Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पुणेकरांना करावी लागणार पाण्याची काटकसर
पुणे, १४ मे / खास प्रतिनिधी

जनाई शिरसाई योजनेतून शेतीसाठी सोडलेले पाणी व बाष्पीभवनाच्या वाढलेल्या वेगाने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असून पावसाच्या आगमनापर्यंत

 

पुणेकरांना पाणीवापरात काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी नियोजनापूर्वी म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातच थांबवावे लागणार आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणात सध्या १६.२२ टक्के म्हणजे ४.५० अब्जघनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. गतवर्षी याचवेळी खडकवासला प्रकल्पात १८.८८ टक्के म्हणजे ५.२३ टक्के एवढे पाणी होते. गतवर्षीपेक्षा सुमारे दोन टक्के पाणीसाठा यंदा कमी झाला आहे. याचा परिणाम शेती व शहराच्या पिण्याच्या पाण्यावर होण्याची दाट शक्यता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहराला सध्या बंदनळातून ३५० क्युसेक, कालव्याद्वारे दोनशे क्युसेक, वारजे व लष्कर जलकेंद्रासाठी प्रत्येकी ५० असे शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात येते. शेतीसाठी कालव्यातून ८०० क्युसेकने पाणी सोडले जाते. अशा पद्धतीने दररोज ०.१५ टीएमसी एवढे पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. धरणातून सोडले जाणारे हे पाणी तसेच पाण्याचा वहननाश व बाष्पीभवनाचा वाढलेला वेग लक्षात घेता पाच दिवसांमध्ये एक टीएमसी पाणी धरणातून बाहेर जात आहे. धरणात सध्या साडेचार टीएमसी पाणी आहे. अशा पद्धतीने धरणातून पाणी सोडले गेल्यास पुढील पंचवीस दिवसांत चार टीएमसी पाणी सोडले जाईल आणि धरणात १० जूनपर्यंत केवळ अर्धा टीएमसी पाणी शिल्लक राहील.
शेतीसाठी ३० मेपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे. परंतु मे अखेरपर्यंत पाणी सोडले गेल्यास शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतीचे पाणी आठवडाभर आधीच बंद करता येऊ शकते या शक्यतेपर्यंत पाटबंधारे अधिकारी विचार करीत आहेत.
शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या काळात पुरंदर तालुक्यातील जनाई शिरसाई योजनेतून शेतीसाठी पाणी सोडले गेले. त्याचा परिणाम धरणसाठय़ावर झाला आहे.
या परिस्थितीचा विचार करता आणि पावसाच्या आगमनानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्याचा काळ पाहता शहरात पाण्याची काटकसर करावी लागेल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.