Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

एक कुंडी, शंभर रुपये आणि इच्छाशक्ती!
अभिजित घोरपडे
पुणे, १४ मे

घर-सोसायटीतील कचऱ्याचे व्यवस्थापन व तो जिरविण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची की नागरिकांची? हा वाद घालण्याचीच मुळी गरज नाही. कारण प्रत्येक नागरिकाला स्वत:चा कचरा सहजपणे जिरविणे शक्य आहे; अगदी दरुगधी आणि डास-माशांशिवाय. त्यासाठी गरज आहे- फक्त एक कुंडी, शंभर रुपये आणि थोडय़ाशा इच्छाशक्तीची! पुण्यात अनेकजण व्यक्तिगत पातळीवर किंवा सोसायटय़ांमध्ये असा प्रयोग राबवत आहेत आणि आपल्या कचऱ्याचे नियोजनही करत आहेत.. हे काम अतिशय सोपे

 

असूनही शहरात कचऱ्याची अक्राळविक्राळ समस्या बनते, हे आश्चर्यकारक आहे.
आपला कचरा आपल्याच भागात जिरविण्याचे पुण्यात १९८० च्या दशकापासून असे प्रयोग केले जात आहेत. विधी महाविद्यालय रस्त्यावरील कांचन गल्लीत लता श्रीखंडे यांच्या गटाने असे कचरा व्यवस्थापन यशस्वी करून दाखवले. त्याचा पुढे काहींनी स्वीकार केला. आपापल्या घरात असे व्यवस्थापन करणारे, आपल्या सोसायटय़ांमधील प्रकल्प राबविणारे आणि इतर सोसायटय़ांना अशी सेवा पुरविणारे अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. याबाबत विनामूल्य सल्ला व सेवा पुरविणाऱ्या ज्योती शहा यांच्या महर्षिनगर येथील घराची गच्ची हे याचे उत्तम उदाहरण! त्यांनी तिथे कुंडय़ा ठेवल्या आहेत व विटा लावून वाफे केले आहेत. अशाप्रकारे सुमारे बाराशे ते पंधराशे चौरस फुटांच्या या बागेत घरातील सर्व ओला कचरा (नैसर्गिकरीत्या तयार होणारे सर्व जैविक पदार्थ) जिरवता येतो. बागेसाठी त्यांनी मूठभरही माती वापरली नाही. सुरुवातीला बारा वर्षांपूर्वी एकदाच पुण्यातील ‘भवाळकर इकॉलॉजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट’चे व्हर्मी-बायोसॅनिटायझर टाकले. त्यानंतर आजपर्यंत केवळ कचरा आणि पाण्यावर त्यांची बाग बहरली आहे. या बागेची कचरा जिरविण्याची क्षमता इतकी जास्त आहे, की रोज सुमारे शंभर किलो ओला कचरासुद्धा त्यात जिरू शकतो. त्यामुळेच जवळच्या हॉटेलचा सर्व जैविक कचरा त्यांच्या टेरेसमध्ये जिरत होता. आता हे हॉटेल बंद झाल्याने त्यांना बागेसाठी आणखी कचरा हवा आहे, हे वास्तव चकित करते. ‘कचऱ्यात प्लॅस्टिकसारखे पदार्थ आले नाही म्हणजे झाले. कोणतीही दरुगधी किंवा माशांशिवाय इथे कचरा कुजतो आणि चिकू, ऊस, आंब्यापासून ते वांगी, मिरच्या, शोभेची झाडे असे सर्व काही वाढते. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा समस्या असा उल्लेख केला जातो तेव्हा आश्चर्य वाटते’.. बागेतील झाडे दाखवत शहा सांगतात.
घरोघरी ओला आणि सुका कचरा वेगळा साठवला की सर्व काही होते- बाग फुलते आणि उत्तम प्रतीचे खतही तयार होते. शिवाय सर्व प्रकारच्या सुक्या कचऱ्याची विक्री करून पैसे मिळवता येतात, असे शहा यांच्याप्रमाणेच शहरातील अनेकांकडे पाहायला मिळते. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या कचऱ्याला केवळ अडीच चौरस फुटांची जागा पुरी पडते. एका माणसासाठी शंभर रुपयांचे व्हर्मी-बायोसॅनिटायझर (किंवा देशी गाईचे मूत्र) व झाडाची एक कुंडी एवढी गुंतवणूक केली, तरी त्याचा आयुष्यभराचा ओला कचरा जिरवता येतो, हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. आता अनेक सोसायटय़ांनीसुद्धा अशाप्रकारे कचरा जिरविण्याचे प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. मार्केट यार्डमधील हाईट पार्क, संतनगरमधील ट्रेजर पार्क, एनआयबीएम रस्त्यावरील सुयोग पॅरेडाईज अशा अनेक सोसायटय़ांमध्ये ओला कचरा मुरविण्यात येत आहे. या सोसायटय़ांमधील सर्व प्रकारचा ९९ टक्के कचरा उपयोगात आणता येतो, हे तेथील कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या सचिन अडके या विद्यार्थ्यांने दाखवून दिले आहे. सोसायटीचा सर्व ओला कचरा खत व बागेसाठी जिरवता येतो. उरलेल्या सुक्या कचऱ्यापैकीसुद्धा प्लास्टिकच्या पिशव्या-इतर वस्तू, कागद, पुठ्ठे, लाकूड, रबर असे सर्व काही पुन्हा वापरण्यासाठी भंगारात देता येते. त्याचे पैसेसुद्धा मिळतात. केवळ एक टक्के कचरा (थर्माकोल, विद्युत उपकरणे, बॅटरी) जिरवता येत नाही. मात्र, तो पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जमा करता येतो. अशाप्रकारे सर्वच्या सर्व कचरा व्यवस्थित वापरला गेल्याने समस्या उरतच नाही, उलट ते उत्पन्नाचे साधन ठरते, असे सचिन सांगतो. त्याने हे स्वत: दाखवून दिले आहे.
प्रत्येक कुटुंबाला महिन्याला केवळ पंधरा रुपये घेऊन तो ही सेवा पुरवतो. शहरात कचरा व्यवस्थापनाच्या सार्वजनिक यंत्रणेवर सुमारे शंभर कोटी रुपयांचा खर्च होतो. त्या तुलनेत हा सौदा फायद्याचाच ठरतो.
इच्छाशक्ती असेल, तर नागरिक स्वत: सर्व ओला कचरा जिरवू शकतात किंवा त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी इतर कोणावर तरी सोपवू शकतात. प्रश्न उरतो सुक्या कचऱ्याचा. त्याला दरुगधी नसल्याने व त्यावर माशा-डास घोंघावत नसल्याने तो मुख्य प्रश्न नाही. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा साठवून पालिका प्रशासनाला लहानसे सहकार्य केले, तर कचऱ्याचा प्रश्न अगदीच हलका होईल. हॉटेल व व्यावसायिकांच्या कचऱ्यातून मार्ग काढणे कठीण नाही.. कचऱ्याच्या समस्येचे उत्तर आपल्यापाशीच आहे, आपण मात्र ते इतरत्र शोधत आहोत.
(क्रमश:)
संपर्कासाठी : ज्योती शहा यांचा मोबाईल क्रमांक- ९४२२३३३१५५