमी करू शकू. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसला पंचवीस तर वडगाव शेरीमध्ये किमान वीस हजारांचे मताधिक्य अपेक्षित आहे.
भाजपच्या मते कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसला पंधरा हजारांचेच मताधिक्य मिळेल तर वडगाव शेरीमधील मताधिक्य अवघ्या काही हजारांपर्यंतच सीमित राहील. याउलट भाजपला कोथरूडमध्ये किमान पंचवीस हजारांचे मताधिक्य अपेक्षित आहे. मात्र मनसेने आपल्याकडे खेचलेल्या तरुण वर्गामुळे भाजपचे मताधिक्य कमी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पर्वतीतील मताधिक्याबाबत असेच दुमत असले, तरी भाजपच्या मते या मतदारसंघात आपल्याला किमान वीस हजारांचे मताधिक्य मिळू शकेल. कसब्यामध्ये आता काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांचे पट्टे जोडले गेले असले, तरी हा मतदारसंघ भाजपलाच किमान पंधरा ते सतरा हजारांचे मताधिक्य मिळवून देईल, असा भाजपचा विश्वास आहे. पुण्यातील इतर मागासवर्गीय, मुस्लीम यांच्याबरोबरच ब्राह्मण मतदार आपल्याकडे वळला असून त्यामुळे आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा बसपचे कार्यकर्ते करीत आहेत. बसपच्या विजयासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांच्या मतांमध्ये फार मोठी फूट पडावी लागेल. तेवढी फूट पडेल का, याबाबत राजकीय निरीक्षक साशंक आहेत.
प्रचाराच्या सुरुवातीस कलमाडी यांचा किमान एक लाख मतांच्या अधिक्याने विजय होईल, असा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते करीत होते. मात्र मतदानानंतर त्यांचा हा दावा पंधरा ते वीस हजारांपर्यंत घसरला आहे. ‘‘कितीही मताधिक्य कमी झाले असले तरी कलमाडीच येतील,’’ असा त्यांचा दावा आहे तर ‘‘कमी मतांच्या फरकाने का होईना शिरोळेच येणार,’’ असा भाजपचा दावा आहे.
मनसेकडून भाजपची किती मते घेतली जातात आणि डीएसके यांना ब्राह्मण समाजाने किती मते दिली, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घोडामैदान जवळच आहे!