Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

रेल्वेस्थानक व विमानतळावर पंधरा दिवसांत प्री-पेड रिक्षा
पुणे, १४ मे/ खास प्रतिनिधी

पुणे रेल्वेस्थानक आणि लोहगाव विमानतळावर येत्या पंधरा दिवसात ‘प्री- पेड ऑटो रिक्षा थांबे’ सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

 

प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी आज लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी अडवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या केंद्राची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सुरुवातीला वाहतूक पोलिसांवर सोपविण्यात आली असून नंतर ती निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षित प्रवासासाठी चार-पाच वर्षांपूर्वी वाहतूक विभागाचे तत्कालीन उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथील एसटी व रेल्वे स्थानकाजवळ प्री- पेड ऑटो रिक्षा थांबे सुरु केले होते. सुरुवातीस ते वाहतूक पोलिसांमार्फतच चालविण्यात येत. त्यावेळी ते नफ्यात होते. सेनगावकर यांच्यानंतर या प्री- पेड ऑटो रिक्षा केंद्राची जबाबदारी स्वयंसेवी संस्थेकडे सोपविली गेली. त्यामुळे वर्षांभरातच नफ्यात चालणारी ही यंत्रणा तोटय़ात येऊन कोलमडून पडली होती. हा अनुभव लक्षात घेऊनच या केंद्राचे काम निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बंड यांनी स्पष्ट केले.
पिंपरी- चिंचवडमध्येही मीटरप्रमाणेच भाडे
पिंपरी चिंचवड परिसरातील रिक्षांनीही मीटरनुसार भाडे आकारणी करणे अपेक्षित असून तसे न करणाऱ्या रिक्षांचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत आज देण्यात आले. या कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांचीही मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुणे शहरासाठी ६०० रिक्षाथांबे मंजूर केले आहेत. तथापि, त्यांची उभारणी महापालिकेने अद्याप केलेली नाही. एक महिन्याच्या आत पालिकेने हे थांबे उभे करावेत. त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता श्रीनिवास बोनाला यांचा पाठपुरावा करावा, असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील काही मार्गावर शेअर ए रिक्षाला यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अशा प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला किती पैसे द्यावे लागतील, याची माहिती प्रवाशांना नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा थांब्यांवर दरपत्रक प्रसिद्ध करावे, त्याखेरीज या व्यवस्थेत सहभागी होणाऱ्या रिक्षांनीही आपले मीटर्स चालू ठेवणे बंधनकारक आहे. विनापरवाना सुरू असलेल्या रिक्षांवर प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिसांच्या वाहतूक विभागाने कडक कारवाई सुरू करावी, असे आदेशही दिले.
तीन महिन्यांत सीएनजीचे डेपो
सीएनजीवर रुपांतरित होणाऱ्या रिक्षांना व अन्य वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात सीएनजीचा पुरवठा व्हावा यासाठी येत्या तीन महिन्यांत शहरात सीएनजीचे डेपो सुरू करण्यात यावेत. त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असा आदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिला.