Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

चुकांचे खापर ग्राहकांच्या माथी फोडण्याचा ‘महावितरण’चा प्रयत्न
प्रस्तावित वीजदरवाढीला विरोध
पुणे, १४ मे/ प्रतिनिधी

वीजपुरवठय़ाबाबत तब्बल नऊ हजार ५७८ कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्याचे मुख्य कारण देत ‘महावितरण’कडून मोठय़ा प्रमाणावर वीजदरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, वीजगळती व चोऱ्यांमुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्याबाबत प्रभावी यंत्रणा न राबविता त्याचे खापर ग्राहकांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

 

या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
‘महावितरण’कडून मोठय़ा प्रमाणावरील दरवाढीचा प्रस्ताव तयार केला असून, निवडणुका झाल्यानंतरच तो सादर करण्यात येणार असल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. निवडणुकीमध्ये मतदारांचा रोष नको म्हणून हा प्रस्ताव लांबविण्यात आला होता, हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यातील सर्व विभागातील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ‘महावितरण’ने वीज नियामक आयोगाकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. ० ते ३० युनिट वीजवापर असलेल्या दारिद्रय रेषेखालील घरगुती ग्राहक, कृषीपंप, पाणीपुरवठा योजना यांना दरवाढीतून वगळण्यात आले आहे. मात्र, इतर ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये १०० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांना वीज आकारामध्ये वीजवापरानुसार १० ते ४० टक्क्य़ांपर्यंत वाढीची मागणी करण्यात आली आहे. व्यापारी कारणांसाठी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना २५ ते ४० टक्क्य़ांपर्यंत वाढ आहे. लघुदाब औद्योगिक व उच्चदाब औद्योगित ग्राहकांसाठी २५ ते ४० टक्क्य़ांपर्यंतची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
देशात पुरेशा प्रमाणात कोळसा मिळत नसल्याने मोठय़ा प्रमाणावर हा कोळसा आयात करावा लागतो. त्यामुळे खर्च वाढला आहे. त्याचप्रमाणे वीजखरेदीवरही मोठा खर्च होत असल्याची काही कारणे वीजदरवाढीमागे दिली आहेत. एकूण महसुली तूट ९,५७८ असून ती भरून काढण्यासाठी प्रस्तावित दरवाढ असल्याचे मुख्य कारण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील विकास कामांचा खर्चही दाखविण्यात आला आहे.
‘महावितरण’ने वीजदरवाढीबाबत सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये सर्वात जास्त वाढीचा यंदाचा प्रस्ताव आहे. या मोठय़ा प्रमाणावरील वाढीच्या प्रस्तावाबाबत नागरिकांकडून मात्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. त्याचप्रमाणे रोजच विजेचा खेळखंडोबा होत असून, त्यात कोणतीही सुधारणा न करता वाढीव दर मागून ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. वीजगळती व चोऱ्यांचे प्रमाण १५ टक्क्य़ांवर आणण्याचे लक्ष दोन वर्षांपूर्वीच आयोगाने दिले आहे. मात्र सध्या केवळ २१ ते २२ टक्क्य़ांपर्यंतच वीजगळती खाली आणण्यात ‘महावितरण’ला यश आले आहे. त्यामुळे महसुली तूटही वाढली आहे. गळती कमी केल्यास तूटही कमी होऊ शकेल. मात्र, आपल्या चुकांचा भार थेट ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञ व सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. मोठी दरवाढ झाल्यास सामान्य ग्राहकांबरोबरच सध्या मंदीच्या झळा सोसत असलेल्या उद्योगांनाही मोठा फटका बसेल व मंदीची परिस्थिती आणखी बिकट होईल, असेही वेलणकर म्हणाले.