Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

लाच मागणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला अटक
पुणे, १४ मे /प्रतिनिधी

धनादेश वटविण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

 

चाकण येथे बँकेच्या कार्यालयात आज दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
मुगुट आनंदराव गाडे (वय ५०, रा. चाकण) या कर्मचाऱ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक सुभाषचंद्र गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘संबंधित तक्रारदाराच्या मालकीची जमीन सरकारने संपदित केली होती. त्यासंदर्भात सरकारकडून तक्रारदाराला पावणेदोन लाखांचा धनादेश देण्यात आला होता. हा धनादेश त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या चाकण शाखेत जमा केला मात्र काही कारणांनी तो वटला नाही. त्यानंतर सरकारपक्षाकडून नवा धनादेश घेऊन तक्रारदाराने तो पुन्हा बँकेत जमा केला मात्र या वेळी हा धनादेश वटविण्यासाठी बँकेचा कर्मचारी गाडे याने चार हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या संबंधित तक्रारदाराने या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आला व गाडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.’’
कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी तत्काळ केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या ‘बी-४, सिद्धिआनंद अपार्टमेंट, सेक्टर २०, निगडी प्राधिकरण, चिंचवड’ या पत्त्यावरील कार्यालयात किंवा पोलीस अधीक्षक गुप्ता यांना ९९६९२०१९१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाखेतर्फे करण्यात आले आहे.