Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण; फेरीनिहाय निकाल ‘ऑनलाईन’
पुणे, १४ मे / खास प्रतिनिधी

पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून पहिला निकाल दुपारी एक वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीतील

 

कौल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रथमच फेरीनिहाय मतदान ‘ऑनलाईन’ देण्याची व्यवस्था केली आहे. कडक पोलीस तपासणी, मतदारसंघनिहाय बॅरिकेटींग, कर्मचारी आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था अशी वेगळी रचना मतमोजणीसाठी करण्यात आली आहे.
पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात शनिवारी (दि. १६) होणार आहे. मतदान झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे याच गोदामातील ‘स्ट्राँगरूम’मध्ये ठेवण्यात आली आहे. मतमोजणी व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पत्रकारांसमवेत केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
या चारही मतदारसंघांतील मतमोजणीचे काम सुमारे साडेचार हजार कर्मचारी करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता करण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता टपाली मतदान मतमोजणीसाठी आणले जाईल आणि प्रत्यक्षात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात केली जाईल. मतमोजणीचे कर्मचारी व सात हजार मतमोजणी प्रतिनिधींची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणीत कोणताही गोंधळ वा अडथळा येऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल ठेवली जाणार आहेत. एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ या प्रमाणे ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. या प्रत्येक टेबलवर ‘स्टॅटीक ऑब्झव्र्हर’ नेमण्यात आले आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडची माहिती त्यांनी घेतल्यावर ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाईल आणि त्यानंतर आकडेवारी अंतिम करण्यात येईल. मतमोजणीतील पारदर्शकतेसाठी प्रत्येक राऊंडमधील दोन मतदान यंत्रांवरच्या मतांच्या आकडेवारीची पडताळणी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून करण्यात येणार आहे, असेही दळवी यांनी नमूद केले.
निवडणुकीत झालेल्या मतदानानुसार पुण्यात मतमोजणीचे २१ राऊंड, मावळमध्ये २३ राऊंड व बारामती व शिरूर मतदारसंघात प्रत्येकी २४ राऊंड होतील. पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या ३६ असल्याने निकाल हाती येण्यास सायंकाळ होईल. शिरूर लोकसभेचा निकाल मात्र दुपारी एकपर्यंतच हाती येऊ शकेल. बारामती व मावळचा निकाल दुपारी तीनपर्यंत मिळू शकेल. या मतमोजणीची फेरीनिहाय माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालय, एसएसपीएमएस शाळा व सीओईपीच्या मैदानावर ध्वनीक्षेपक लावण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मतमोजणीचा फेरीनिहाय निकाल ‘जेनिसिस सॉफ्टवेअर’द्वारे आयोगाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ही माहिती निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मंडप व्यवस्था, अग्निशामक दलाचे बंब, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचेही दळवी यांनी स्पष्ट केले.
मतमोजणीची वैशिष्टय़े
साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक
कर्मचारी व मतदान प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था
पहिला निकाल शिरूरचा तर शेवटी पुण्याचा
निकाल ऐकण्याची कृषी महाविद्यालयात सोय
निकाल ‘ऑनलाईन’ही पाहता येणार